
पणजी: विधानसभेच्या येत्या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याचे विरोधकांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरवण्यासाठी सत्ताधारी गटाने बैठकीत रणनिती आखली. उल्लेखनिय म्हणजे, अलीकडेच मंत्रिमंडळातून वगळले गेलेले आमदार गोविंद गावडे यांनी देखील यावेळी हजेरी लावली होती. एकीकडे राज्यातील विरोधी पक्षातील आमदारांत एकीचा अभाव दिसत असताना सत्ताधारी एकत्रपणे लढताना दिसत आहेत.
त्यांच्या उपस्थितीने सत्ताधाऱ्यांतील एकसंघतेचा संदेश देण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसून आला. बैठकीत मंत्र्यांबरोबरच सत्ताधारी आमदारांनी उपस्थित राहून विरोधकांच्या संभाव्य प्रश्नांची, आरोपांची व आंदोलनांची चर्चा केली.
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत असून त्यापूर्वी सत्ताधारी आघाडीतील आमदारांमध्ये समन्वय आणि रणनीती निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या उपस्थितीत बंद दारांआड बैठक पार पडली. ही बैठक पणजीतील एका हॉटेलमध्ये झाली.
भाजप आणि युतीतील आमदार आणि मंत्री यांची बैठक पार पडली. सर्वांनी नियोजित बिल व्यवस्थित तयार केलीत का? प्रश्न आणि इतर महत्वाचे विषय नोंदवले आहेत का? याची माहिती घेण्यात आली, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
अधिवेशनाचा कालावधी कमी केल्याच्या विरोधकांच्या आरोपाला उत्तर देताना सावंत यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर यापूर्वी चर्चा झाली असून, आत्ता निश्चित करण्यात आलेला कालवधी योग्य असल्याचे नमूद केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी देखील भाजप नेत्यांना यावेळी काही सूचना केल्या. आमदरांनी पक्षांर्गत आरोपप्रत्यारोप करु नयेत. सर्व मंत्र्यांना पक्षाची शिस्त पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती दामू नाईक यांनी बैठकीनंतर माध्यमांना संबोधित करताना दिली. दामू नाईक यांनी यावेळी अधिवेशनानंतरच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यतेचा इशारा दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.