

सासष्टी: गोव्याच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली आणि किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाणारी 'शेल फिश' (कवच असलेली मासळी) यंदा संकटात सापडली आहे. तिसरी, कालवां, शिनाणी यांसारख्या मासळीचे प्रमाण कमालीचे घटल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या पारंपरिक मच्छीमारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. बेतूल येथील ज्येष्ठ मच्छीमार वासुदेव केरकर यांनी या भीषण वास्तवाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
मच्छीमारांच्या मते, समुद्रातील (Sea) मासळीच्या उपलब्धतेचे संकेत निसर्गच देत असतो. बेतूल किनारपट्टीवर पूर्वी 'किरे' नावाचे पक्षी मोठ्या संख्येने येत असत. हे पक्षी बांगडे, तारले आणि पेडवे यांसारखी मासळी खाण्यासाठी किनाऱ्यावर गर्दी करायचे. "जेव्हा हे पक्षी दिसायचे, तेव्हा आम्हाला समजायचे की समुद्रात मासळी मुबलक आहे. पण दुर्दैवाने गेल्या ७ ते ८ वर्षांपासून हे पक्षी या भागात फिरकलेले नाहीत," असे केरकर यांनी सांगितले. पक्षांचे न येणे हे या भागात मासळीचा साठा संपत असल्याचे किंवा पर्यावरणात मोठा बदल झाल्याचे जिवंत संकेत आहेत.
शेल फिशची पैदास कमी होण्यामागे साळ नदीतील साचलेला गाळ हे मुख्य कारण असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. नियमानुसार, साळ नदीतील बेतूल ते खारेबांदपर्यंतच्या पट्ट्यातील गाळ दर तीन वर्षांनी उपसणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असते. गाळ साचल्यामुळे मासळीच्या प्रजननावर आणि वाढीवर विपरीत परिणाम होतो.
यापूर्वी सरकारने गाळ उपसण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो प्रयत्न फसला. मच्छीमारांच्या तक्रारीनुसार, त्यावेळी नेमलेला कंत्राटदार स्थानिक मच्छीमारांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत होता. अनुभवी मच्छीमारांना नदीच्या पात्राची आणि मासळीच्या जागांची नेमकी माहिती असते, मात्र कंत्राटदाराने चुकीच्या लोकांच्या सल्ल्यानुसार काम केल्याने अखेर ते काम अर्धवट बंद पडले. याचा फटका आता संपूर्ण मच्छीमार समाजाला बसत आहे.
मच्छीमारांची (Fishermen) मागणी 'शेल फिश'ची कमतरता केवळ मच्छीमारांच्या रोजीरोटीचा प्रश्न नाही, तर तो पर्यावरणाच्या ऱ्हासाचाही मुद्दा आहे. जर वेळीच साळ नदीतील गाळ शास्त्रोक्त पद्धतीने उपसला गेला नाही, तर तिसरी आणि कालवा यांसारखी मासळी कायमची नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. सरकारने स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घेऊन गाळ उपसण्याचे काम पुन्हा सुरू करावे आणि पारंपारिक व्यवसायाला संरक्षण द्यावे, अशी आर्त हाक बेतूलमधील मच्छीमारांनी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.