मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आज तातडीने दिल्लीला बोलावून घेण्यात आले असून, मंत्रिमंडळाच्या फेररचनेसंदर्भात तेथे निर्णय घेऊन राज्यात लवकरच एका मंत्र्याचा शपथविधी होईल, अशी अपेक्षा आहे. ‘मंत्रिमंडळ फेररचनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलाविण्यात आल्याची माहिती आहे. रविवारीच त्यांनी दक्षिण गोव्याला भेट देऊन नवागत आमदारांपैकी एक - आलेक्स सिक्वेरा यांना लवकरच मंत्रिमंडळात सामावून घेण्याचा शब्द दिला आहे,’ अशी माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.
आपल्या दोन दिवसीय दिल्ली भेटीत मुख्यमंत्री गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सिक्वेरा यांना सामावून घेण्यासाठी ज्या एका मंत्र्याला डच्चू दिला जाईल, त्यात मंत्री नीळकंठ हळर्णकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्याशिवाय गोविंद गावडे, सुभाष फळदेसाई यांची नावे या यादीत होती. त्यामुळे निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांना तारेवरील कसरत करावी लागेल. या संदर्भातही मुख्यमंत्री सावंत पक्ष श्रेष्ठींशी सल्लामसलत करतील, अशी अपेक्षा आहे.
पूर्वपीठिका आणि नव्या हालचाली
मंत्रिमंडळ फेररचनेबरोबरच आठ नवागतांपैकी किमान पाच जणांना महामंडळांचे वाटप करण्याची योजना आहे.
नवोदितांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर त्यांना आठ दिवसांत पदे देण्याचे कबूल करण्यात आले होते. परंतु त्यानंतर पक्षाचे प्रभारी व ज्येष्ठ नेत्यांनी आपण त्या गावचेच नसल्याची भूमिका घेतली होती.
सिक्वेरा यांना तर ‘आम्ही तुम्हाला कोणताही शब्द दिला नव्हता. ज्यांनी दिला त्यांनाच जाऊन विचारा’, असे उत्तर ऐकून घ्यावे लागले होते.
खाण पट्ट्यांची पहिल्या टप्प्यातील लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पडल्याने मुख्यमंत्री सध्या निवांत आहेत. प्रत्यक्ष खाणी कधीही सुरू होऊ द्यात; परंतु प्रक्रिया सुरू करून दिली.
दिगंबर कामत, मायकल लोबो यांना वगळून इतरांना शिल्लक असलेली काही महामंडळे वाटप करण्यात येऊ शकतात.
कामत यांनी ‘आपला मंत्रिमंडळात समावेश नको’, अशी भूमिका सुरवातीपासून घेतली होती. सिक्वेरा हे ज्येष्ठ नेते असल्याने आपणाऐवजी त्यांना मंत्रिमंडळ द्यावे, अशी सूचना त्यांनी केली होती.
यामुळे सिक्वेरा यांचे समर्थक कार्यकर्तेही नाराज झाले होते. त्यामुळे भाजप सरकारविरोधात नाराजी पसरली असल्याचा सुगावा पक्षश्रेष्ठींना लागला.
त्यामुळे लोक सरकारवर खूष आहेत, अशी मानसिकता घेऊन मुख्यमंत्री दिल्लीला गेले असल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.
‘त्यांची’ उद्विग्नता आणि रवी यांचा दौरा
भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी हे नुकतेच राज्यात येऊन गेले. तीन महिन्यांतून एकदा त्यांचा दौरा होत असल्याचे सांगण्यात आले तरी ते आल्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होणार का, याविषयीची विचारणा त्यांना पत्रकारांना केली होती. त्यामुळे त्यांनी याविषयी ‘मुख्यमंत्र्यांना विचारा’ असे सांगून वेळ मारून नेली होती. महत्त्वाची बाब म्हणजे प्रभारी हे राज्यातील राजकारणाविषयीची सर्व माहिती पक्षश्रेष्ठींना देत असतात, यावरून राज्यात मंत्रिमंडळ फेरबदल आणि पक्षात आलेल्या आठजणांमधील उद्विग्नता रवी यांनी श्रेष्ठींच्या कानावर घातलेली असावी. त्यामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांना श्रेष्ठींनी बोलावले असावे, अशीही चर्चा भाजपच्या अंतर्गत गोटात सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.