
म्हापसा: येथील शहरासह बार्देश तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. परिणामी राज्य सरकार रोगराईला आमंत्रण देत असून जनतेला स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा आठवड्याभरात न मिळाल्यास पाणीपुरवठा खात्यासह उपसभापतींच्या कार्यालयावर घागर (बादली) मोर्चा काढू, असा इशारा काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी दिला आहे.
म्हापसा येथील पाणीपुरवठा खात्याच्या कार्यालयात विजय भिके, काँग्रेस म्हापसा गटाध्यक्ष मिताली गडेकर व इतरांनी सहाय्यक अभियंता रोहीदास नाईक यांची भेट घेतली. सोबत त्यांनी नळाद्वारे येणारे गढूळ पाण्याने भरलेल्या प्लास्टिक बाटल्या आणल्या होत्या. यावेळी कनिष्ठ अभियंता प्रज्योत नाईक हे उपस्थित होते.
नळाला गढूळ पाणी येण्याचे कारण भिके यांनी साहाय्यक अभियंत्यांना विचारले. खोदकामावेळी जलवाहिन्या फोडल्या जात असल्याने सदर मातीमिश्रीत पाणी नळाला येते, असे उत्तर त्यांनी दिले. याशिवाय म्हापशातील खोर्ली, गावसावाडा, हणजूण, आसगाव व इतर भागात होणाऱ्या अनियमित पाणीपुरवठ्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पेयजल खाते, वीज तसेच इतर खात्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे खोदकाम करून वारंवार जलवाहिन्या फोडल्या जातात. नंतर या फुटलेल्या वाहिन्यांतून लोकांच्या नळाला गढूळ पाणी येते. यातून रोगराई पसरते. राज्यात मुसळधार पाऊस पडून देखील लोकांच्या नळांना पाणी येत नाही. नळ असून स्वच्छ पाणी नाही, त्यामुळे हर घर नळाची सरकारची योजनाच भुलथाप आहे, असा आरोप विजय भिके यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
येत्या आठ दिवसांत लोकांच्या नळाला स्वच्छ पाणी आणि नियमित पाणीपुरवठा द्यावा. तसे न झाल्यास पेयजल पुरवठा कार्यालयावर मोर्चा आणू तसेच म्हापशाच्या आमदारांच्या कार्यालयावर बादली मोर्चा नेण्यात येईल, असा इशारा भिके यांनी दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.