

गोव्याचे नाव काढताच डोळ्यांसमोर येतात ती म्हणजे निळेशार पाणी, पांढरी शुभ्र वाळू आणि मनमोहक किनारे. मात्र, आता हीच पर्यटन स्थळे आरोग्याच्या एका भयावह संकटाचा सामना करत आहेत. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (GSPCB) ताज्या आकडेवारीनुसार, गोव्यातील जवळजवळ सर्वच किनारे आणि नद्यांमध्ये घातक पातळीपर्यंत प्रदूषण वाढले असून, हे पाणी पोहण्यासाठी किंवा मासेमारीसाठी अत्यंत असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) नियमांनुसार, समुद्राचे पाणी पोहण्यासाठी किंवा मासेमारीसाठी योग्य राहण्यासाठी त्यात विष्ठेतील जीवाणूंचे प्रमाण मर्यादित असणे गरजेचे आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे गोव्यातील १९ पैकी १८ किनारे या निकषांवर अपयशी ठरले आहेत. उत्तर गोव्यातील बागा आणि दक्षिण गोव्यातील पाळोले यांसारख्या लोकप्रिय किनाऱ्यांवर हे घातक जीवाणू ३५० MPN (Most Probable Number) प्रति १०० मिलीपर्यंत आढळले आहेत.
समुद्र किनाऱ्यांच्या तुलनेत गोव्यातील नद्यांमधील पाणी तर अधिकच भयावह आहे. मडगावमधील साल नदीत जानेवारी २०२५ मध्ये हे प्रमाण तब्बल २४,००० MPN प्रति १०० मिलीपर्यंत पोहोचले होते, तर पणजीतील मांडवी नदीतही हे प्रमाण ५४० MPN प्रति १०० मिली इतके नोंदवले गेले आहे.
डॉ. बोसुएट आफोन्सो यांनी या प्रदूषणाचे खापर मांडवीतील कॅसिनोमधून बाहेर पडणाऱ्या प्रक्रियेविना सांडपाण्यावर फोडले आहे. हे सांडपाणी अखेर अरबी समुद्रात मिसळते, ज्यामुळे प्रदूषणाची व्याप्ती वाढत आहे. पावसाळ्यात तर सांडपाणी वाहून जाण्याच्या यंत्रणेचा पूर्णपणे बोजवारा उडत असल्याने ही समस्या अधिकच गंभीर रूप धारण करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.