Goa Politics: खरी कुजबुज; मुख्‍यमंत्र्यांचा दिल्ली दौरा ‘त्‍या’साठी?

Khari Kujbuj Political Satire: प्रियोळ मतदारसंघातील पंचायतीत सध्या विकासाची चर्चा मागे पडून खुर्ची रक्षण अभियान पुढे आले आहे. सरपंच-उपसरपंच बदलायचे नाटक रंगतेय.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

मुख्‍यमंत्र्यांचा दिल्ली दौरा ‘त्‍या’साठी?

आसामनंतर दिल्लीचा दौरा करून काही दिवसांपूर्वी परतलेले मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मंगळवारी पुन्‍हा जीएसटी बैठकीच्‍या निमित्ताने दिल्लीला जाणार आहेत. त्‍याआधी सोमवारी सायंकाळी त्‍यांनी प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांच्‍यासह अनेक मंत्री, आमदारांची आल्‍तिनो येथील सरकारी बंगल्‍यावर भेट घेऊन चर्चा केली. आपण पक्षाच्‍या कामासाठी मुख्‍यमंत्र्यांना भेटल्‍याचे दामू नाईक, तर आम्‍ही मतदारसंघांतील कामांबाबत मुख्‍यमंत्र्यांची भेट घेतल्‍याचे आमदार सांगत आहेत. त्‍यातच येत्‍या गणेश चतुर्थीपूर्वी राज्‍य मंत्रिमंडळात फेरबदल होतील, असे संकेत दोन दिवसांपूर्वी दामूंनी दिले आहेत. त्‍यामुळे मुख्‍यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा त्‍याचअनुषंगाने नसेल ना, असा प्रश्‍‍न सर्वच मंत्री, आमदारांना पडला आहे. ∙∙∙

‘प्रियोळा’त ‘जुने ते सोने’

प्रियोळ मतदारसंघातील पंचायतीत सध्या विकासाची चर्चा मागे पडून खुर्ची रक्षण अभियान पुढे आले आहे. सरपंच-उपसरपंच बदलायचे नाटक रंगतेय, पण शेवटी निकाल ‘जुनं ते सोनं!’ असाच लागत आहे. खांडोळ्यात सरपंच बदलायच्या नादात विरोधी पंच सदस्यांनी अविश्‍वास ठराव आणला. त्यानंतर नवा चेहरा येईल, असे वाटत होते, पण झाले उलटेच. चक्र उलटे फिरले आणि जुनाच सरपंच पुन्हा खुर्चीवर बसला. त्याप्रमाणे शेजारच्या माशेलात सरपंच जाणार म्हणून आधीच काहींना लाडवांचा विचार सुचला होता. लाडवांसह, फटाक्यांची खरेदी केली, पण येथे वेगळाच ट्विस्ट! सरपंच आरामात आणि बिनधास्त कार्यरत राहिले. या काळात आघात दुसरीकडेच झाला, अन् उपसरपंचाची खुर्ची गेली. आता उपसरपंच कोण? याची चर्चा सुरू आहे. पण तेथेही ‘जुने ते सोने’चा निकाल तर लागणार नाही ना? याचीच चर्चा सुरू आहे. ∙∙∙

म्हापसा शहरात चालणे, नको रे बाबा!

पणजी स्मार्ट सिटीच्या धर्तीवर म्हापशाचा विकास केला जाईल, ही सरकारी घोषणा प्रत्यक्षात येणे सुरू झालेले दिसत आहे. सोमवारी रात्री बाजारातील शकुंतलेच्या पुतळ्यासमोरील रस्ता विद्युत भारीत झाला आणि रस्ता स्मार्ट झाल्याची झलक सर्वांना पहावयास मिळाली. या रस्त्यावर विजेचे धक्के बसू लागल्यावर भूमिगत वीज वाहिन्या घातल्या गेल्याचा साक्षात्कार सर्वांना झाला. सामान्यतः वीजदर वाढले की छाती धडधडते, पण आता वीज थेट ग्राहकांच्या पायाशी आली आहे. मार्केट टुरिस्ट स्पॉट घोषित करा, असा उपरोधिक सल्लाही काही जणांनी यानिमित्ताने दिला आहे. ∙∙∙

नारळ पोचले हॉटेलांत

गोमंतकीयांना गणेश चतुर्थीत रास्त दरात नारळ मिळावेत यासाठी गोवा फलोत्पादन विकास महामंडळाने कर्नाटकातून नारळ आणणे सुरु केले. जसे भाजीला पाय फुटून ती घाऊक स्वरूपात हॉटेलवाल्यांना रास्त दरात मिळते तसेच नारळांचेही होऊ लागले आहे. ४५ रुपये दराने का होईना नारळ मिळतील म्हणून लोकांनी महामंडळाशी सलग्न दुकानांवर रांगा लावणे पसंत केले. काही वेळातच नारळ संपल्याचा अनुभव अनेकांना आला. सकाळी अनेक अशा दुकानांतून भाजीच्या पिशव्या नेणारी वाहने आता ग्राहकांच्या परिचयाची झाली आहेत. त्या वाहनांतूनच आता नारळही जात असल्याचे दिसून आल्यावर काही ग्राहकांनी आवाज चढवल्यावर उद्या नारळ मिळतील असे सांगत त्यांची समजूत काढण्यात आली आहे. ∙∙∙

बेशिस्त चोडणवासीय

रो रो फेरीबोट सेवा सुरू केली तरी चोडणवासियांनी फेरीबोट प्रवेशासाठी रांगेत राहणे काही सुटलेले नाही. रोरो फेरीबोटीमुळे रांग वाढत जाते, रोरो फेरीबोटी धिम्या गतीने चालवल्या जातात असे आरोप होऊ लागले आहेत. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या गैरव्यवस्थापनाचे खापर चोडणवासियांवरच फोडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, चारचाकी व दुचाकींनी कोणत्या मार्गाने रो रो फेरीबोटीत प्रवेश करावा हे आखून दिले आहे. असे असताना चारचाकींसाठी असलेल्या मार्गिकेतून दुचाक्या रो रो फेरीबोटींत प्रवेश करतात. त्यामुळे गोंधळ होतो. आता आमदारांनी हे प्रमाणपत्र दिल्यावर चोडणवासियांना बचावासाठी काय शिल्लक उरते काय? ∙∙∙

Goa Latest Political Updates
Priol Political Crisis: प्रियोळात सत्तेसाठी चढाओढ सुरू! माशेल, खांडोळा, भोम पंचायतीत अस्थिरता; ग्रामस्थांत नाराजीचा सूर

पाच-दहा नारळ भेट!

राज्याचा सर्वात मोठा आणि आवडता सण असलेल्या चतुर्थीच्या काळात नारळ प्रचंड महागला आहे. आता हा महागडा नारळ घेऊन चतुर्थी कशी साजरी करावी, अशी विवंचना तमाम गोमंतकीयांना लागून राहिली असून सरकारने स्वस्त दरात नारळ उपलब्ध करणार असल्याचे जाहीर केल्याने सध्या लोकांचे डोळे या निर्णयाच्या पूर्ततेकडे लागले आहेत. पण ‘त्या’ नारळाचे मूल्यही अधिकच आहे. तेव्हा त्यात आणखी बदल होईल का? या अपेक्षेत असणार लोक म्हणतात, कदाचित राजकारणी, स्थानिक नेते चतुर्थीपूर्वी पाच-दहा नारळ भेट देतील. लक्षात घेतले पाहिजे, की काही वर्षांपूर्वी दिल्लीतले सरकार बदलण्यास कांद्याचे वाढलेले भाव कारण झाले होते. गोवेकरांसाठी तर ‘नारळ’ हा जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग. नारळ नाही, तर गोवेकर नाही. त्याच्या प्रत्येक जिन्नसामध्ये नारळ महत्त्वाचा घटक. तो नारळ परवडेनासा होतो, तेव्हा त्याचा परिणाम राजकारणावर होणार नाही का? तेव्हा सरकारने विचार करावा बरे! ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: '2027 च्या निवडणुकीपूर्वी आघाडीचे ठरवले जाईल', पाटकर यांचे मत; 'आतिषीं'च्या वक्तव्यावर व्यक्त होणे टाळले

कुंकळ्ळीतील वाहतूक कोंडी सुटणार

कुंकळ्ळीतील नये बांद ते बेंदोडे या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी लागणारी जमीन संपादण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. कुंकळ्ळी बाळ्ळी व बेंदोडे गावांतील सुमारे ३.६६ लाख चौ.मी. जमीन त्यासाठी संपादली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे या मार्गावरून रोज प्रवास करणारे लाखो प्रवासी व इतरेजन त्यामुळे नजीकच्या भविष्यात सुटकेचा श्वास सोडणार आहेत, असे म्हणतात की गेल्या दोन दशकांमागेच म्हणे हे रुंदीकरण व्हायला हवे होते. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणही तयार होतोय, पण या रस्त्याचा मुख्य भाग असलेल्या कुंकळ्ळी शहरांतील बगलमार्ग कुठून न्यावा, त्यावरच स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद होते. साबांखाने तयार केलेला अलायनमेंट त्यांना पसंत पडत नव्हता व त्यांच्याक़डे स्वतःचा आराखडा नव्हता. शेवटी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी कडक भूमिका घेऊन हा प्रश्न सोडवला. पण काही का असेना अखेरचा हा गुंता सुटला हेही नसे थोडके, असे म्हटले जाते. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com