

काणकोण: गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील गावणे धरणाच्या जलाशयाजवळ २८ कोटी ४४ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या ५ एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणी आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर व पेयजल मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
हे लघु धरण पूर्ण होऊन सुमारे दहा वर्षांचा कालावधी लोटला तरी जलशुद्धीकरण प्रकल्पाअभावी या धरणातील पाण्याचा वापर होत नव्हता. मंत्री रमेश तवडकर यांनी गावडोंगरी व अन्य भागात जलपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मांडून मंजुरी मिळवल्याने हा प्रकल्प मार्गी लागला आहे.
गावणे धरणाच्या जलाशयाची पाणीधारण क्षमता ६३.५४ आरएल (मीटर) आहे. या धरणात १७७ हेक्टोमीटर पाणी साठवले जाते. धरणाचे बांधकाम २०१६ साली पूर्ण झाले; मात्र या धरणावर जलशुद्धीकरण प्रकल्प व जलसिंचनासाठी कालवे उभारण्यात आले नव्हते. गावडोंगरी, खोतीगाव व पैंगीण पंचायत क्षेत्रातील आमोणे, दाबेल व अन्य भागांत या धरणाचे पाणी पोहोचवण्याची योजना आहे.
सध्या या धरणातील पाण्याचा विसर्ग तळपण नदीच्या पात्रात सोडण्यात येतो. आता जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जात असल्यामुळे या पाण्याचा काही प्रमाणात वापर होणार आहे. कंत्राटदाराला २६ फेब्रुवारी २०२७ पर्यंत ५४० दिवसांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. प्रकल्पाचा आराखडा व बांधकाम असे या कामाचे स्वरूप आहे. पर्वरी येथील भागक्या या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे.
काणकोणात विकासकामे डिसेंबरपर्यंत मार्गी : तवडकर
आदिवासी कल्याण खात्याकडे असलेल्या निधीतून काणकोण व अन्य भागांत विकासकामे डिसेंबरपर्यंत मार्गी लावण्यात येणार असल्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले. आदिवासी कल्याण खात्याकडे १४०० कोटी रुपये व उर्वरित दोन खात्यांकडे २ हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. हा निधी डिसेंबरपर्यंत विकासकामांसाठी खर्च करण्यात येणार आहे.
काणकोण मतदारसंघातील सहाही पंचायत क्षेत्रांतील विकासकामांसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद आहे. त्यासाठी पंचायत मंडळांनी आपल्या क्षेत्रातील विकासकामांची यादी तयार करावी, असे त्यांनी सांगितले.
आले येथे बंधाऱ्याचे भूमिपूजन
दरम्यान, खोतीगाव पंचायत क्षेत्रातील आले येथे ९९ लाख रुपये खर्चून बंधारा बांधण्यात येणार आहे. या बंधाऱ्याचे भूमिपूजन मंत्री रमेश तवडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पैंगीणचे जिल्हा पंचायत सदस्य अजय लोलयेकर, खोतीगावचे सरपंच जयेश गावकर, माजी सरपंच आनंद देसाई, जलस्त्रोत खात्याचे सहाय्यक अभियंता धनंजय नागवेकर, कनिष्ठ अभियंता सर्वेश नमशीकर आदी उपस्थित होते.
काणकोणमधील नद्यांबरोबरच उपनद्यांवर बंधारे बांधून पाणी अडविण्याचा प्रयत्न माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळात झाला. आता उर्वरित बंधारे पूर्ण करण्यात येत आहेत, असे मंत्री रमेश तवडकर यांनी यावेळी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.