शांतादुर्गा विद्यालय येतेय हळूहळू पूर्वस्थितीत...
Goa: इयत्ता बारावीचे ऑफलाईन वर्ग (12th offline classes) सुरु करण्याचा प्रयोग यशस्वी ठरल्याने आता लवकरच डिचोलीतील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात (Shri Shantadurga High School Bicholim) अकरावीचे ऑफलाईन वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. सरकारने नियुक्त केलेल्या कोविड नियंत्रण कृती दल (Covide Control Action Team) आणि तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉ.शेखर साळकर (Dr Shekhar Salkar) यांनीही एसओपी पाळून अकरावीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून या विद्यालयात अकरावीचे ऑफलाईन वर्ग सुरु होण्याचे संकेत मिळाले आहेत.
डॉ. साळकरांकडून पाहणी
विद्यार्थी पटसंख्येबाबतीत अग्रेसर असलेल्या शांतादुर्गा विद्यालयात गेल्या ता. 6 रोजीपासून मार्गदर्शक नियमांचे पालन करून इयत्ता दहावी आणि बारावीचे ऑफलाईन वर्ग सुरु करण्यात आले आहेत. सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या कोविड नियंत्रण कृती दल आणि तज्ज्ञ समितीचे डॉ. शेखर साळकर यांनी गुरुवारी शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला.
प्रत्येक वर्गात जाऊन पाहणी केली. त्यावेळी प्रत्येक वर्गात सामाजिक नियमांचे व्यवस्थितरित्या पालन होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी विद्यालय संस्थेचे अध्यक्ष विजय सरदेसाई, विद्यालयाचे व्यवस्थापक अरुण साळकर, खजिनदार राजेश धोंड, स्पोर्ट्स अकादमीचे व्यवस्थापक अभिजित तेली आणि प्राचार्य ऑरलांडो मिनेझिस तसेच अद्यापक समितीचे प्रमुख प्रा. प्रितेश पेडणेकर, प्रा. सर्वेश केरकर आणि दीप्ती सावंत उपस्थित होते.
मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन होण्याबाबत घेतलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी व्यवस्थापन मंडळाची स्तुती केली. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे लसीकरण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नंतर डॉ. शेखर साळकर यांनी व्यवस्थापन आणि शिक्षकांसमवेत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. एसओपी पाळून अकरावीचे ऑफलाईन वर्ग सुरु करण्यास हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.