गोमेकॉ वसतिगृहाच्या ‘वॉर्डन’वर निष्काळजीपणाचा ठपका

गोमेकॉ गांजा प्रकरण भोवलं; स्पष्टीकरणासाठी 48 तासांची मुदत
GMC Goa
GMC GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोमेकॉतील 5 प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडे सापडलेल्या गांजा प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. वसतिगृहाचे वॉर्डन तसेच अस्थिरोग डॉ. झेलिओ डिमेलो यांना डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी काल कारणे दाखवा नोटीस बजावून 48 तासांत लेखी स्पष्टीकरण मागितले आहे. हे प्रकरण सुरक्षा रक्षकाने त्वरित निदर्शनास आणून दिले असतानाही कारवाई करण्यात केलेल्या निष्काळजीपणाचा ठपका त्यांना बजावलेल्या नोटिसीत ठेवण्यात आला आहे.

वॉर्डन डॉ. डिमेलो यांना सुरक्षा रक्षकाने 25 मे रोजी गोमेकॉत घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली होती. मात्र, त्यांनी कारवाई करण्यास केलेल्या विलंबाबद्दल त्यांना ही नोटीस बजावली आहे. त्यांना ही नोटीस शनिवारी बजावली असून 30 मे पर्यंत उत्तर देण्याची मुदत आहे. त्यांच्या हाताखाली दोन साहाय्यक वॉर्डन आहेत. मात्र, या दोन्ही वॉर्डनला नोटीस दिलेली नाही.

25 मे रोजी पहाटे 4 वाजता चार पुरुष आणि एक महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर मुलांच्या वसतिगृहात जात असताना तेथील सुरक्षा रक्षकाने त्यांच्यासोबत असलेल्या मुलीला जाण्यास हरकत घेतली. मुलांच्या वसतिगृहात मुलींना प्रवेश नसल्याचे त्याने सांगितले. तरीही त्यांनी या सूचनेकडे लक्ष न देता ते खोलीत गेले. सुरक्षा रक्षकाने त्यांच्या पाठोपाठ जात ते कोणत्या खोलीत गेले, याची माहिती घेतली. त्याची नोंद त्याने वसतिगृहाच्या नोंदवहीत केली. ते वसतिगृहात आले, तेव्हा मद्याच्या नशेत होते, असे सुरक्षा रक्षकाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे, असे डीन बांदेकर यांनी जारी केलेल्या कारणे दाखवा नोटिसीत नमूद केले आहे.

GMC Goa
ऐतिहासिक; गोव्यात यापुढे विधवांनाही मिळणार सन्मान!

खोलीत मद्य आणि गांजा

हे पाच प्रशिक्षणार्थी मद्याच्या नशेत असल्याची माहिती या सुरक्षा रक्षकाने गोमेकॉच्या आवारातील पोलिस चौकीला दिली. यावेळी पोलिसांनी वसतिगृहात जाऊन पाहणी केली असता तेथील खोली क्रमांक 27 मध्ये ते प्रशिक्षणार्थी मद्याच्या बाटल्या तसेच एक पॅकेट समोर ठेवून एकत्र बसलेले दिसले. या पॅकेटमध्ये असलेला पदार्थ हा गांजा असल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत पोलिसांनी सांगितले, असे अहवालात नमूद केलेल्या नोटिशीत बांदेकर यांनी म्हटले आहे.

मुलीमुळे प्रकरणाचा पर्दाफाश!

या पाच प्रशिक्षणार्थ्यांची मुदत मे महिन्यात पूर्ण होणार असल्याने ते सर्वजण 25 मे रोजी रात्री पार्टीला गेले होते. रात्री उशिरा ते मुलांच्या वसतिगृहात परतले होते. एरव्ही वसतिगृहातील मुलांना सुरक्षा रक्षक अडवत नाहीत. मात्र, त्या रात्री त्यांच्यासोबत महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर असल्याने सुरक्षा रक्षकाने त्यांना हरकत घेतली आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. हे वसतिगृह इस्पितळाच्या आवारापासून लांब निर्जनस्थळी असल्याने त्याचा फायदा ते घेत होते. तेथील प्रवेशद्वार नेहमी खुले असायचे. मात्र, या घटनेनंतर प्रवेशद्वारावर आता सुरक्षा रक्षक ठेवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com