Bicholim Municipality चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारपासून (ता.१७) दोन दिवस डिचोली बाजारात वाहनांना ‘नो एन्ट्री’ करण्यात येणार आहे. चतुर्थी बाजारावेळी उसळणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारपासून चतुर्थीच्या दिवसापर्यंत सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत आपत्कालीन सेवा वगळता अन्य कोणत्याही वाहनांना बाजारात प्रवेश करण्यास बंदी असणार आहे. डिचोली पालिका आणि वाहतूक पोलिस विभागाचे अधिकारी यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
आधीच बेशिस्त पार्किंगमुळे बऱ्याचदा बाजारात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. दरवर्षी चतुर्थी बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असते. गणेशभक्त ग्राहकांना सुरळीतपणे बाजार करता यावा आणि वाहतुकीची समस्या निर्माण होता कामा नये.
यासाठी चतुर्थीच्या आधी दोन दिवस म्हणजेच माटोळी बाजारावेळी बाजारात दुचाकीसह अन्य वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येते. त्यानुसार येत्या रविवारपासून दोन दिवस बाजाराला जोडलेले सर्व मार्ग बंद करण्यात येणार आहेत.
फक्त व्यापाऱ्यांची वाहने सकाळी 7 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वा.नंतर बाजारात सोडण्यात येणार आहेत. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांसह पालिकेचे कर्मचारीही तैनात असणार आहेत.
बाजारातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी चतुर्थीच्या आधी दोन दिवस बाजारात वाहनांना बंदी करण्यात येणार आहे. चतुर्थी बाजारावेळी डिचोलीत वाहनांची संख्या वाढत असते.
त्यामुळे पार्किंग समस्या निर्माण होऊ नये, म्हणून अतिरिक्त जागा पार्किंगसाठी आरक्षित करण्यात येणार आहे. चतुर्थीच्या बाजार काळात ग्राहकांनी शिस्त पाळावी. वाहने व्यवस्थित पार्क करावीत. सर्वांनी पालिकेला सहकार्य करावे.
- कुंदन फळारी, नगराध्यक्ष, डिचोली
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.