Goa BJP News
पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना समाजमाध्यमांवर लक्ष्य करण्याचे गलिच्छ राजकारण केले जात आहे. मात्र आम्ही सर्व अकराही मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत खंबीरपणे उभे आहोत, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्याविरोधातील आरोप राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप काल केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ शिरोडकर व पर्यटनमंत्री यांनी भाजप (BJP) कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर उपस्थित होते. खंवटे यांनीही मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे व निरर्थक आरोप केले जात असल्याचे सांगितले.
सर्व ११ मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत खंबीरपणे उभे आहेत. कोणत्याही विषयावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचे गलिच्छ राजकारण केले जात आहेत. त्यासाठी काही जुन्या व्हिडिओंचा आधार घेत नवे व्हिडिओ बनविले जात आहेत. माझ्या सुसंस्कृत मनाला ते पटले नाही म्हणून पत्रकार परिषद संबोधित करण्याचा निर्णय घेतल्याचे जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना लक्ष्य करणारे व्हिडिओ समाजमाध्यमावर फिरू लागल्यावर हे व्हिडिओ राजकीय हेतून प्रेरित होऊन काढले जात असल्याचा आरोप काल मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ शिरोडकर व पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस ॲड नरेंद्र सावईकर होते.
मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या प्रश्नाला हात घातला आहे. त्यांनी एकेक करून राज्याला भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब करणे सुरू केले आहे. हे कोणाला आवडत नसावे अशाच प्रवृत्ती, विरोधक मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन करणाऱ्या व्हिडिओंमागे असावेत. जनता सर्व जाणते त्यामुळे अशा खोडसाळ व्हिडिओंचा काही उपयोग होणार नाही, असे शिरोडकर म्हणाले.
सरकारकडून सणावाराला जनतेला मिठाई पाठवली जाते. आतिथ्यशीलतेसाठी तसे करावे लागते. महिला स्वयंसेवी गटाकडून ही मिठाई खरेदी केली जाते. त्याला ४० लाखांचे लाडू म्हणून हिणवणे योग्य नाही. महिला सक्षमीकरणाचा विषय म्हणून याकडे पाहिले गेले पाहिजे होते. मुख्यमंत्र्यांची बदनामी करणारे कोण, ते असे कशाला करतात, हे दडून राहिलेले नाही, असे मंत्री रोहन खंवटे म्हणाले.
जमीन हडप प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी मी भाजप पक्षप्रवेशावेळी केली होती. कोणालाही सरकारने घोटाळे केले असे वाटत असेल तर न्यायालयात जाऊन त्यांना दाद मागता येते. काहीही न होता घोटाळा घोटाळा म्हणून ओरडण्यात काही अर्थ नाही. विरोधकांनीही राज्याच्या हितार्थ भूमिका बजावायची असते. हे सरकार गोमंतकीय जनतेच्या हितार्थ वावरते हे प्रत्येक कृतीतून दिसते, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.
सध्या रस्ते खराब झाल्यावरून टीका होत आहे. राज्यभरात भविष्याचा विचार करून भूमिगत वीजवाहिन्या घालण्यात येत आहेत. त्या कामांमुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले, रस्ते खचले आहेत. ते दुरुस्त करण्यात येत आहेत. सप्टेंबर सरत आला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही, हेही विचारात घेतले पाहिजे.
सुभाष शिरोडकर, जलसंपदामंत्री
जनतेसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपले दरवाजे सदाच खुले ठेवले आहेत. विधानसभेत वेगवेगळे विषय चर्चेला आले आणि सरकारने ते सोडवण्यासाठी पावलेही टाकली आहेत. असे असतानाही विधानसभेतील टीकेचे व्हिडिओ आता प्रसारित करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
रोहन खंवटे, पर्यटनमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.