

Virat Kohli Record: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेत त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. कोहलीने या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत लागोपाठ दोन शतके झळकावली. यामुळे आता त्याच्यासमोर या मालिकेत सलग तिसरे शतक ठोकण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. सध्याच्या लयीत तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, ते पाहता हा रेकॉर्ड करणे त्याच्यासाठी फारसे कठीण नाही.
विराट कोहलीने (Virat Kohli) पहिल्या वनडे सामन्यात 135 धावांची धमाकेदार खेळी खेळली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 7 षटकार लगावले. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे टीम इंडियाने 17 धावांनी विजय मिळवला. यानंतर, दुसऱ्या वनडे सामन्यातही कोहलीने आपली कमाल कायम ठेवत 102 धावांची आणखी एक दमदार शतकी खेळी खेळली. या डावात त्याने 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. दुसऱ्या सामन्यात भारताने 358 धावांचा भला मोठा धावांचा डोंगर उभारला असला तरी, दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष्य गाठले.
भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळला जाईल. जर कोहलीने या तिसऱ्या वनडे सामन्यातही शतक झळकावले, तर तो आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा सलग तीन वनडे शतके ठोकण्याची हॅट्ट्रिक पूर्ण करेल. यापूर्वी, कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीत फक्त एकदाच 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सलग तीन वनडे शतके झळकावली होती. आता तिसऱ्या वनडेत शतक झळकावल्यास विराट वनडे क्रिकेटच्या इतिहासात दोनदा सलग 3-3 शतके ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल. हा ऐतिहासिक रेकॉर्ड त्याच्या नावावर जमा करण्याची त्याच्याकडे चांगली संधी आहे.
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील ही मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला वनडे सामना 17 धावांनी जिंकला. दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांच्या शतकांच्या जोरावर 358 धावांचा डोंगर उभा केला. मात्र, प्रत्युत्तरादाखल आफ्रिकेच्या एडन माक्ररम याने दमदार 110 धावांची खेळी खेळत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि मालिका 1-1 ने बरोबरीत आणली.
आता 6 डिसेंबरला होणारा तिसरा वनडे सामना निर्णायक ठरणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो ही मालिका आपल्या नावावर करेल. त्यामुळे मालिकेतील या रोमांचक लढतीत विराट कोहली सलग तिसरे शतक ठोकून संघाला विजय मिळवून देतो का, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.