Goa Tourism 2023: मे महिन्यातील संपत आलेल्या शाळांच्या सुट्या आणि ‘विकेंड’मुळे देशभरातील पर्यटकांचे पाय गोव्याकडे वळले आहेत.
यात परदेशी पर्यटकांचीही भर पडल्याने या कडक उन्हातही गर्दीने फुललेले किनारे, वाहनांनी भरलेले रस्ते, बुकिंग फुल्ल झालेली हॉटेल्स अशी स्थिती पाहायला मिळत आहे.
त्यामुळे मंदिरे आणि चर्च परिसरही गजबजले आहेत. पर्वरीत रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करण्यात आल्याने बराचकाळ वाहतूक संथ होती.
कोरोनामुळे मागील काही काळापासून बंद असलेल्या पर्यटनाला चांगलीच उभारी मिळाली असून, राज्यातील पर्यटन व्यावसायिकांना दिलासा लाभला आहे, असे मत ट्रॅव्हल ॲन्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष नीलेश शहा यांनी व्यक्त केले आहे. वाढत्या पर्यटनाचा फायदा हॉटेल मालक, टॅक्सी चालक यांच्याबरोबर किनाऱ्यांवरील शॉकधारक आणि छोट्या व्यावसायिकांना होत आहे.
विकेंडचा फायदा व्यावसायिकांना - कळंगुट, बागा, अंजुणासह दक्षिणेतही पर्यटक
मे महिन्याच्या शेवटी समुद्रस्नान करण्याची परंपरा राज्यात आहे. त्यामुळे अनेक लोक समुद्र स्नानासाठी किनाऱ्यांवर गर्दी करत असून, दिवसभर समुद्र स्नानाचा आनंद लुटताना दिसत आहेत.सध्या राज्यातील उकाडा वाढल्याने स्थानिकांचे पायही किनाऱ्यांकडे वळले आहेत. कळंगुट, बागा, अंजुणासह दक्षिण गोव्यातील कोलवा, वार्का, बाणावली, पाळोळे किनाऱ्यांवर गजबजाट वाढला आहे.
पर्वरीत वाहतूक कोंडी
शेजारील राज्यातील पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे पर्वरी परिसरात वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. येथे वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे.
आकर्षण क्रूझ बोट, कॅसिनोंचे!
सध्या पर्यटकांना सर्वांत जास्त आकर्षण क्रूझ बोट आणि कॅसिनोंचे असून, मोठ्या प्रमाणात पर्यटक आनंद घेत आहेत. कॅसिनो चालकांनी या विकेंडचा फायदा घेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे सध्या कॅसिनो फुल्ल दिसत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.