

पणजी: गोव्यातील हवाई प्रवासी वाहतुकीत यंदाच्या पहिल्या चार महिन्यांत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत गोव्यातील एकूण हवाई प्रवाशांची संख्या ११.८२ लाखांवरून ८.६१ लाखांवर आली असून ही सुमारे २७.२ टक्क्यांची घट आहे.
जानेवारी २०२६ मध्ये गोव्यातील दाबोळी व मोपा या दोन्ही विमानतळांवरून एकूण ११ लाख ८२ हजार ३१६ प्रवाशांची नोंद झाली होती. यामध्ये ८६ हजार ४९१ आंतरराष्ट्रीय तर सुमारे १०.९५ लाख देशांतर्गत प्रवाशांचा समावेश होता. मात्र एप्रिल महिन्यात ही संख्या घसरून ८ लाख ६१ हजार २५४ इतकी झाली. त्यात केवळ १६ हजार २१६ आंतरराष्ट्रीय आणि ८.४५ लाख देशांतर्गत प्रवासी होते.
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत सर्वाधिक घसरण झाली आहे. जानेवारीत ८६ हजारांहून अधिक असलेली आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या एप्रिलमध्ये अवघ्या १६ हजारांवर आली. म्हणजेच या विभागात तब्बल ८१ टक्क्यांहून अधिक घट झाली. हिवाळी पर्यटन हंगाम आणि परदेशी चार्टर विमानसेवा संपुष्टात आल्याचा त्यावर मोठा परिणाम झाल्याचे मानले जात आहे.
देशांतर्गत प्रवासी वाहतुकीतही जवळपास अडीच लाखांची घट झाली. जानेवारीतील १०.९५ लाख प्रवाशांच्या तुलनेत एप्रिलमध्ये ८.४५ लाख प्रवासी नोंदविण्यात आले.
प्रवासी संख्येसोबत विमानांच्या हालचालींमध्येही घट झाली आहे. जानेवारी महिन्यात गोव्यात एकूण ७,४२५ विमान हालचाली नोंदल्या गेल्या होत्या. एप्रिलमध्ये त्या घटून ५,७०० वर आल्या. आंतरराष्ट्रीय विमान हालचालींमध्येही मोठी घट झाली असून त्या ४८९ वरून थेट ११० पर्यंत खाली आल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.