Bhoma Village भोम गावातून चौपदरी रस्ता नकोच, अशी मागणी करत पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय भोमवासीयांनी आज (रविवारी) झालेल्या सभेत घेतला. भोमवासीयांना गोवा फॉरवर्ड व रिव्हॉल्युशनरी गोवन्स या राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला असून या सभेला आमदार विजय सरदेसाई आणि वीरेश बोरकर यांनी उपस्थित राहून आपला सक्रिय पाठिंबा दर्शवला. यावेळी आमदार विजय सरदेसाई आणि वीरेश यांनी सरकारकडून सुरू असलेल्या दादागिरीचा समाचार घेतला.
या सभेत भोमचे पंचसदस्य सुनील जल्मी, उपसरपंच शैला नाईक, देवस्थानचे अध्यक्ष सप्तेश नाईक, गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर, पर्यावरणप्रेमी स्वप्नेश शेर्लेकर, सुशांत नाईक, ज्येष्ठ ग्रामस्थ सूर्या भोमकर यांनी विचार व्यक्त करताना कोणत्याही स्थितीत गावातून चौपदरी रस्ता होऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.
गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांचीही यावेळी उपस्थिती होती. सूत्रसंचालन संजय नाईक यांनी केले. यावेळी दोन्ही आमदारांना ग्रामस्थांतर्फे निवेदन देण्यात आले.
उद्योजकाची जमीन वाचवण्यासाठी धडपड
कुंडईतील एका उद्योजकाची जमीन वाचवण्यासाठीच आता गावातून चौपदरी रस्ता नेण्यासाठी सरकार आग्रही असल्याचा आरोप आमदार सरदेसाई यांनी केला. त्या उद्योजकाची जमीन राखण्यासाठी मंदिरे आणि लोकांच्या घरांवर सरकार बुलडोझर फिरवणार आहे.
कुंडई औद्योगिक वसाहतीजवळून यापूर्वी हा चौपदरी रस्ता नेण्याचे नियोजन केले होते. केंद्रीय रस्ता महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनाही त्याची कल्पना असून केंद्र सरकारला गावातून रस्ता नेलेला नको आहे, पण एका उद्योजकाच्या जमिनीसाठी राज्य सरकार खटाटोप करीत असल्याचे सरदेसाई म्हणाले.
काब्राल खोटारडे
1. मंत्री काब्राल खोटारडे असून केवळ चारच घरे काढावी लागणार असे त्यांनी सांगितले होते. पण प्रत्यक्षात दोन मंदिरे व साठ घरांवर संक्रांत येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नियोजित चौपदरी रस्त्यासाठी वर्तमानपत्रात जाहीर केलेल्या अधिसूचनेत यासंबंधी माहिती दिल्याचे ग्रामस्थ म्हणाले.
2. स्थानिक आमदार तथा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी गावात येऊन स्पष्ट काय ते सांगावे, तसेच मुख्यमंत्र्यांनीही यात लक्ष घालावे, अशी मागणी भोमवासीयांनी केली आहे.
केवळ दोनच पंच उपस्थित!
या सभेला भोम-अडकोणचे केवळ दोनच पंचसदस्य उपस्थित होते. उपसरपंच शैला नाईक व माजी सरपंच तसेच विद्यमान पंचसदस्य सुनील जल्मी यांची उपस्थिती सभेला होते. सरपंच तसेच इतर चार पंचसदस्यांनी सभेला दांडी मारल्याने लोकांनी संताप व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.