

मडगाव: नवीन वर्षाच्या स्वागतानंतर गोवा राज्य आता कार्निव्हलसाठी सज्ज झाले आहे. गोवा कार्निव्हल २०२६च्या तारखा अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या असून, हा रंगीबेरंगी उत्सव १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान तब्बल पाच दिवस जल्लोषात साजरा होणार आहे.
उत्साहाने भरलेल्या मिरवणुका, संगीत, नृत्य, सजवलेले चित्ररथ आणि या वातावरणात आनंद घेणारे नागरिक तसेच पर्यटक यामुळे गोव्याचा कार्निव्हल सर्वांच्या पसंतीस उतरत असतो. गोवा कार्निव्हल नेहमीप्रमाणे विविध ठिकाणी साजरा केला जाणार असून, १३ फेब्रुवारी रोजी पोर्वोरिम येथे ‘कर्टन रेझर’ कार्यक्रमाने या उत्सवाची अधिकृत सुरुवात होईल.
आयएचएम ते एसीडीआयएल शाळा या मार्गावर होणारी ही मिरवणूक कार्निव्हलचा उत्साह वाढवणारी ठरेल. त्यानंतर मुख्य आकर्षण असलेल्या भव्य मिरवणुका राज्यातील प्रमुख शहरांतून मार्गक्रमण करणार आहेत. १४ फेब्रुवारी, शनिवार रोजी राजधानी पणजी येथे न्यू पाटो ब्रिज ते कॅम्पाल मैदान या मार्गावर भव्य कार्निव्हल परेड होणार आहे.
१५ फेब्रुवारी, रविवार रोजी मडगावमध्ये होली स्पिरिट चर्च ते मडगाव नगरपरिषद चौकापर्यंत रंगतदार मिरवणूक पाहायला मिळणार आहे. १६ फेब्रुवारी, सोमवार रोजी वास्को येथे सेंट अँड्र्यूज जंक्शन (स्वातंत्र पथ) ते जोशी चौक/रेल्वे स्थानकापर्यंत कार्निव्हलचा जल्लोष रंगणार आहे. उत्सवाचा समारोप १७ फेब्रुवारी, मंगळवारी दोन ठिकाणी एकाच वेळी होणार आहे.
म्हापसा येथे मिलाग्रेस चर्चमागील कम्युनिदाद इमारतीपासून देव बोडगेश्वर मंदिराजवळील कम्युनिदाद मैदानापर्यंत, तर मोरजी येथे मोरजी खिंड ते राज सुपर मार्केटजवळील मोरजी जंक्शनपर्यंत मिरवणुका काढल्या जाणार आहेत.
या काळात स्थानिक नागरिकांसह देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे. पारंपरिक नृत्यप्रकार, गोव्याची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, संगीत, खाद्यसंस्कृती आणि आनंदी वातावरण अनुभवण्यासाठी गोवा कार्निव्हल २०२६ एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.