पणजी : कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना पक्षात घेऊन चूक केली. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना 2007 मध्ये रवी नाईक यांना डावलून पक्षाने मुख्यमंत्रिपद दिले तरीही कामत व लोबो यांनी पक्षविरोधी काम केले. आमदार लोबो इतक्या लवकर आमचा विश्वासघात करतील, असे वाटले नव्हते, तर कामत यांना पक्षाने सर्व पदे दिली तरीही त्यांनी असे का केले, समजायला मार्ग नाही, असे विधान काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरिश चोडणकर यांनी केले.
‘गोमन्तक’ टीव्हीच्या ‘सडेतोड नायक’ या मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. संपादक संचालक राजू नायक यांनी विचारलेल्या प्रश्नांना चोडणकर यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेतेपद दिले. तर दिगंबर कामत यांनीही यापूर्वी सर्व पदे उपभोगली आहेत. पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते. तरीही या दोघांनी भाजपामध्ये जाण्यासाठी सुरू केलेल्या हालचाली काँग्रेससाठी लज्जास्पद वाटत नाहीत का, असा सवाल नायक यांनी केला. यावर गिरिश चोडणकर म्हणाले, 2017 मध्ये काँग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या. तरीही आमचे सरकार होऊ शकले नाही. पुढे 2019 मध्ये एकाचवेळी आमचे 10 आमदार भाजपामध्ये गेल्याने पक्षाबद्दल लोकांमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार झाले होते. दहाही मतदारसंघात नवीन नेतृत्व तयार करणे, पक्षाची बांधणी करणे सहजसोपे नव्हते. तरीही आम्ही नव्याने जुळवाजुळव करून पक्ष मजबूत करण्याचे प्रयत्न केले.
काँग्रेसच्या नेत्यांनी देवासमोर पक्षांतर करणार नसल्याची शपथ घेतली होती. तसेच प्रतिज्ञा केली होती. तरीही काँग्रेसमधून 7 आमदार भाजपामध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत. याविषयी तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न नायक यांनी केला असता चोडणकर म्हणाले, या लोकांनी केवळ पक्षालाच फसवले नाही तर देवालाही फसवण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेचा विश्वासघात करून हे लोक भाजपामध्ये जात होते. आपण पाप करत असल्याची जाणीव झाल्यानेच कदाचित भयापोटी सध्या ते थांबले असतील. पण, देवासमोर शपथ घेऊनही ते पक्षांतर करतील तर त्यांना त्याची किमंत मोजावी लागेल.
लोबो यांच्याविरोधात जमीन रुपांतर प्रकरणी मंत्री विश्वजीत राणे यांनी आरोप केले आहेत. तसेच पुरावेही सादर केले. तरीही अशा व्यक्तीला काँग्रेसने पक्षात का घेतले, असा सवाल नायक यांनी केला असता चोडणकर म्हणाले, तत्कालिन परिस्थितीचा विचार करून तो निर्णय घेण्यात आला. लोबो यांच्या पक्षप्रवेशास अनेकांचा विरोध होता पण केडर अनुकूल होते.
लोबो आणि कामत यांच्यासह अन्य पाचजणांचा एक पाय काँग्रेसमध्ये तर दुसरा पाय भाजपामध्ये आहे. अशावेळी लोकांनी काँग्रेसवर का विश्वास ठेवावा, असे विचारताच चोडणकर म्हणाले, काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे. काँग्रेसची वेगळी परंपरा आहे. देशाविषयी आणि लोकांविषयी ठाम धोरण आहे. तसेच राज्यघटनेवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. पण भाजपाला विद्यमान राज्यघटनेला धोका पोहचवून किंबहुना नष्ट करून स्वतःची घटना आणण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस हे कदापी होऊ देणार नाही, हे माहीत असल्याने भाजपा काँग्रेस पक्षालाच संपवू पाहात आहे. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांसह काँग्रेसचे केवळ ५ आमदार फुटण्याच्या मार्गावर आहेत. इतर सहा आमदार पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे चोडणकर म्हणाले.
लोबो आणि दिगंबर कामत यांच्याविषयी काँग्रेसचे सध्याची नेमकी भूमिका काय आहे, असे विचारले असता चोडणकर म्हणाले, त्यांच्याविरोधात आम्ही पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी अपात्रता याचिका दाखल केली आहे. काहीही झाले तरी त्यांच्यावर कारवाई होणारच, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच यापुढे एकही आमदार फुटणार नाही यासाठी पक्षाने योग्य तो बंदोबस्त केला असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.