पिसुर्ले: सरकार (Government) सार्वगिण विकास साधण्यासाठी विविध योजना आखून त्या प्रमाणे साधन सुविधा उपलब्ध करून देत आहे, त्याच प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने सुध्दा पंचायत पातळीवर नागरिकांना सोयी उपलब्ध करून देत आहे, परंतू सदर सुविधांच्या निगराणी कडे दुर्लक्ष झाल्यास काय स्थिती होते याचे ज्वलंत उदाहरण पिसुर्ले (Pisurle) पंचायतीच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या शिंगणे (Shingane) येथील बसस्टॉपची दुरावस्था (Condition of busstop) झाली आहे. येथील परिस्थितीतीवर नजर मारल्यास ते आपल्याला दिसून येईल.
या पंचायत क्षेत्रातील नागरिकांच्या सोयीसाठी बऱ्याच वर्षांपूर्वी पंचायतीच्या वतीने काही ठिकाणी बसस्टॉपची उभारणी करण्यात आली होती, त्यामुळे बसेस साठी थांबणाऱ्या विद्यार्थी ते जेष्ठ नागरिकांना याचा फायदा होत होता, ऊन पावसापासून संरक्षण प्राप्त झाले होते, परंतू सद्या स्थितीत या पंचायत क्षेत्रात एकही बसस्टॉपचा वापर नागरिकांना होत नाही, त्यामुळे बस प्रवास करणाऱ्या नागरिकांना उन पावसाचा तडाखा झेलत रस्त्यावर उभे राहण्याची पाळी येत आहे. त्यात महत्वाचे म्हणजे या ठिकाणी असलेल्या तीन बसस्टॉप निवारा शेड पैकी सद्या शिंगणे येथिल बसस्टॉप निवारा शेड उभी आहे. तर पिसुर्ले गावकर वाडा येथे बसस्टॉप निवारा शेड जीर्ण होऊन बऱ्याच वर्षांपूर्वी कोसळली आहे, तेथे नवीन शेड उभारण्यात आली नाही, त्याच प्रमाणे वाळपई होंडा रस्त्या दरम्यान कुभांरखण येथे असलेली निवारा शेड हल्लीच पाडण्यात आली आहे. मात्र शिंगणे येथे असलेली बसस्टॉप निवारा शेड सद्या उभी आहे, परंतू त्या ठिकाणी निर्माण झालेल्या परिस्थितीती कडे असल्यास ती असुन नसल्या सारखी आहे.
सदर निवारा शेड अडवई होंडा भागात जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर असल्याने या ठिकाणी पणसे, शिंगणे, वाघुरे या ठिकाणच्या नागरिकांना बस प्रवास करताना येथे आसरा घेण्यासाठी फायदेशीर ठरत होते, परंतू सदर बसस्टॉपवर भटक्या जनावरांनी केलेल्या घाणीमुळे सदर शेडचा आसरा घ्यायला मिळत नाही, त्याच प्रमाणे संपुर्ण बसस्टॉप निवारा शेडला देखरेख अभावी बकाल स्वरूप आले आहे, त्यात जीर्ण झालेल्या या बसस्टॉप इमारतीच्या छताच्या लोखंडी सळ्या स्पष्ट पणे दिसत असल्याने तेथे प्रवाशांना असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्यामुळे पंचायत मंडळाने या प्रकरणी लक्ष घालून सदर बसस्टॉप पुन्हा लोक वापरात आणण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.