पर्वरी : सर्वांगीण विकास आणि साधनसुविधा निर्माण करणे हे आमच्या सरकारचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळे विरोधी आमदारांच्या मतदारसंघातही दुजाभाव न ठेवता विकासकामे करत आहोत. आज सर्व महामंडळे नियोजनपूर्ण कामे करून स्वयंपूर्ण झाली आहेत. तसेच गोवा गृहनिर्माण महामंडळ सामान्य लोकांना वाजवी दरात आणि उच्च प्रतीचे बांधकाम असलेल्या सदनिका देऊन त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री (CM Goa) डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी केले.
येथील गोवा गृहनिर्माण मंडळाच्या नवीन बहुउद्देशीय मार्केट प्रकल्प आणि मैदानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर, आमदार रोहन खंवटे, उत्तर जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर, सरपंच स्वप्निल चोडणकर, व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई, संचालक व पंच उपस्थित होते.
खाण व्यवसाय बंद असूनही सरकारी तिजोरीत पैशांची कमतरता नाही. कारण सरकार चौकटीबाहेर विचार करून निर्णय घेत आहे. सर्व महामंडळे वेगवेगळ्या योजना राबवून स्वयंपूर्ण झाली आहेत. बांधकामासंबंधी निर्णय घेण्यासाठी तांत्रिक कक्ष स्थापन केला आहे, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत येणाऱ्या काळात सामान्य लोकांसाठी उत्तर गोव्यातील धारगळ येथे दोनशे घरे आणि दक्षिण गोव्यातील शेल्डे येथे दोनशे घरे बांधण्याचा विचार आहे. सर्वसामान्यांना गृहनिर्माण मंडळाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी ई-पावणी पद्धत, निवासी दाखला मर्यादेत वाढ केली आहे. त्यामुळे आज हे महामंडळ स्वयंपूर्ण झाले आहे, असे सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करून मार्केट प्रकल्पाचे लोकार्पण झाले. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत, माविन गुदिन्हो आणि सुभाष शिरोडकर यांनी क्रिकेट खेळून मैदानाचे उद्घाटन केले. गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन केले व त्यांनीच आभार मानले.
दुकानवाटप करताना काळजी घ्या
गृहनिर्माण महामंडळाने या नवीन वास्तूतील दुकाने वाटप करताना जुन्या दुकान मालकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हे मार्केट स्थलांतर करताना जुन्या गाळेधारकांना जे वचन दिले होते त्याचे पालन करावे, अशी सूचना आमदार रोहन खंवटे यांनी केली.
असा आहे मार्केट प्रकल्प
गृहनिर्माण वसाहतीची ही इमारत ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन भागांत विभागली आहे. ‘अ’ इमारतीच्या ९,८०० चौरस मीटर जागेत एक रेस्टॉरंट, ७३ दुकाने आणि २४ कार्यालये, तर ‘ब’ इमारतीच्या ४,०२८ चौरस मीटर जागेचा तळमजला पार्किंग आणि पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर २१ कार्यालये आहेत. त्यात जुन्या दुकानदारांना सामावून घेतले जाईल, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.