भाजपाचे कर्नाटकचे नेते व गोव्याचे प्रभारी सी. टी. रवी यांना सत्ताधारी पक्ष संघटनेच्या केंद्रीय सरचिटणीसपदावरून हटविण्यात आले असून गोव्याच्या जबाबदारीतूनही मुक्त करण्यात आले आहे.
रवी यांना असलेला केंद्रीय प्रभारी बी. एल. संतोष यांचा पाठिंबा व त्यातून निर्माण झालेली त्यांची बेमुर्वतखोरी तसेच गोव्यातील मुजोरी कारण असल्याची माहिती मिळते.
बी. एल. संतोष यांनी कट्टरवादी सी. टी. रवी यांना कर्नाटकात मुक्तद्वार दिले होते. एवढेच नव्हे, तर त्यांच्याच पाठिंब्याने ते गोव्याचे प्रभारी बनले होते.
शिवाय साधी आमदारकी असतानाही ते गोव्यात स्वतःला मंत्रिपदाचा दर्जा देण्याची मागणी करीत व आमदारकीचा पराभव झाल्यानंतरही गोव्यात त्यांनी ‘पायलट कार’ सुरक्षा मागितली होती.
कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी व नंतरही सी. टी. रवी यांनी कर्नाटकचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा अपमान केला. त्यांचे निवडणुकीपूर्वीचे एक सनसनाटी विधान म्हणजे, ‘‘भाजपा हा सर्व हिंदूंचा एकमेव पक्ष असून एकच लिंगायत घटक आम्ही गृहीत धरू शकणार नाही.’’
या विधानामुळे त्यांनी लिंगायत समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला असा संदेश गेला व येडियुरप्पा व लिंगायत समाजाने रवी व भाजपाला धडा शिकविला. रवी यांचे दुसरे गाजलेले विधान म्हणजे, ‘कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे उमेदवार (येडियुरप्पांच्या) किचनमध्ये ठरणार नसून ते दिल्लीत निश्चित केले जातील,’’ असे सांगून रवी यांनी दिल्ली येथेच म्हणजे आपल्या नजरेखालून उमेदवारांची यादी जाणार आहे, असे सूचित केले होते.
या विधानालाही भरपूर प्रसिद्धी मिळाली व येडियुरप्पांना खजील व्हावे लागले होते. त्यामुळे पाचव्यांदा सी. टी. रवी निवडणूक लढवत असलेल्या चिकमंगळूर मतदारसंघात तोंडही न दाखवता येडियुरप्पा यांनी शेजारच्या मतदारसंघात प्रचार करणे पसंत केले होते. लिंगायत समाजानेही रवींकडून तोंड फिरविले आणि चारवेळा आमदार बनलेल्या रवी यांना पराभवाचा सामना करावा लागला.
या दोन्ही विधानांची भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी दखल घेतली. शिवाय कर्नाटकच्या निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करताना सी. टी. रवी व बी. एल. संतोष यांनी तेथे चुकीच्या पद्धतीने आखणी केली, असा निष्कर्ष काढण्यात आला.
त्याचा सुगावा लागताच रवी यांनी येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी धाव घेऊन त्यांना साष्टांग नमस्कार घालून त्यांची जाहीर माफी मागितली. आपला नमस्कार घालतानाचे छायाचित्रही त्यांनी ट्विटरवर टाकले. त्यामुळेही रवी यांची चांगलीच शोभा झाली होती.
मुजोरी ठरली कारणीभूत ः भाजपाच्या केंद्रीय सरचिटणीसपदावरून हटविले
येडियुरप्पांचे अपमान प्रकरण भोवले
कर्नाटकचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना सतत नामोहरम करून त्यांचा जाहीर अपमान करण्याचे प्रकरणही रवी यांना भोवले व केंद्रीय नेते कमालीचे नाराज बनल्यामुळे बी. एल. संतोष त्यांना वाचवू शकले नाहीत. केंद्रातील संतोष यांचे स्थानही कर्नाटकातील मानहानिकारक पराभवानंतर डळमळीत बनले आहे.
गोव्याच्या मंत्र्यांकडून अवाजवी मागण्या
गोव्याच्या दौऱ्यावर आल्यावर रवी स्थानिक मंत्र्यांना आपल्या हॉटेलवरच बोलावून घेत व त्यांच्यासमोर अवाजवी मागण्या ठेवत, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी आज ‘गोमन्तक’ला दिली. अनेक मंत्री रांग लावून त्यांची भेट घेण्यासाठी थांबत.
त्यांना विमानतळाहून आणून परत पोचविण्यासाठी सरकारी वाहनाव्यतिरिक्त मंत्र्यांच्या मोटारीही दिमतीला असत. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची मर्सिडिज गाडी तर अनेकदा त्यांच्या दिमतीला असे.
मंत्र्यांची मर्सिडिज व दुसरी सफारी गाडी अशा दोन गाड्या त्यांच्या बाहेर असत. साधे आमदार असतानाही रवी ‘पायलट कार’ घेऊन सायरन वाजवत कसे जातात, असे वृत्त यापूर्वी ‘गोमन्तक’ने प्रसिद्ध केले आहे.
गोव्यात होती चांगली बडदास्त
बी. एल. संतोष यांचे पाठबळ असल्याने गेली पाच वर्षे सी. टी. रवी भारतीय राजकारणात बरेच प्रबळ बनले होते व महाराष्ट्र, तमिळनाडूसह गोव्याचेही त्यांना प्रभारीपद देण्यात आले होते. दुर्दैवाने रवी यांचे इंग्रजी व हिंदी भाषेवरही प्रभुत्व नाही.
त्यामुळे त्यांना स्थानिक नेत्यांशी संवाद साधताना अडचणी येत. महाराष्ट्रात त्यांना त्यामुळे महत्त्व लाभले नाही, परंतु गोव्यात मात्र भाजपाचे मुख्यमंत्री व मंत्रीही तसेच असल्याने त्यांचा वचक निर्माण होऊन चांगलीच बडदास्त ठेवण्यात येत होती.
जमीन व्यवहारातही होता रस
गोव्यातील जमीन व्यवहारातही सी. टी. रवी यांना रस होता, अशी माहिती प्राप्त झाली आहे. कदंब पठारावर असलेले ‘हिल्टन’ हॉटेल हे रवी यांच्या निकटवर्तीयांचे असून त्या हॉटेलला सलग असलेली जमीन खाली रायबंदरपर्यंत जाते.
ही जमीन बांधकामयोग्य बनविण्यासाठी आवश्यक ते कायदेशीर सोपस्कार करण्याचा खटाटोप त्यांनी चालविला होता, अशी माहिती भाजपाच्याच सूत्रांनी या प्रतिनिधीला दिली.
‘पायलट कार’ची केली होती मागणी
अलीकडेच रवी यांचे गोव्यात आगमन झाले. त्यावेळी ते आमदार नसल्याने त्यांना ‘पायलट कार’ पाठविण्यात आली नव्हती, परंतु रागाने त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून ‘पायलट कार’ची मागणी केली होती व ती दिलीही होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.