Calangute Cylinder Blast: मोठी दुर्घटना! सात सिलिंडर्सच्या स्फोटात 50 झोपड्या आगीच्या भक्षस्थानी, कळंगुट येथे अग्नितांडव

एक जखमी; बेकायदा वस्त्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर; पंचाच्या नातेवाईकाच्या जागेमध्ये वस्ती
Gas Cylinder Blast At Calangute
Gas Cylinder Blast At CalanguteDainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Cylinder Blast आगरवाडा-कळंगुट येथील कामगारांची झोपडपट्टी....रविवार असल्याने बहुतांश कामगार आणि त्यांचे कुटुंबीय नेहमीच्या दगदगीपेक्षा काहीसे स्वस्थ होते. काहीजण दुपारचे जेवण करून वामकुक्षी घेत होते, काहीजण जेवण बनवण्यात व्यस्त होते, तर काहीजण टीव्ही, मोबाईलवर मनोरंजनात गुंतले होते.

लहान मुले खेळ खेळत होती. अचानक साडेबाराच्या सुमारास ‘धडाम धूम’ असा आवाज झाला आणि सगळी झोपडपट्टी हादरली. काही कळायच्या आत एकच गलका झाला. प्रत्येकजण ओरडत आवाज झालेल्या दिशेने धावत होते.

अनेकांनी झोपड्या सोडून मोकळ्या जागी धाव घेतली. सुरुवातीला काही झोपड्यांना आग लागली होती. त्या आगीने रौद्र रूप धारण केल्याने पाहता पाहता एकापाठोपाठ सात सिलिंडर्सचा स्फोट झाला आणि एक भरगच्च लोकवस्ती बेचिराख झाली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आगरवाडा-कळंगुट येथील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत सुमारे ५० झोपड्या जळून खाक झाल्या, तर काही झोपड्यांना झळ बसली. स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. या आगीमुळे झोपड्यांतील सुमारे सात सिलिंडर्सचा स्फोट झाल्याने मोठ्या आवाजाने परिसरात घबराट निर्माण झाली.

यावेळी सिलिंडर स्फोटामुळे आणि प्लास्टिक साहित्याला लागलेल्या आगीमुळे आकाशात धुराचे प्रचंड मोठे लोळ उठले. त्यामुळे परिसरातील रहिवाशांनी मिळेल त्या मार्गाने घराबाहेर धाव घेतली. मात्र, झोपड्यांमधील घरगुती साहित्य व मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. एकापाठोपाठ तब्बल सात सिलिंडर्सचा फुटल्याने ही आग भडकली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तीन तास अथक परिश्रम घेत आग विझवली.

सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली. मात्र, आग विझविण्याचा प्रयत्नात एका कामगाराच्या हाताला दुखापत झाली. सुरवातीस या रुग्णास म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात आणि नंतर गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले.

अग्निशमन दलाचे परिश्रम फळाला

  • पिळर्ण, म्हापसा, पर्वरी आणि पणजी मुख्यालयातील अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. यावेळी चार बंबांच्या मदतीने ३० जवानांनी ही आग शमवली.

  • झोपड्यांमध्ये असणारी भांडी, पैसे, मौल्यवान वस्तू, इतर साहित्य तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळाली.

  • आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही. मात्र, एका झोपडीत आग लागून सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.ही वस्ती दाटीवाटीने असल्याने अग्निशमन दलास आगीवर नियंत्रण मिळवताना बरेच परिश्रम घ्यावे लागले.

  • जवानांकडून आग आटोक्यात आणेपर्यंत इतर पाच सिलिंडर्स फुटले. जवानांनी गॅस भरलेले तब्बल ५० सिलिंडर्स बाहेर काढले. काही झोपड्यांमध्ये तीन ते चार सिलिंडर सापडले. काही सिलिंडर पेटत असतानाच जवानांनी बाहेर काढले.

  • गॅस सिलिंडर्स, वारा, वाढते तापमान व झोपड्यांमधील लाकूड, बांबू, प्लास्टिक, ताडपत्री, कापड इत्यादी ज्वलनशील साहित्यामुळे आग वेगाने पसरली.

Gas Cylinder Blast At Calangute
Goa Chess Competition : बुद्धिबळात जोशुआ तेलिस विजेता; मुलींत स्कायला रॉड्रिग्ज अव्वल

साडेतीन लाख भस्मसात

कर्नाटकमधील एका कामगाराने आपल्या खोलीत स्टीलच्या डब्यात रोख ३.८० लाख रुपये तसेच सोनसाखळी ठेवली होती, अशी माहिती उपलब्ध झाली. यातील पैसे व दागिने जळाल्याचा दावा त्याने केला. तो वाहनचालक म्हणून काम करतो. त्याची झोपडी पूर्णतः जळाली. आपल्या बहिणीच्या लग्नासाठी त्याने ही कष्टाची पुंजी जमा केली होती, असे सांगण्यात आले.

‘तो’ पंच कोण?

कळंगुटमधील एका पंचाच्या नातेवाईकाच्या जागेत कामगार व मजुरांच्या १०० पेक्षा अधिक झोपड्या आहेत. आग कशी लागली किंवा सिलिंडरचा स्फोट नेमका कसा झाला, याबाबत अद्याप ठोस कारण समजू शकलेले नाही. सिलिंडर्सचे एकापाठोपाठ सात स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला.

एकाच ठिकाणी ३०० लोक

येथील लोक किनारी भागांतील हॉटेलमध्ये काम करून उदरनिर्वाह चालवतात. हे कामगार अधिकतर कर्नाटक, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालचे आहेत. बहुतांश झोपड्या ताडपत्री किंवा पत्र्याच्या साहाय्याने उभारल्या आहेत. या झोपड्यांमध्ये सुमारे ३०० हून अधिक लोक वास्तव्य करतात.

Gas Cylinder Blast At Calangute
Vijai Sardesai: गोव्याचे मुख्यमंत्री नकली रामभक्त, 'चायनीज प्रॉडक्ट', नो गॅरन्टी, नो वॉरन्टी

पुनर्वसनाची योजनाच नाही : राणे

पणजी गोव्यातील झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची कोणतीही योजना गोवा पुनर्वसन मंडळाकडे नाही. या झोपडपट्ट्यांमधील अस्वच्छतेमुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे, हेही सरकारला चांगलेच ठाऊक असल्याची माहिती नगरविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली होती.

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी मंत्री विश्वजीत राणे यांना झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाशी संबंधित अतारांकित प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

म्हापसा येथे गंगानगर, मडगावात मोती डोंगर, बायणा, मांगोर हिल, खारीवाडा तर वाळपई पालिका क्षेत्रात वेळुसवाड्यात झोपडपट्टी आहे, असे मंत्री राणे यांनी विधानसभेत सांगितले.

Gas Cylinder Blast At Calangute
भटवाडी-नानोडा येथील चिरेखाणीत 19 वर्षीय तरूण बुडाला, दिवसभरातील दुसरी घटना

आगीचे कारण अस्पष्ट : रविवारी (ता.१३) दुपारी १२.३०च्या सुमारास ही दुर्घटना घडली. आपल्या डोळ्यांदेखत घर जळत असल्याचे पाहून अनेकांनी टाहो फोडला. अनेकांची आयुष्यभराची कमाई आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. तथापि, सिलिंडरचा स्फोट होण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पिळर्ण अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

पंचायतीचेे दुर्लक्ष : या परिसरात शेकडो अवैध झोपड्या गेल्या काही वर्षांपासून उभ्या आहेत. या झोपड्यांकडे पंचायतीचे लक्ष नसल्यामुळे त्या फोफावल्या आहेत. पंचायतीने वेळीच कारवाई केली असती, तर असा प्रकार घडला नसता, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. या झोपड्यांमध्ये अधिकतर कामगार व रोजंदारी मजूर वास्तव्य करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com