37th National Games
37th National GamesDainik Gomantak

37th National Games: अतिथी देवो भवः; पाहुण्‍या क्रीडापटूंचे गोव्‍यात स्वागत, स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू

156 खेळाडू दाखल; पोलिसांच्या रजा रद्द
Published on

37th National Games: ‘अतिथी देवो भवः’ असे म्हणत क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोव्यात दाखल झालेल्या खेळाडूंच्या पहिल्या तुकडीचे स्वागत दाबोळी विमानतळावर केले. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांचीही उपस्थिती होती. दरम्‍यान, आता स्पर्धेचे काऊंटडाऊनही सुरू झाले.

ढोल-ताशांच्या गजरात पाहुण्या क्रीडापटूंचे गोव्यात भव्‍य स्वागत झाले. ते पाहून खेळाडूही भारावले. रात्री उशिरा दाखल होणाऱ्या खेळाडूंना नियोजित ठिकाणी नेण्यासाठी तसेच निवास व भोजनाची सोय राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे, असे क्रीडामंत्री गावडे यांनी सांगितले. कला व संस्कृती खात्यातर्फे खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. गावडे या खात्याचेही मंत्री आहेत.

दरम्‍यान, आज संध्याकाळी उशिरापर्यंत 156 खेळाडू दाबोळी व मोपा विमानतळ तसेच रेल्वेमार्गे राज्यात दाखल झाले. उत्तराखंडचा बॅडमिंटन संघ हा गोव्यात दाखल होणारा पहिला संघ ठरला.

आरोग्य यंत्रणा सज्ज

या स्पर्धेसाठी गोमेकॉ इस्पितळ तसेच आरोग्य खात्याची यंत्रणा सज्ज झाली आहे. स्पर्धेच्या प्रत्येक ठिकाणी आपत्कालीन आरोग्य सेवा कक्ष तसेच गोमेकॉ इस्पितळात विशेष आपत्कालीन विभाग स्थापन करण्यात आला आहे. स्पर्धेतील खेळाडूंची अँटीडोपिंगची चाचणी ‘नाडा’ एजन्सीमार्फत केली जाईल. प्रत्येक ठिकाणी 25हून अधिक विशेष आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

बॅडमिंटन स्पर्धा उद्यापासून सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या दि. 26 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे अधिकृत उद्‌घाटन करतील. त्यापूर्वी दि. 19 ते 24 ऑक्टोबरपर्यंत बॅडमिंटन स्पर्धा सांघिक व वैयक्तिक गटात खेळविली जाईल. खेळाडूंसह बॅडमिंटन खेळातील तांत्रिक अधिकारीही गोव्यात आले आहेत. ही स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिममध्ये होईल.

गोव्याला ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळणे ही मोठी अभिमानाची बाब होय. स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंचे गोमंतकीयांनी अतिथी देवो भवः म्हणत स्वागत करावे. ते आमचे पाहुणे आहेत. गोमंतकीय आदरातिथ्याचा त्यांना चांगला अनुभव मिळावा हेच आमचे ध्येय आहे. - गोविंद गावडे, क्रीडामंत्री

37th National Games
Goa Petrol-Diesel Prices: काय आहेत गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर? जाणून घ्या एका क्लिकवर

पोलिसांच्या रजा रद्द

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्याचा आदेश पोलिस मुख्यालयाचे अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी जारी केला आहे. या स्पर्धेदरम्यान सुरक्षाव्यवस्थेसाठी पोलिस कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा लागणार आहे. त्‍यामुळे खात्याने हा निर्णय घेतला आहे. महत्त्‍वाच्‍या वा तातडीच्या कामाव्यतिरिक्त रजा मंजूर न करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

37th National Games
Goa Eco Sensitive Zone: स्‍वार्थासाठी लोकांना घाबरवणे सुरू; हरित संवेदनशील क्षेत्र हिताचेच!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com