
मागील काही दिवसांत सारी सायबर स्पेस ‘घिबली’मय झाली आहे. जगभरातील सामान्य माणूसच नव्हे तर सेलिब्रिटी आणि अगदी राजकारणीदेखील या क्रेझमध्ये सामील झाले आहेत. अगदी आपले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपले शिगम्यातील फोटो तर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ‘जीवनातील खास क्षण घिबली-फाइड’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचा आपला फोटो या शैलीत आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केलाय.
तंत्रज्ञानाच्या जगात नवे काही आले तर त्याचा प्रयोग मी एरव्हीच मुद्दाम करून बघते. या ट्रेण्डने तर प्रत्येकालाच आकर्षित केले आहे. तसेही समाजमाध्यमांच्या जगात प्रचलित FOMO - फियर ऑफ मिसिंग आउट - नवीन आलेले काही मला चुकले तर नाही ना - या संकल्पनेचाही प्रभावही होताच म्हणा! तर या साऱ्यामुळे, मीही माझ्या बहिणीसोबतचा फोटो घिबली शैलीत चॅटजीपीटीवर जाऊन तयार केला.
मोठ्या डोळ्यांचा माझा छान वाटणारा फोटो पाहून मी जाम खूश झाले. आता माझा हा गोंडस अवतार जगाला नाही दाखवला तर त्याचा काय फायदा, म्हणून मग सगळ्यात आधी मी तो आमच्या फॅमिलीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केला आणि माझा स्टेट्स म्हणून टाकून दिला.
जेव्हा माझ्या मुलाने- कबीरने - हा फोटो बघितला तेव्हा तो हातातले काम सोडून माझ्याकडे आला. ‘आई, कशाला करायला गेलीस हे तू? अथक परिश्रमाने एका दिग्गज कलाकाराने तयार केलेल्या कला प्रकाराचे हे क्षुल्लकीकरण आहे! घिबली शैली ही हाताने चित्र काढायची शैली आहे. स्टुडिओ घिबली आपले अॅनिमेशन चित्रपटसुद्धा प्रत्येक फ्रेम हाताने चित्र काढून ते रंगवून तयार करतात’.
अचानक आलेल्या या स्पष्टीकरणाच्या भडिमारातून मी सावरायचेच होते तर त्याने माझ्यासमोर आपला मोबाइल धरला. ‘आई, स्टुडिओ घिबलीच्या ‘द विंड राइजेस’मधील हे चार सेकंदांचे लहानातील लहान तपशील लक्षात घेऊन काढलेले गर्दीचे सीन पाहा.
हे पूर्ण करण्यासाठी त्यांच्या एजी यामामोरी या अॅनिमेटरला तब्बल १ वर्ष ३ महिने लागले. आता तूच मला सांग, हे जे चाललेय ते त्या कलाकारांच्या कलेचा अपमान नाहीय का? तुला आवडले असते तुझ्या श्रमांची अशी कुणी मस्करी केलेली!’. अरे! या दृष्टीने खरे तर मी विचारच केला नव्हता! त्यानंतर या घिबली प्रकरणाच्या मी जेवढे जास्त खोलात जात गेले तेवढे, स्वतः एक सर्जनशील कलाकार असलेल्या कबीरचा त्रागा रास्त असल्याचे माझ्या लक्षात आले.
घिबली ही दिग्गज जपानी अॅनिमेशन चित्रपट निर्माते आणि स्टुडिओ घिबलीचे सहसंस्थापक, हयाओ मियाझाकी यांची खास चित्रकला शैली. सौम्य रंगांची, अतिशय तपशीलवार पार्श्वभूमी असलेली, उठावदार चैतन्यमयी चेहऱ्यांची, कल्पना आणि वास्तव यांचा सुंदर मिलाफ असलेली चित्रे ही या शैलीची ओळख.
‘स्पिरिटेड अवे’(२००३) आणि ‘द बॉय अँड द हेरॉन’(२०२४) या दोन अॅनिमेशन चित्रपटांना ऑस्कर मिळालेल्या या स्टुडिओ घिबलीची सगळ्यात महत्त्वाची खासियत म्हणजे त्यांच्या चित्रपटातील सर्व फ्रेममधील चित्रे हातांनी काढली आणि रंगवली जातात. या दिग्गज जपानी चित्रपट निर्मात्याच्या सर्जनशील प्रक्रियेचे वर्णन करणारा ‘हयाओ मियाझाकीसोबत १० वर्षे’ नावाचा एक अतिशय सुंदर माहितीपट मी पहिला.
त्याचे ते नवीन कल्पना प्रसवताना प्रचंड अस्वस्थ होणे, लहानातल्या लहान बारकाव्यांवर लक्ष देणे, परिपूर्णतेकडे असलेला भर, सभोवतालची माणसे, परिसर, वनस्पती आणि प्राणी विश्वाला स्वतःत सामावून घेऊन नवनिर्मिती करणे, सारेच अचंबित करणारे आणि अभूतपूर्व!
याच माहितीपटात २०१६च्या एका प्रसंगात अॅनिमेशन चित्रपट निर्मिती प्रक्रिया सोपी करण्यासाठीच्या एका एआय टूलचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आलेल्या एका संगणक अभियंत्याला मियाझाकी खड्या शब्दात सुनावतो. मानवी अनुभवांनी समृद्ध कलाकृतीची तुलना टूलद्वारे तयार केलेल्या निर्मितीशी होऊ शकेल काय? ‘ज्याने हे टूल निर्माण केलेय त्याला वेदना काय असते हे माहीत नाही. मला या साऱ्याचा तिरस्कार आहे. मी माझ्या कामात हे तंत्रज्ञान कधीही समाविष्ट करू इच्छित नाही. हा जीवनाचाच अपमान आहे’. याच मियाझाकीची अथक परिश्रमांनी आणि तपश्चर्येने नावारूपास आणलेली घिबली शैली त्याच्या मनाविरुद्ध आता प्रत्येकजण उठसूट एआय टूल वापरून स्वतःला पाहिजे तशी वापरतोय.
कुणी म्हणेल त्यात काय मोठे? त्यांना मिळालीच असेल चॅटजीपीटीवाल्या ओपनएआयकडून भरपूर रॉयल्टी. सत्य जाणून घेण्यासाठी मी चॅटजीपीटीलाच प्रश्न केला, घिबली शैलीतील चित्र तयार करण्यासाठी तुमच्या टूलला प्रशिक्षित करण्यासाठी तुम्ही मियाझाकी यांची चित्रे आणि चित्रपट वापरले. हे करण्यासाठी स्टुडिओ घिबलीची परवानगी घेतली होती का? या प्रश्नाला सरळ ‘नाही’ असे उत्तर आले! वर आणखी घिबली शैलीच्या कॉपीराइटचा आम्ही आदर करतो. आमची चित्रे त्यांच्या शैलीची हुबेहूब नक्कल नसत,े अशी वर आणखी मल्लिनाथीही केली गेली.
साधी परवानगीही घेतली नाही, तर मग रॉयल्टीची तर गोष्टच राहिली दूर. एआय टूल्सची हीच तर खटकण्यासारखी गोष्ट आहे. ही टूल्स तयार करणाऱ्या मनुष्यबळावर, ती चालवायला लागणाऱ्या हाय-टेक मशीनरिवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पण ती यशस्वीपणे वापरात आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असते ते योग्य डेटावर त्यांना ट्रेन करणे. पण हा डेटा मात्र वेगवेगळ्या माध्यमातून जगभरातून फुकट उचलण्यावरच या कंपन्यांचा भर असतो.
यातून घिबलीसारख्या आपापल्या क्षेत्रातील अथक परिश्रमांनी परिपक्व केल्या गेलेल्या ब्रॅण्डचे फारच नुकसान होते. कबीर म्हणतो तसे हे घिबली - चॅटजीपीटी उदाहरण ही भविष्यात तुम्हा-आम्हा सर्वांच्याच क्षेत्रात येऊ घातलेल्या मानव-एआय संघर्षांची नांदी आहे.
गेल्या वर्षीच ऑक्टोबरमध्ये, जगभरातील १३,००० हून अधिक सर्जनशील कलाकारांच्या सह्यांनिशी एआय कंपन्यांना एक निवेदन दिले गेले होत. जनरेटिव्ह एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी कुणाच्याही कामाचा विनापरवाना वापर हा त्यांच्यावरील अन्याय आहे हे या निवेदनाद्वारे स्पष्ट शब्दात अधोरेखित केले गेले.
पण अजून तरी एआय कंपन्यांनी लोकांचा डेटा विनापरवानगी वापरण्याच्या आपल्या सवयीत बदल केल्याचे दिसत नाही. ‘if you're not paying for the product, you are the product’ हे लक्षांत घेता घिबली चित्रांच्या माध्यमातून मिळालेल्या लाखो, कोट्यवधी लोकांच्या फोटोंचा वापर चॅटजीपीटी कसली एआय मॉडेल्स ट्रेन करण्यासाठी वापरणार आहे आणि त्याचा तुमच्या आमच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे, याचे उत्तर येणारा काळच देऊ शकेल!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.