

Gede Priandana World Record: क्रिकेटच्या इतिहासात अनेकदा गोलंदाजांनी आपल्या फिरकीने किंवा वेगाने फलंदाजांना नाचवले आहे, परंतु मंगळवार 23 डिसेंबर 2025 रोजी इंडोनेशियाच्या बाली बेटावर जे घडले, त्याने जागतिक क्रिकेटला थक्क केले. इंडोनेशियाचा वेगवान गोलंदाज गेडे प्रियांडाना याने कंबोडियाविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकाच षटकात तब्बल 5 गडी बाद करण्याचा भीमपराक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या (पुरुष आणि महिला दोन्ही श्रेणीत) इतिहासात एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला.
कंबोडियाचा संघ 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 16व्या षटकात ही ऐतिहासिक घटना घडली. 28 वर्षीय प्रियांडानाने षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर शाह अबरार हुसैन, निर्मलजीत सिंह आणि चंथोउन रथनैक यांना तंबूचा रस्ता दाखवत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. यानंतर एक चेंडू निर्धाव (Dot ball) गेला, मात्र पुढच्या दोन चेंडूंवर त्याने पुन्हा मोंगदारा सोक आणि पेल वेन्नक यांना बाद करुन कंबोडियाचा डाव संपुष्टात आणला. या संपूर्ण षटकात कंबोडियाने केवळ एक धाव घेतली, ती सुद्धा 'वाईड'च्या स्वरुपात मिळाली.
यापूर्वी, लसिथ मलिंगा, राशिद खान, कर्टिस कॅम्फर आणि जेसन होल्डर यांसारख्या दिग्गज गोलंदाजांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात 4 गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. मात्र, एकाच षटकात 5 बळी घेण्याचा टप्पा आजवर कोणालाही गाठता आला नव्हता. घरगुती क्रिकेटमध्ये बांगलादेशच्या अल-अमीन हुसैन आणि भारताच्या अभिमन्यू मिथुन यांनी अशी कामगिरी केली होती, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विक्रम प्रस्थापित करणारा प्रियांडाना हा आता एकमेव गोलंदाज ठरला.
या सामन्यात केवळ गोलंदाजीच नव्हे तर इंडोनेशियाची (Indonesia) फलंदाजीही प्रेक्षणीय ठरली. यष्टिरक्षक फलंदाज धर्म केसुमाने 68 चेंडूंत नाबाद 110 धावांची धुवांधार खेळी खेळली, ज्यात 8 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. याच जोरावर इंडोनेशियाने 167 धावांचे आव्हान उभे केले होते. प्रियांडानाच्या या ऐतिहासिक स्पेलमुळे इंडोनेशियाने हा सामना 60 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. विशेष म्हणजे, प्रियांडानाने फलंदाजीत केवळ 6 धावा केल्या होत्या, पण चेंडू हातात घेताच त्याने इतिहास रचला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.