Goa Politics: खरी कुजबुज; 'आप'चे 'एकला चलो' धोरण भाजपच्या पथ्यावर?

Khari Kujbuj Political Satire: सरकारी जागेवर अतिक्रमण तसेच बेकायदा बांधकामे केलेल्यांविरुद्ध सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेऊन संबंधित पंचायत व पालिकांना निर्देश दिले आहेत.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

'आप'चे 'एकला चलो' धोरण भाजपच्या पथ्यावर?

दक्षिण गोव्यात गत लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आला याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांची ‘आप’ बरोबर असलेली युती हे सर्वश्रुत आहे. सासष्टीत असे काही मतदारसंघ आहेत, जे कॉंग्रेसचे बालेकिल्ले आहेत. ते काबीज करण्याचा ‘आप’चा प्रयत्न आहे. यावरूनच दोन्ही पक्ष एकमेकापासून दुरावत चालल्याचे दिसत आहे, बाणावली, वार्का इथे कॉंग्रेसचे वर्चस्व असले तरी अंतर्गत वादामुळे ‘आप’च्या उमेदवारांना तिथे निवडून येण्याची संधी मिळाली. हेही तेवढेच खरे. पूर्वी कॉंग्रेस व ‘मगो’च्या युती मुळे भाजपला सत्ता काबीज करणे शक्य होत नसे. आता ‘मगो’ व भाजप एकत्र आल्याने हे दोन्ही पक्ष सत्तास्थानी आहेत. कॉंग्रेस व ‘आप’ची युती संपली तर हे दोन्ही पक्ष पराभूत होतील व भाजपला सत्ता राखण्याची आयतीच संधी मिळेल, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. ∙∙∙

‘बस्ती हटाव’ घोषणाच?

सरकारी जागेवर अतिक्रमण तसेच बेकायदा बांधकामे केलेल्यांविरुद्ध सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेऊन संबंधित पंचायत व पालिकांना निर्देश दिले आहेत. काहींनी सुरुवात केली आहे तर काहीजण अजूनही तळ्यात मळ्यात आहेत. बांधकाम केलेल्यांकडे मतदान कार्डे असून सरकारी सुविधाही त्यांनी मिळवलेल्या आहेत. त्यामुळे कारवाईचा परिणाम मते मिळवण्यावर होऊ शकतो, हे लोकप्रतिनिधी जाणून आहेत. मात्र थिवीचे आमदार व मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी धाडसाचे पाऊल उचलले आहे. म्हापसा येथील प्रसिद्ध असलेली ‘लाला की बस्ती’ जमीनदोस्त करण्याचा विडा उचलला आहे. रमजान किंवा रामनवमी हे उत्सव सुरू असले तरी कावाई अटळ असेल, असा स्पष्ट इशारा हळर्णकर यांनी दिला असला तरी ते सत्यात उतरेल का, हा प्रश्‍न आहे. ही बस्ती पाडण्याचा आदेश देऊन कित्येक महिने उलटले तरी त्याला विलंब का होत आहे, त्यामुळे ही पोकळ घोषणाच ठरू नये, अशी चर्चा परिसरात होत आहे. ∙∙∙

शिंदेंकडे अहवाल

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आपली शाखा गोव्यात सुरु करण्यासाठी एकेक पाऊल टाकू लागली आहे. संपर्क प्रमुख सुभाष सावंत यांनी गोवा दौऱ्याचा अहवाल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुधवारी सादर केला आहे. त्यामुळे आता राज्यप्रमुखपदी कोण, असा प्रश्न साहजिकच चर्चेत आला आहे. राज्य प्रमुखपदाची घोषणा लवकरच होणार, असे सांगण्यात येत आहे. शिवसेना गोव्यात आणण्यासाठी १५ दिवस मेहनत घेणाऱ्या नेत्याला आपल्याला राज्य प्रमुखपद मिळेल, असे वाटते. नानोडा येथे मेळावा घेण्यासाठी केलेली मेहनत सार्थकी लागेल, अशी त्या नेत्याची धारणा आहे. ∙∙∙

मडगावचा विकास होणार, पण..!

आमदार दिगंबर कामत यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला. यंदा ते वाढदिवसाच्या दिवशी दिल्लीत होते व त्यामुळे कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी जमले व त्यांनी केक कापला. त्यावेळी बोलताना बाबांनी मडगावच्या विकासाबाबत जोरदार भाष्य केले व विकासाआड जे कोणी येतील, त्यांची गय करणार नाही, असा दमही दिला.आता त्यांचा हा उल्लेख कोणाला उद्देशून होता ते सगळ्यांना कळून चुकले. पण मडगावकरांचा प्रश्‍न वेगळाच आहे. ते म्हणतात की बाबा गेली तीस पस्तीस वर्षे मडगावचे आमदार आहेत. या काळात त्यांनी विकासकामाच्या शुभारंभाचे असंख्य नारळ वाढविले, असे असतानाही मडगावचा विकास शिल्लक कसा राहिला, त्याचे उत्तर म्हणे त्यांना मिळत नाही. वर्तुळाकार रस्त्याचे सौंदर्यीकरण गेली सहा-सात वर्षे रखडलेले आहे, रावणफोंड येथील उड्डाणपूल रखडत सुरू आहे, मडगावात जोरात सुरू आहेत ती रस्त्याच्या बाजूची अतिक्रमणे, यालाच बाबा विकास तर म्हणत नसावेत ना?, अशी विचारणा आता होत आहे. ∙∙∙

‘श्रमधाम’चे सीमोल्लंघन!

गोवा विभानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी श्रमधाम मोहीम सुरू करून राज्यात अनेकांना याचा फायदा पोहचवला आहे. आता रमेशराव राज्याबाहेर ही मोहीम घेऊन गेल्याचे दिसते. केरळात राजेंद्र आर्लेकर हे राज्यपाल असून वायनाड येथे नैसर्गिक आपदा येऊन लोकांनी घरे उद्‍ध्वस्त झाली होती. आर्लेकरांनी यात रमेशरावांची मदत घेत त्यांना वायनाडच्या दौऱ्यावर घेऊन गेले. त्यात दोघांनी हेलिकॉप्टरद्वारे आकाशातून निरीक्षण केल्यानंतर लोकांना ‘श्रमधाम’मार्फत घरे दिली जातील. रमेशरावांनी आपले ‘श्रमधाम’ जणू मिशन केल्याने त्यांनी तेथील स्थानिकांची भेट घेत, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यालाच म्हणतात तळागळातील नेता, अशी चर्चा सोशल मीडियावर होताना दिसते.∙∙∙

जॉन परेरांचा निशाणा ‘झेडपी’वर?

सध्या कुर्टी- खांडेपार पंचायतीच्या सरपंचावर दाखल झालेल्या अविश्वास ठरावाची चर्चा या भागात जोरदारपणे सुरू आहे. अविश्वास ठराव ज्यांनी दाखल केला आहे त्या पंचसदस्यांत माजी सरपंच जॉन परेरा यांची पत्नी विल्मा यांचाही समावेश आहे. हा अविश्वास ठराव संमत झाल्यास विल्मा यांचा सत्ताधारी गटात समावेश होणार आहे. त्यामुळे मग ‘झेडपी’वर लक्ष ठेवून असलेल्या जॉन यांना कार्य करायला अधिक वाव मिळू शकतो, असे या भागात बोलले जात आहे. सध्या जॉन यांनी आगामी ‘झेडपी’ निवडणूक बरीच गांभीर्याने घेतली असून हा अविश्वास ठराव हा त्याच रणनीतीचा एक भाग असू शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे. रवी नाईक काँग्रेसमध्ये असताना जॉन त्यांचे अगदी निकटचे सहकारी होते. आता सहवासाचा परिणाम थोडा तरी व्हायचाच की हो, नाही का? ∙∙∙

खाप्रेश्वर अवतीर्ण

पर्वरी येथील उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा होतो म्हणून श्री देव खाप्रेश्वर देवस्थानचे बांधकाम आणि वटवृक्ष हटवण्यात आला. बुधवारी रात्री त्या ठिकाणी देवाचे छायाचित्र आणि श्री देव खाप्रेश्वर प्रसन्न, असा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे देव पुन्हा अवतीर्ण झाल्याची बातमी पर्वरीत कानोकानी झाल्यावर रात्रीच अनेक भाविक त्या ठिकाणी जमा झाले. देवाची प्रतिष्ठापना कुठे करायची याविषयी सरकारी पातळीवर खल सुरू असतानाच हे पाऊल टाकण्यात आल्याने हा विषय संपता संपणार नाही, हेही स्पष्ट झाले आहे. ∙∙∙

लोबोंची तोफ पुन्हा धडाडली...

पालक अधिकतर इंग्रजी माध्यमालाच प्राधान्य देतात. त्यामुळे सरकारी शाळांवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. हेच चालू राहिल्यास भाऊसाहेब बांदोडकरांनी सुरू केलेल्या प्राथमिक शाळा भविष्यात बंद पडतील. अशावेळी सरकारी प्राथमिक विद्यालयात प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून करण्याची तसेच मराठी वा कोकणी सक्तीचा विषय करण्याची गरज असल्याचे सुतोवाच कळंगुटचे आमदार मायकल लोबोंनी केले आहे. लोबोंच्या या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. लोबोंचे काही मुद्दे वस्तुस्थितीशी निगडित असतात, परंतु त्याला अनेक कंगोरे असतात. लोबो हे सरकार पक्षात राहून, अनेकदा खूप वादग्रस्त विधाने किंवा प्रतिक्रिया देतात. बुधवारी भाऊसाहेब बांदोडकरांच्या जयंतीनिमित्त लोबोंचे हे वरील विधान लक्षवेधी ठरले. आता मुख्यमंत्री यावर काय भाष्य करतात, किंवा राजकीय वर्तुळातून कशा प्रतिक्रिया उमटतात हे येणाऱ्या काळात कळेलच. परंतु, लोबोंची तोफ धडाडते, तेव्हा-तेव्हा सरकार पक्ष कात्रीत सापडतो, अन् हे एक नवे समीकरण बनलेय, नव्हे का?. ∙∙∙

वेन्झींचा टोला

कॉंग्रेस व ‘आप’ची आघाडी कधी तुटते यावर अनेक राजकीय नजरा लागून राहिल्या आहेत. काही मतदारसंघातील राजकीय समीकरणे यातून बदलली जाणार असल्याने विधानसभा निवडणुकीतील इच्छूक उमेदवाराना जरा जास्तच उत्सुकता आहे. मात्र आमदार वेन्झी व्हिएगस यांनी यातील हवा काढून टाकली आहे. आतिशी यांनी युती नाही, असे म्हटले असले तरी याची सुरवात कॉंग्रेसच्या अंजली निंबाळकर यांनी केली होती, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत ∙∙∙

दांडी यात्रेलाच ‘दांडी’

महात्‍मा गांधी यांनी १२ मार्च १९३० या दिवशी मिठावरील कर हटवण्‍याच्या मागणीसाठी जी दांडी यात्रा सुरू केली होती. त्‍याचे स्‍मरण करण्‍यासाठी आज काँग्रेस पक्षाने ओल्‍ड गोवा येथे कार्यक्रम आयोजित केला हाेता. या कार्यक्रमाला केंद्रीय समितीचे सदस्‍य गिरीश चोडणकर आणि अन्‍य नेते उपस्‍थित होते. काँग्रेस ‘हायकमांड’च्‍या सूचनेवरून सेवादलाचे गोवा प्रदेशाध्‍यक्ष राजन घाटे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेेळी प्रदेश काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ उपाध्‍यक्ष एम. के. शेख यांनी दांडी यात्रेचे महत्‍व विषद करताना ज्‍यांना या यात्रेचे महत्‍व माहीत आहे ते या कार्यक्रमाला आले आहेत. ज्‍यांना माहीत नाही त्‍यांनी कदाचित दांडी मारली असावी, अशी कोपरखळी हाणली. या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेस समितीचे काही पदाधिकारी आणि आमदार गैरहजर होते. शेखांचा हा बाण त्‍यांच्‍याच दिशेने तर नव्‍हता ना? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com