
पणजी: राज्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. गेल्या २४ तासांत एकूण पाच अपघातांत तिघांना आपला प्राण गमवावा लागला. तर, सातजण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. बस्तोडा-म्हापसा, वाघुरे-शिंगणे, कासावली, बांबोळी आणि सांगे येथे हे अपघात घडले.
कासावली येथील थ्री किंग्स हॉलजवळ रविवारी (ता. १८) रात्री पावणेआठच्या सुमारास दुचाकीची धडक बसल्याने संगीता बिंद (४३) ही पादचारी महिला मरण पावली. तर, तिचा नवरा सेराई बिंद व १३ वर्षीय मुलगी जखमी झाली. त्यांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. दरम्यान, दुचाकीस्वार आर्यन गावडे (२१, शिरोडा-फोंडा) व त्याच्या मागे बसलेला त्याचा मित्रही या अपघातात जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन हा आपल्या मित्रासमवेत दुचाकीने कासावली मार्केटकडून वेर्णाच्या दिशेने चालला होता. कासावलीच्या थ्री किंग्स हॉलजवळ पोहोचले असता हा अपघात घडला. यावेळी मूळच उत्तरप्रदेशचे परंतु आता वेर्णा येथे राहणारे सेराई बिंद, त्यांची पत्नी संगीता व मुलगी रस्त्याच्या बाजूने चालले होते. मागून येणाऱ्या आर्यन गावडे याच्या दुचाकीची या तिघांना जोरदार धडक बसली. त्याच अवस्थेत त्यांना दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र तेथे संगीता हिला मृत घोषित करण्यात आले. तिला गंभीर दुखापत झाली होती.
दुचाकीस्वार आर्यन गावडे व त्याचा मित्रही या अपघातात जखमी झाला. त्या दोघांवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. आर्यन दारूच्या नशेत असल्याचे समजते. त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वेर्णा पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश भोमकर पुढील तपास करत आहेत.
सत्तरीतील वाघुरे-शिंगणे येथे आज सोमवारी संध्याकाळी दोन दुचाकी वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात मोटरसायकल पायलट महादेव दत्ता गावडे (७०, शांतीनगर-पिसुर्ले) यांचा मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे ते आपला भाड्याचा व्यवसाय आटोपून येत असताना त्यांच्या दुचाकीला कृष्णा संजय वायंगणकर (२०, पेडाणी-अडवई) याच्या दुचाकीची धडक बसली. या अपघातात महादेव गावडे हे रस्त्यावर फेकले गेले.
त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. लागलीच त्यांना रुग्णवाहिकेतून साखळी आरोग्य केंद्रात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, कृष्णा वायंगणकर हा किरकोळ जखमी झाला. वाळपई पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत पाठवून दिला. तसेच कृष्णा वायंगणकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक प्रथमेश गावस पुढील तपास करत आहेत.
बस्तोडा येथे झालेल्या दुचाकी स्वयंअपघातात साईराज नंदकिशोर मोरजकर (२१, रा. करासवाडा-म्हापसा) या युवकाचा मृत्यू झाला. हा अपघात आज सोमवारी (१९ मे ) रोजी दुपारी सव्वाएकच्या सुमारास सांताक्रुझ-बस्तोडा येथील कपेलजवळ घडला. उसकईहून भरधाव वेगाने येणाऱ्या साईराजचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीने रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारावरील काँक्रीट लादीला धडक दिली.
त्यामुळे तो दुचाकीसह रस्त्यावर पडला आणि सुमारे दहा ते पंधरा मीटरपर्यंत फरफटत गेला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच अवस्थेत त्याला प्रथम म्हापसा जिल्हा इस्पितळात व नंतर गोमेकॉत दाखल करण्यात आले. पण तेथे उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. पुढील तपास म्हापशाचे साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अजय गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.