

'नंतर' सुदिन काय बोलणार?
पूजा नाईकने ‘कॅश फॉर जॉब’मध्ये मंत्री सुदिन ढवळीकर यांचे नाव घेतले, पण आपण ज्या आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांना १७.६८ कोटी रुपये दिले, त्यांची ओळख आपल्याला सुदिन यांनी करून दिली होती, असेही तिने सांगितले. त्यामुळे या प्रकरणात सुदिन ढवळीकर यांच्या सहभागाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता सुदिन गेल्या २६ वर्षांत मंत्री म्हणून आपल्याला मिळालेल्या खात्यांतील नोकरभरती गुणवत्तेवरच झाल्याचे आणि पैशांची देवाण-घेवाण झाली नसल्याचे म्हणत आहेत. सोबतच या प्रकरणाचा चौकशी अहवाल मिळाल्यानंतरच आरोपांना उत्तरे देणार असल्याचेही ते सांगत आहेत. त्यामुळे स्वत:बाबत स्पष्टीकरण दिल्यानंतरही चौकशी अहवाल आल्यानंतर ते ‘नेमके’ काय बोलणार? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
अमित, इजिदोरचा वादातील पक्ष प्रवेश!
‘टीम वर्क’ बिघडले की विजयाच्या मार्गात अडथळे निर्माण होणे स्वाभाविक. आपल्या राज्यातील भाजप विरोधकांना भाजपाला सत्तेपासून दूर करायचे आहे. त्यासाठी एकी हा एकच उपाय हे सगळ्या विरोधकांना कळते, मात्र वळत नाही. मांद्रेचे माजी सरपंच अमित सावंत यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाला गोवा फॉरवर्ड ने हरकत घेतली म्हणून अडला. आता इजिदोर फर्नांडिस यांनी भाजपातून उडी घेत गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केल्याने आरजी व काँग्रेस नेते संतापले आहेत. फुटिरांना विरोधी आघाडीत स्थान असता कामा नये व भाजपातून कोणत्याही नेत्याला विरोधी आघाडीत जागा देण्यास काँग्रेस व आरजी ने हरकत घेतली आहे. ‘गोवा’ युती होण्यापूर्वीच फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मांद्रेतील काँग्रेस नेते म्हणायला लागले आहेत जर, गोवा फॉरवर्ड पक्षाला अमित सावंत चालत नाही, तर काँग्रेसला इजिदोर कसा चालेल?
‘भायल्यांचो’ ‘इफ्फी’?
सध्या पणजीत भारताचा ५६ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. पण या महोत्सवात गोमंतकीय सिने कलाकारांपेक्षा बाहेरचे कलाकारच अधिक दिसत आहेत. आयनॉक्सच्या ‘कोर्ट यार्ड’ मध्ये फेरी मारली की, याचा प्रत्यय येतो. आता महोत्सव आंतरराष्ट्रीय असल्यामुळे बाहेरचे रसिक, कलाकार येणे साहजिकच आहे म्हणा. पण स्थानिक सिनेकर्मींचे प्रत्येक महोत्सवागणिक कमी होणारे प्रमाण ही मात्र चिंताजनक बाब बनली आहे, आणि तसे लोक बोलतानाही दिसू लागले आहेत. आम्हाला किंमतच नाही, तर आम्ही तिथे का म्हणून जायचे, असा प्रश्न स्थानिक सिनेकर्मी विचारताहेत. यामुळे गोव्यात असूनही ‘इफ्फी’ आता ‘भायल्यांचा’ होऊ लागल्याचा सूर या चर्चेतून निघू लागला आहे. मुख्यमंत्री साहेब अशाने गोवा सिने निर्मितीचा ‘हब’ होणार तरी कसा हो?
कार्यकर्ता असाही!
कार्यकर्ता कसा असावा, अशी नेहमीच चर्चा विविध पातळ्यांवर रंगत असते. सोशल मीडिया त्याला अपवाद नाही. राजकीय पक्षाचा वा राजकीय पक्षाचा आधार असलेल्या संघटनेचा कार्यकर्ता कसा असावा, याचं उदाहरण म्हणून माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी त्यांना भेटलेल्या एका कार्यकर्त्याचं वर्णन सोशल मीडियात शेअर केलं. त्यावर अपेक्षेनुरूप प्रतिक्रिया उमटल्याच. संघ परिवारातला हा कार्यकर्ता करतो काय तर, जीएमसीत जाऊन आपल्या गावातल्या आजारी माणसाला विरंगुळा म्हणून पुस्तक वाचून दाखवतो. किमान १०० रुग्णांची अशी सेवा करणार,असेही त्याने सांगितले म्हणे. प्रसिद्धीचा सोस नसल्यानं सेल्फीही घेण्यास त्यानं नकार दिला. एकीकडे वाचन संस्कृती संपत चाललीय, अशी ओरड होतेय, असे कार्यकर्ते वाढले, तर निदान काही अंशी वाचन संस्कृती वाढायला मदत होईल नाही का?
मनोज, विरेशकडून ‘चाचपणी’?
येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजीपी) या तीन पक्षांत युतीबाबत चर्चा सुरू असल्या तरी फुटीर माजी आमदार इजिदोर फर्नांडिस यांच्या गोवा फॉरवर्डमधील प्रवेशामुळे काँग्रेस आणि आरजीपीकडून युतीसंदर्भात सावध पवित्रा घेतला जात आहे. सोमवारी प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेस युतीबाबत निर्णय घेणार आहे. पण त्याआधीच रविवारी रात्री आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब आणि आमदार विरेश बोरकर दिल्लीला रवाना झाले आहेत. मनोज परब अजूनही युतीबाबत सकारात्मक असल्याचे म्हणत आहेत. मग ते दिल्लीला का गेले? ते अजून कोणत्या पर्यायाची चाचपणी करीत नाहीत ना? असे प्रश्न तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पडले आहेत.
आतिषींच्या ‘त्या’ आरोपात तथ्य?
निवडणुकांतील युतींबाबत काँग्रेस श्रेष्ठी इतर पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवतात आणि अखेरच्या क्षणी निर्णय घेऊन स्वत:च्या पदरात जास्त जागा पाडून घेतात. गेल्या काही वर्षांत हा अनुभव सातत्याने आल्यामुळेच आम्ही गोव्यातील निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याचे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाच्या गोवा प्रभारी आतिषी यांनी काही महिन्यांपूर्वी स्पष्ट केले होते. युतीच्या चर्चेतून आपने काढता पाय घेतल्यानंतर काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि रेव्हलुशनरी गोवन्स या तीन पक्षांनी एकत्र यायचे ठरवले. त्यासाठी फॉरवर्डच्या विजय सरदेसाई आणि आरजीपीच्या मनोज परबनी पुढाकार घेतला. पण, काँग्रेस मात्र अजूनही निर्णय घेत नाही आणि निवडणुकीस अवघे २६ दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे आतिषी यांच्या आरोपात खरेच तथ्य नाही ना? याचा शोध फॉरवर्ड आणि रेव्हलुशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख पदाधिकारी घेत आहेत.
निलंबित साहेबांचे कारनामे
रगांळी-वेळ्ळी येथील निलंबित सरकारी बकासुरांकडून गरिब आणि पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. एकजण अबकारी खात्यामध्ये उच्चपदावर असूनही दारू तस्करीत ; दुसरा तुरुंगात पेपर रोल, तंबाखू, गांजा आणि मोबाईल पुरवत असल्याच्या आरोपाखाली निलंबित, तेही एकदा किंवा दोनदा नव्हे, तर तब्बल तीन ते चार वेळा या साहेबांना घरी पाठवण्यात आले आहे. याच्या पावलावर पाऊल ठेवत आणखी एक केपेमध्ये काम करणारा सरकारी बाबू तयार झाला असून तोही निलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. जलसंपदा विभागात तो म्हणे काम सोडून फिरत असतो. गंभीर आजाराने त्रस्त एका व्यक्तीला या निलंबित साहेबांनी हिणवणारे बोल बोलत गंभीर आरोप केले होते. दुसऱ्याच दिवशी त्याचे निधन झाले. मृताच्या पत्नीने आपल्या पतीच्या मृत्यूचे कारण हेच निलंबित साहेब असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार नोंदवली, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
५० व्या कोकणी नाट्य स्पर्धेत हे नाटक सुरू झाले आणि एक अनाउन्समेंट प्रेक्षकांच्या कानी पडली- ‘या नाटकाचे कथानक पुरायपणान काल्पनिक आसा. नाटक दिग्दर्शन करप्यान जाय तशी मेकळीक घेंव येता.’ नाटककाराच्या सुपीक डोक्यातून या नाटकाचे कथानक उगवले आहे, असा भ्रम प्रेक्षकांच्या मनात तयार होतो न होतो तोच या नाटकाचे मध्यवर्ती कथानक देवदत्त पटनायक यांनी २००८ या वर्षी लिहिलेल्या ‘द प्रेग्नंट किंग’ या काल्पनिक कादंबरीच्या कथानकाशी सरळसरळ जुळताना दिसते. वैभव कवळेकर लिखीत अलीकडच्या या ‘भोगपर्व’ नाटकात अपत्यविहीन राणीसाठी आणलेले द्रव्य पिऊन राजा जसा गरोदर राहतो, त्याचप्रमाणे देवदत्त पटनायक यांच्या कादंबरीतील राजाही बऱ्याच वर्षांपूर्वी गरोदर राहिलेला आहे. ‘पुरायपणान काल्पनिक’ म्हणून चढवलेला ‘भोगपर्व’चा मुखवटा अशाप्रकारे केविलवाणेपणे उघड होतो आणि ‘इन सर्च ऑफ सर्वायव्हल’ नंतर आणखी एका तथाकथित स्वतंत्र नाटकाचे चारित्र्य उघड्यावर येते. अर्थात या नाटककाराची हुशारी म्हणजे हे मध्यवर्ती कथानक घेऊन आपल्याला हवी तशी उथळ रचना त्याने केली आहे. पटनायक यांच्या या कादंबरीवर आधारून लिंगभेदाचे विश्लेषण करणारे ‘स्प्लॅश’ हे अधिक सखोल आशय असलेले नाटक आहे तर त्याच कथानकावर आधारलेले हे ‘भोगपर्व’, त्याच्याच पोस्टरवरील ‘दरेक भोग, फुडाराचो नवो भोग जल्माक घालता’ हे घोषवाक्य उपरोधिकपणे सार्थ ठरवणारे आहे. हा ‘कर्माचा भोग’च आहे ....नाही का? आता या नाटकाचे भविष्य काय असेल?∙
मिकीला हे नेमके कसे सुचले?
माजी आमदार मिकी पाशेको यांनी कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड व आरजी ने युती न करता एकाच पक्षामध्ये विलिनीकरण करावे, असे सुचवले आहे. त्यांची सूचना जरी भन्नाट असली तरी ते शक्य आहे का? व दुसरा प्रश्न म्हणजे त्यांना हे स्वतःला सुचले की, त्याच्या कानात हे कोणी तरी घातले? गोवा फॉरवर्ड व कॉंग्रेस तसे एकमेकांना अपरिचित मुळीच नाहीत. दोघांचीही तत्वे व काम करण्याची पद्धत समान आहे. मात्र, गोवा फॉरवर्डमध्ये एकच मुखिया आहे तर काँग्रेसमध्ये अनेक. काही दिवसांपासून गोवा फॉरवर्डला कॉंग्रेस मध्ये विलिन होण्याची ऑफर आहे, असे बोलले जात आहे. पण अजून तो योग जुळून आलेला नाही. कदाचित जिल्हा पंचायत व नगरपालिका निवडणुकांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन हो किंवा नाही हा निर्णय होऊ शकतो, असे बोलले जाते. ‘आरजी’चा सध्याचा कल पाहता ते विलिनिकरणाच्या फंदात पडणार नाहीत. गोवा फॉरवर्ड पक्षाकडे ज्या प्रकारे ते पाहतात त्याचा अभ्यास केल्यास त्यांचे सत्ताधारी पक्षाच्या बाजूने झुकते माप दिसते. गोवा फॉरवर्ड कॉंग्रेस पक्षात विलीन व्हावा, असे स्वतः या राष्ट्रीय पक्षांच्या काही स्थानिक नेत्यांना मुळीच पसंत नाही. गोवा फॉरवर्ड कॉंग्रेसमध्ये आला तर विजयबाब तो स्वतः व्यापून टाकील व त्यांचे महत्व कमी होईल, अशी भीती त्यांना नक्कीच असावी. तरी भाजपाला पराभूत करण्याच्या एकाच मुद्द्यावरून पुढे काय होते ते पाहू.
राजेशभाई आहेत कुठे?
कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई सध्य कुठे आहेत? आगामी जिल्हा पंचायत निवडणूक लढविण्यासाठी गोवा फॉरवर्डतर्फे विक्रम परब रिंगणात उतरले आहेत. त्यांना मगो, भाजपच्या काही समर्थकानी पाठिंबा जाहीर केला असून बैठकांनाही ते हजेरी लावत आहेत. आमदार राजेशभाईंनी काँग्रेसमधून भाजपात उडी घेतल्यापासून निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्तेही ते गमावून बसले आहेत आणि भाजपचे पारंपरिक मतदारांनी त्यांना स्वीकारले नाही. त्यामुळे जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत ते गप्पच आहेत. त्यांची भूमिकाच अस्पष्ट आहे, त्यामुळे त्यांचे समर्थकही त्यांच्या विरोधात जात आहेत, त्यामळेच कदाचित राजेशभाई दिसत नाहीत, ते नेमके कुठे आणि कोणाचा प्रचार करणार? याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.