Govind Gawade: संघर्ष आणि अनेक अडथळे पार करून मिळणारे यश जीवनात समाधान मिळवून देते. धनसंपत्ती आणि राजकीय सत्ता म्हणजे यश नव्हे. तर शिस्त आणि कार्यातून मिळणारी आत्मिक शांती, हेच जीवनातील यश आहे, असे मत कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केले.
भावकई-मये येथील श्री रामपुरुष देवस्थानच्या पंधराव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळ्यात मंत्री गावडे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. नवीन तंत्रज्ञान ही आजच्या शिक्षणाची गरज असली, तरी या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होता कामा नये, असे मंत्री श्री. गावडे यांनी सांगून मुलांमधील गुण ओळखून आवडीच्या क्षेत्रात भवितव्य घडविण्यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले.
सोमवारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रेमेंद्र शेट विशेष अतिथी या नात्याने उपस्थित होते. अन्य मान्यवरात जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, सरपंच दिलीप शेट, देवस्थानचे अध्यक्ष अरविंद होबळे गोलतकर, सल्लागार शाणू होबळे आदींचा समावेश होता. अरविंद होबळे गोलतकर यांनी स्वागत केले.
आमदारांचा सत्कार
देवस्थान समितीतर्फे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन प्रेमेंद्र शेट यांचा सन्मान करण्यात आला.
प्रेमेंद्र शेट यांनी आपले मनोगत व्यक्त करताना देवस्थान समितीला धन्यवाद दिले. शंकर चोडणकर आणि दिलीप शेट यांनीही आपले विचार मांडले. सर्वप्रथम आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह मंत्री गावडे यांनी श्री रामपुरुष देवाचे दर्शन घेतले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.