Goa Tourism: राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त, गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने आज गुरुवारी 'बीच व्हिजिल अॅप'चे अनावरण केले. या अॅपमुळे समुद्रकिनारा व्यवस्थापन वाढविण्यासाठी आणि समुद्रकिनाऱ्याशी संबंधित विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत होणार आहे.
गोव्याचे पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण मंत्री रोहन अ. खंवटे यांच्या हस्ते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील अंचिपाका, आयएएस व गोवा इलेक्ट्रॉनिक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालिका श्रीमती रेवती कुमार यांच्या उपस्थितीत 'बीच व्हिजिल अॅप'चे अनावरण करण्यात आले.
बीच व्हिजिल अॅप समुद्रकिनाऱ्यांवर उद्भवू शकणार्या समस्यांबाबत उपयुक्त असून या अॅपद्वारे वापरणाऱ्या ग्राहकाला समुद्रकिनाऱ्यावरील घडामोडी जलद आणि प्रभावीपणे कळणार आहेत.
समुद्रकिनार्यावरील मद्यपान करून धिंगाणा घालण्याचा प्रकार, वस्तू किंवा खाद्यपदार्थ विकणारे फेरीवाले किंवा किनाऱ्यांवर कोणताही गैर प्रकार आढळून आल्यास या अॅपद्वारे मत, सूचना, तक्रार नोंदवता येणार आहे. हे ‘बीच व्हिजिल अॅप’ प्ले स्टोअरवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असल्याचीही माहिती मिळली आहे. .
बीच व्हिजिल अॅप बाबत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, हे अॅप आमच्या समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेबाबत फार उपयुक्त आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून, बनवलेले हे बीच व्हिजिल अॅप स्थानिक आणि पर्यटक दोघांनाही उपयुक्त आहे. हे अॅप्लिकेशन तयार केल्याबद्दल मी पर्यटन विभागाचे कौतुक करतो.
तर पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, “आज आम्ही जे बीच व्हिजिल अॅपचे अनावरण करत आहोत, त्यामुळे समुद्रकिनारा व्यवस्थापन उत्तम रीतीने होणार असून या अॅपद्वारे स्थानिकांची आणि पर्यटकांची सुरक्षितता अबाधित राहणार आहे.
गोवा पर्यटन विकास महामंडळाचे संचालक सुनील अंचिपाका, आयएएस म्हणाले की, “सध्या आपल्यासमोर असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो याचे `दी बीच व्हिजिल अॅप’ हे एक उत्तम उदाहरण आहे.
गोव्याचे आकर्षण हे नेहमीच समुद्रकिनारे राहिले आहेत. आपल्या किनारपट्टीचे जतन करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. `दी बीच व्हिजिल अॅप’ सर्वांसाठी महत्वाचे असून समुद्रकिनाऱ्याचे व्यवस्थापन आणि सुरक्षितता याविषयी नागरिकांचे मत, सूचना, तक्रार या अॅपद्वारे नोंदवता येणार आहेत.
बीच व्हिजिल अॅपवर नोंदवल्या जाऊ शकतील अशा समस्यांमध्ये:-
समुद्रकिनाऱ्यावर होणारे मद्यपान, अनधिकृत डेक बेड विस्तार, खाद्यपदार्थ विकणारे फेरीवाले, किनाऱ्यावरील कचरा, समुद्रात बुडण्याच्या घटना, किनार्यावर स्वयंपाक करणे, किनार्यावर होणारे ध्वनिप्रदूषण, किनाऱ्यावर वाहने चालवणे, समुद्रकिनारी होणारे विवाहसोहळे, समुद्रकिनाऱ्यावरील कार्यक्रम, समुद्रकिनाऱ्यावरील बेकायदेशीर बांधकामे, किनाऱ्यावर चालणारे मसाज पार्लर, समुद्रकिनाऱ्यावरील टाउट यांचा समवेश आहे.
अॅपचे अंतर्गत मॅपिंग पूर्ण झाले असून केलेली तक्रार संबंधित अधिकार्यांद्वारे त्वरीत दूर केले जाईल याची खात्री करण्यासाठी ऑटो-एस्केलेशन यंत्रणा समाविष्ट करण्यात आली आहे. त्वरित कारवाईचे महत्त्व ओळखून, बीच व्हिजिल अॅपद्वारे संध्याकाळी 6 ते सकाळी 8 दरम्यान नोंदवलेली प्रकरणे वगळता अन्य कालावधीतील समस्या सोडवण्यासाठी 2 तासांचा कालावधी निश्चित केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.