
पणजी: ‘खा, प्या, मजा करा’ असा संदेश देणाऱ्या ‘किंग मोमो’च्या राजवटीला आज राजधानी पणजीतून सुरुवात झाली. राजधानीतील कार्निव्हल मिरवणुकीचा उत्साह अतिशय भव्य दिव्य होता. सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांच्यासहित मराठी सिनेसृष्टीतील गोमंतकीय अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची विशेष उपस्थितीत कार्निव्हल मिरवणुकीला सुरुवात झाली.
विविध विषयांवर आधारित, जनजागृती करणारे, संदेश देणारे चित्ररथ तसेच आकर्षक वेशभूषा केलेल्या कलाकारांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता. मिरवणूक पाहण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांसोबतच राज्यभरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. पोलिसांद्वारे मिरवणूक रस्त्यावर चोख बंदोबस्त करण्यात आला होता. तसेच कार्निव्हल दरम्यान चित्ररथ तसेच सादरीकरण करणाऱ्या कलाकारांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती.
गोव्यातील सांस्कृतिक पर्यटन वाढविण्यासाठी सदोदित सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. कार्निव्हल तसेच शिगमोत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक गोव्यात आवर्जून येत असतात. गोव्याची धार्मिक एकता या कार्यक्रमांच्या माध्यमातून दिसून येत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
कार्निव्हलच्या काळात काही प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते, परंतु नागरिकांचे सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले. रोहन खंवटे म्हणाले, कार्निव्हल महोत्सव आज सर्व गोमंतकीयांसाठी खुला होत असून सर्वधर्मीय यात सहभागी होत असतात. कार्निव्हल उत्साह आणि संस्कृतीचे प्रतीक आहे.
मराठी सिनेसृष्टीतील गोमंतकीय अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी या कार्निव्हलात खास उपस्थिती लावली होती.
या कार्निव्हलमध्ये यंदा भारतीय नौसेनेने सहभाग घेतला. वाहतूक नियम पाळण्याचा संदेश देणारा गोवा पोलिसांचा चित्ररथ होता.तसेच पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. वाहतूक नियम कसे पाळावेत, वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती या चित्ररथांवर देण्यात आली होती. यासोबतच आरोग्य खात्याचा अवयव दानाचे महत्त्व सांगणारा चित्ररथ, मिशन रेबिज आदी चित्ररथ सहभागी झाले होते.
राज्यातील अनेक संघांनी विविध विषयांवरचे चित्ररथ आणले होते. ज्यात समुद्र कासवाचे संवर्धन, गोव्यातील पारंपरिक कृषी परंपरा, गोमंतकीय फुले, काजू व्यवसाय परंपरागत मत्स्य व्यवसाय आदीचे चित्ररथ आकर्षक होते. डायनॉसोर, खवले मांजर आदींच्या प्रतिकृती अतिशय लक्षवेधी ठरत होत्या. त्यासोबतच या चित्ररथांवरील एका चित्ररथावर फेड्रीसन मिनेझीस हा लहानगा मुलगा स्वतः गीत गात होता व त्यावर चित्ररथासोबतचा संघ नाचत होता. या लहानग्या मुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
राजधानी पणजीतील कार्निव्हल मिरवणुकीला जरी चांगला मिळाला तरी मिरवणुकीसाठी वाहतुकीत बदल करण्यात आला याचा फटका पणजीत कामानिमित्त आलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला. संध्याकाळी ४ वाजल्यापासून पणजीतील मुख्यमार्ग वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर १८ जून व इतर मार्गावरून सर्व वाहतूक वळविण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी गाड्या अर्धा ते एक तास वाहतूक कोंडीत अडकून पडत होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.