Goa Politics: खरी कुजबुज; तुरुंगात गांजा प्रीमियर लीग

Khari Kujbuj Political Satire: अनेक नव्या हायस्कूलांना जनहितार्थ परवानगी देताना त्यांना मागेपुढे पाहिलेले नव्हते. आता बऱ्याच वर्षांनी जलस्त्रोतमंत्री म्हणून ते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसले.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

तुरुंगात गांजा प्रीमियर लीग

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात नुकताच ‘गांजा क्रिकेट’चा हाय स्कोअरिंग सामना पार पडला. सुरुवातीला ७ चेंडूंच्या मार्फत खेळ सुरू झाल्याची बातमी आली होती, मात्र आता एकूण १८ बॉल्समध्ये गांजाचा डोज खेळवण्यात आला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या विशेष सामन्यात फिल्डिंग पोलिसांनी केली असली, तरी बॉलर्सचे टार्गेट अगदी अचूक होते. कुणीतरी बाहेरून हे बॉल्स कारागृहाच्या आत टाकले – खरे तर थेट ‘डिलिव्हरी ओव्हर द वॉल’! कोलवाळ कारागृहात आता ‘स्मोक फ्री झोन’चा फलक लावावा की ‘गांजा अ‍ॅक्सेप्टन्स झोन’? असा गोंधळ निर्माण झाला आहे. काही कैद्यांनी बॉल्सवर ऑटोग्राफ मागितल्याचंही ऐकायला येऊ लागले आहे. कारागृह प्रशासन या प्रकरणावर ‘स्मोक स्क्रीन’ टाकण्याचा प्रयत्न करत असून, आता सीसीटीव्ही, ड्रोन, आणि फुटेजमधून बॉल कोण फेकतोय हे शोधण्याचा खेळ सुरू झाला आहे. सुरक्षा भिंतीपेक्षा गजाआड गांजाची सोय सोपी कशी होते, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ∙∙∙

सुभाषभाऊंची मास्तरकी

भले सध्याच्या सरकारमध्ये सुभाष शिरोडकर शिक्षणमंत्री नसतील पण शिक्षण क्षेत्र त्यांना दूर नाही. गुरुवारी पेडण्यातील उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांशी जलसंवर्धनाविषयी संवाद साधत त्यांनी आपल्यात दडलेल्या मास्तराचे दर्शन घडवले. प्रतापसिंह राणे यांच्या मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री असताना शिरोडकर हे राज्यभरातील गावा गावात जात असत. अनेक नव्या हायस्कूलांना जनहितार्थ परवानगी देताना त्यांना मागेपुढे पाहिलेले नव्हते. आता बऱ्याच वर्षांनी जलस्त्रोतमंत्री म्हणून ते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसले आणि अनेकांना त्यांचे शिक्षणमंत्री असतानाही दिवस आठवले. त्यावेळी माध्यमिक विद्यार्थिदशेत असलेले आज पन्नाशीत पोचले तरी शिरोडकरांच्‍या आठवणी त्यांच्या मनात कायम आहेत, यावरून शिरोडकर यांची काम करण्याची पद्धत किती लोकप्रिय होती हे दिसून येते. ∙∙∙

तरी बरे, ती फेरीही भरकटली नाही!

गोवा बंदर कप्तान म्हणजेच नदीपरिवहन खात्याचे ग्रह सध्या चांगले नसावेत, अशी चर्चा रंगू लागली आहे. काहीजण म्हणतात की, खात्याने रो रो फेरीसेवेची जी चाचणी रायबंदर -चोडण मार्गावर घेतली तेव्हापासून खात्याच्या पाठीशी शुक्लकाष्ठ लागलेले आहे. चोडण धक्क्यावर पार्क करुन ठेवलेली फेरीबोट बुडाली व ती वर काढण्यापूर्वीच धावजी-टोलटो फेरी बोट भरकटली. तरी बरे नदीतून जाणाऱ्या बार्जची धडक तिला बसली नाही अन्यथा फार मोठी दुर्घटना घडली असती. एका पाठोपाठ एक अशी संकटे का येत आहेत याचीच चर्चा सुरु आहे म्हणे या घटनांमुळे खात्याचे संचालक विक्रमसिंह म्हणे चक्रावले आहेत. तेवढ्याने भागले नाही कॉंग्रेसवाल्यांना या घटनांचे राजकारण करण्यास आयतीच संधी मिळाली. त्यांनी पणजी धक्क्यावर असलेल्या फेरीबोटीतून पलिकडे जाऊन संचालकांना जाब विचारला म्हणे, तरी बरे ती फेरीबोट भरकटली नाही व व्यवस्थित गेली, अन्यथा जाब विचारण्यास गेलेल्यांची भलतीच पंचाईत झाली असती, असे फेरीतील कर्मचारीच खालच्या स्वरांत बोलत होते. ∙∙∙

झिंगडेंचे धाडस !

कर नाही त्याला डर कशाला, अशी एक म्हण आहे. काल काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेच्या ‘एनएसयूआय’ने ‘संविधान हत्या दिवस’ प्रकरणी शिक्षण संचालक झिंगडे यांना घेराव घातला. संचालकांनी ‘संविधान हत्या’संबंधी चे काढलेले परिपत्रक मागे घ्यावे, अशी आग्रही मागणी विद्यार्थी संघटनेने केली.त्या विद्यार्थ्यांनी झिंगडे सरांना हिटलर, राजकारण्यांच्या हाताखालचा अशी अनेक बिरुदे लावली. मात्र, झिंगडे सर निघाले वस्ताद. त्यांनी विद्यार्थ्यांच्या संख्येचा आढावा घेतला व त्यांना समजले की हा आवाज दुबळा आहे, विद्यार्थी संख्येने कमी आहेत. शिक्षण खात्याने काहीच गैर केले नसून ‘संविधान हत्या’ या विषयावर जागृती कार्यक्रम वर्षभर होणार. आपण कोणाच्या ही दबावाला बळी पडणार नाही, अशी स्पष्ट सूचनाच देऊन झिंगडे सरांनी त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची हवाच काढून घेतली. म्हणतात ना ‘बॉस इज आॅल्वेज राईट’ तेच खरे! ∙∙∙

चर्चिल इरमांवचा सत्कार

बाणावलीचे चर्चिल आलेमांव हे एक भन्नाट व्यक्तिमत्व. त्यांना राजकारणात आणले खरे तर विली व लुईझिन यांनी. पण त्या धुरंदर नेत्यांना बाजूस सारून चर्चिल पुढे कधी निघून गेले हे त्यांनाही कळले नाही. पण जेव्हा ते कळले तेव्हा खूपच उशीर झाला होता. तर अशा या चर्चिल इरमांवचा नुकताच मडगावात सत्कार केला गेला. तोही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते व राष्ट्रीय दर्यावर्दी दिनानिमित्त. पण या सत्कारामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी चर्चिल यांची जी स्तुती केली त्यामुळे. ते खरेही आहे कारण चर्चिल जरी एकेकाळचा दर्यावर्दी असला तरी तसे दर्यावर्दी गोव्यात थोडे थोडके नाहीत पण आयोजकांना सत्कारासाठी चर्चिलचेच नाव का सुचले व या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून मुख्यमंत्र्यांनाच का बोलावले, अशी चर्चा आता दक्षिण गोव्यात सुरू झाली आहे. या चर्चेचे कारण आगामी विधानसभा निवडणूक तर नव्हे ना, अशी शंका अनेकांना येत आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; आमच्या सोबत रहाल तर पेन्शन वाढवू!

गोविंदांचा ‘साष्टांग नमस्कार’

परवा माशेल येथे झालेल्या गोविंद समर्थकांच्या मेळाव्यात सर्वात जास्त गाजला तो त्यांचा ‘साष्टांग नमस्कार’. हा साष्टांग नमस्कार त्यांनी का केला यावर सध्या फोंड्यात विविध ‘अँगल’ने चर्चा सुरू आहे. काहींचे म्हणणे आपली चूक झाली म्हणून त्यांनी असा नमस्कार केला. तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे आता मंत्रिपद नाही, सांभाळून घ्या म्हणून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नमस्कार केला. प्रत्येकजण आपल्या सोयीप्रमाणे या नमस्कारावर तर्क-वितर्क लढवताना दिसत आहेत. आता खरेच त्यांनी हा साष्टांग नमस्कार का केला हे कळायला मार्ग नसला तरी शेवटी ‘बुंद से गई वो, हौद से नही आती’ एवढे मात्र खरे.. नाही का? ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: गावडेंच्या डावपेचाला बळी पडू नये! प्रियोळात बळकट व्‍हावे; भाजप नेत्यांचे मत

गावडेंचा हरिनामावर भर

प्रियोळचे आमदार तथा माजी मंत्री गोविंद गावडे यांनी सध्या हरिनामावर भर दिला आहे. माशेलातील पंढरपूर वारीसमवेत गोव्याबाहेर जाऊन गोविंद गावडे यांनी काही काळ घालवला आणि एकत्रित भोजनही केले. या प्रकारामुळे गोविंद गावडे काहिसे रिलॅक्स वाटले. मंत्रिपद काढून घेतल्यानंतर प्रसिद्ध गायक कलाकार अजित कडकडे यांच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी गोविंद गावडे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे प्रत्यक्षात एकमेकांना भेटले, हस्तांदोलनही केले. मात्र, दोघांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते, त्यामुळे गोविंद गावडे आणि प्रमोद सावंत यांच्यात अजून तरी सख्य नसल्याचेच दिसते. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com