राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाचा चर्चा गेले काही महिने अधूनमधून सुरू असते. अलीकडे जरा या चर्चेने गंभीर रूप धारण केले आहे. असा फेरबदल करावा लागेल असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर तो फेरबदल कधी होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वचजण इच्छुक आहेत. मंत्रिमंडळ फेरबदल विधानसभा अधिवेशनानंतर होईल असे काही जणांना वाटत होते आता तो गणेश चतुर्थीनंतर होईल असे वाटते. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांपैकी कोणाला बाप्पा पावणार याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. नेते नवस करतात, काही जण जाहीरपणे तो फेडतातही. त्यामुळे गणेश चतुर्थीत विघ्नहर्ता गणराया कोणाचे राजकीय विघ्न दूर करेल हे नंतरच समजणार आहे. ∙∙∙
गणेश चतुर्थीच्यानिमित्त राज्यात विविध ठिकाणी गोमंतकीयांना शुभेच्छा देणारे अनेक मोठे फलक उभारण्यात आले आहेत. अर्थातच राजकारण्यांची त्यावर छबी आहे, हे सांगायची काही गरज नाही. पण साखळी मतदारसंघात काही नामफलक लक्ष वेधून घेत होते. आता साखळी मतदारसंघ हा मुख्यमंत्र्यांचा. मात्र काही शुभेच्छा फलकांवर मुख्यमंत्री हात उंचावून शुभेच्छा देताना दिसले. एरव्ही सणावारीच्या शुभेच्छा देताना नमस्कार केला जातो, पण मुख्यमंत्र्यांनी यावेळी हाताचा का बरे वापर केला असेल...हा विचार मात्र काही जणांना पचनी पडलेला नाही. ∙∙∙
कॉंग्रेस भवनमधील शनिवारच्या पत्रकार परिषदेला नेत्यांची भरगच्च उपस्थिती होती. प्रभारी माणिकराव ठाकरे, डॉ. अंजली निंबाळकर, खासदार विरियातो फर्नांडिस, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार एल्टन डिकॉस्ता, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव मंचावर होते. मंचावर एवढ्या खुर्च्या ठेवण्यासाठी जागा नव्हती. यामुळे विरियातोंच्या खुर्चीच्या चार पायांपैकी एक पाय अधांतरी होता. ते खुर्चीवर बसणार एवढ्यात कोणीतरी सांभाळून, अन्यथा पडाल असा इशारा त्यांना दिला. हसून खुर्चीच्या पायाकडे विरियातो यांनी पाहिले. त्यांनी पायांची दिशा थोडी बदलली आणि खुर्चीचे चारही पाय मंचावरच असतील याची काळजी घेतली. हे करताना हसत ते म्हणाले, आघाडीची सवय आता लागली आहे, यामुळे कसरत कशी करावी हे शिकलो आहे. याचा उपयोग खूर्चीचा तोल सावरण्यासाठी नक्कीच होईल. आता बोला. ∙∙∙
कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सचिव डॉ. अंजली निंबाळकर शनिवारी प्रथमच कॉंग्रेसच्या राज्य सचिव प्रभारी म्हणून गोव्यात आल्या. विमानतळावर उतरल्या उतरल्या त्यांनी म्हादई विषयात नाक खुपसून कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला आणू असे सांगितले. त्यामुळे त्या पणजीतील पत्रकार परिषदेत आणखीन काही विधाने करतील असे पत्रकारांना वाटले होते. प्रत्यक्षात त्यांना प्रश्न विचारले तेव्हा माणिकराव ठाकरे यांनीच परस्पर उत्तरे दिली. निंबाळकर यांनीच बोलावे असा पत्रकारांनी आग्रह धरला तेव्हा त्या नंतर बोलतील असे ठाकरे यांनी सांगितले तेव्हा कॉंग्रेसचे हेच का ते महिला सक्षमीकरण अशी जोरदार विचारणा पत्रकारांनी केली तेव्हा चार वाक्ये निंबाळकर बोलल्या. वरिष्ठ नसतील तेव्हा मीच भरभरून बोलेन असे आश्वासन देण्यासही त्या विसरल्या नाहीत. ∙∙∙
महापौर उदय मडकईकर सध्या कोणत्या पक्षात आहेत? अशी विचारणा होत आहे. बाबूशनी आपल्या पुत्राला त्या खुर्चीवर बसविले. त्यामुळे उदय राव दुरावले. कोणतेही पद नसले की काय होते त्याचा अनुभव सध्या ते घेत आहेत. एक उदय नव्हे, तर अनेक जणांची सध्या तीच अवस्था आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भले भले अशाच अवस्थेत आहेत. त्यांना कोणत्या पक्षाची कास धरावीस, तेच कळेनासे झाले आहे. २०२२ मधील निवडणुकीत फॉर्मात असलेल्या ‘आप’ व आरजीची स्थितीही गोंधळलेली आहे. तेथे उदय रावांचे काय? ∙∙∙
हणजुणे येथे पाणीबाणी आहे. लोक आमदारांकडे गेले की पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेले कर्मचारी थोडे हलतात. त्यानंतर पुन्हा पाण्यासाठी दाहीदिशा सुरू होते. आमदार दिलायला लोबो या सक्रिय आमदार. जनतेने तक्रार केल्यावर त्या थेट अधिकाऱ्यांशी बोलतात. अलीकडे पाणी पुरवठा करण्यांनी एक वेगळी शक्कल लढवली आहे. आमदारांचा दूरध्वनी आला की हणजुणेतील देऊळवाड्यावर पाणी नाही ते त्यांना समजतात. ते पाणी सोडतात आणि सखल भागातील घरांच्या नळांना पाणी आल्याचा व्हिडिओ काढून तो आमदारांना पाठवतात. यामुळे उंचावर घरे असलेले पाण्यापासून वंचितच राहतात. त्याशिवाय या घरांना मागील भागात दिलेला पाणी जोड आता पुढील भागात द्यावा लागेल असे स्थानिकांना सांगण्यात येत आहे. केवळ जलवाहिनीची दिशा बदलून पाणी कसे मिळेल या कोड्याचे उत्तर मिळत नसल्याने पाण्यासाठी काय करावे या विवंचनेत ऐन गणेश चतुर्थीत हणजुणेवासीय आहेत. ∙∙∙
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एका टीव्हीवरील कार्यक्रमात सर्वसामान्यांना परवडेल असे घर उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली. दहा ते पंधरा लाखात गरजू गोमंतकीयांना घराच्या चाव्या मिळतील, असे सांगत त्यांनी चतुर्थीची भेट दिली. या घोषणेनंतर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला, आता ही योजना लवकरात लवकर मार्गी लागावी, यासाठी गरजू गोमंतकीय श्रीगणरायाकडे प्रार्थना करू लागले आहेत. या दहा दिवसात गणपती पावेल, असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण होत आहे. चतुर्थीच्या पूर्वसंधेला मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली ही घोषणा लवकरात लवकर पूर्ण होवो, असे साकडे ते गणरायाला घालत आहेत. ∙∙∙
या दिवसात शिक्षण क्षेत्रातील विविध घटना गाजत आहेत. दोन शाळांमध्ये शिक्षकांनी लहान मुलांना केलेली अमानुष मारहाण हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय ठरला. तशातच एका मुख्याध्यापिकेची केली गेलेली बदली व नंतर त्यावरून असंतोष निर्माण झाल्यानंतर ती रद्द करण्याची सरकारच्या कृतीबाबत संशय निर्माण झाला. अनेक भाजपवाल्यांनाही त्यामुळे हे नेमके काय चाललेय, असा प्रश्न पडला. हे सगळे प्रकार ऐन शिक्षकदिन साजरा करताना घडावेत, याबद्दल अनेकांना वाईट वाटले. मुद्दा तेवढ्यावर संपला नाही, तर काहींनी सरकारवर सूड उगविण्याच्या धादांत विद्यार्थ्यांना आझाद मैदानावर उतरविले व त्यानंतर दोतोर मुख्यमंत्र्यांना संबंधितांना शिक्षणात राजकारण न आणण्याची तंबी द्यावी लागली. पण शिक्षणतज्ञ वेगळेच सांगतात. ते म्हणतात, की शिक्षणाचे राजकारण करण्याची वेगळी गरज नाही, राजकारणीच या क्षेत्रात आलेले आहेत. बहुतेक शिक्षण संस्था राजकारण्यांच्या बनलेल्या आहेत. त्यात सर्वच पक्षाचे नेते आहेत. बहुतेक आमदार या ना त्या शिक्षण संस्थेचे चालक आहेत, मग शिक्षणाचे राजकारण होणार नाही, तर काय होणार? असा प्रश्न ते करतात. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.