म्हार्दोळातील व्हीपीके संस्थेच्या कार्यक्रमात सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांची बरीच स्तुती केली. गोविंद गावडे यांच्याकडे एखादे खाते दिले की त्याचे सोने होते एवढी धडाडी गोविंद गावडे दाखवतात असे ते म्हणाले. आता तेही खरे आहे म्हणा. कारण गोविंदराव कोणत्याही बाबतीत धडाडी दाखवतात हे सगळेच मान्य करतील.
पतीदेवांच्या हाती सूत्रे
पती परमेश्वर असतो असे भारतीय संस्कृतीनुसार महिला मानतात. त्यामुळे आपल्या पतीला मान देऊन त्याच्या आज्ञेचे पालन केले जाते, परंतु गोव्यात स्वामी निष्ठेचा भलताच प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे.
पंचायत निवडणुकीत एखादा प्रभाग आरक्षित झाल्यास तेथे आपल्या पत्नीला बसवून जिंकून आणण्याची राजकीय प्रथा राज्यात सुरू आहे. त्यात पत्नी सरपंच झाल्यास पंचायतीची सूत्रे पतीदेवांच्या हातात असतात.
सध्या असाच एक प्रकार साळगाव येथे गाजत आहे. लोकशाहीत आरक्षणाचा गैरफायदा घेतला जात आहे. त्यामुळे हेच का भाऊ ते लोकांनी लोकांसाठी चालवलेले सरकार असे लोक विचारत आहेत.
प्रश्न नकोत?
म्हापसा पालिका मंडळाच्या बैठकांवेळी नगराध्यक्ष मॅडम प्रश्न विचारल्यास त्याची समर्पक किंवा समाधानकारक उत्तरे देत नाहीत अशी कैफियत काही नगरसेवकांची आहे. अशातच शुक्रवारी या पालिका मंडळाची विशेष बैठक झाली.
बैठकीत कोर्ट जंक्शन परिसरातील पदपथ हा एकमेव अजेंडा होता. मात्र, या कामासंदर्भात काही प्रश्न नगरसेवकांच्या मनात होते. ते विचारण्याचा ते प्रयत्न करीत होते. मात्र, नगराध्यक्ष मॅडम बैठक आटोपती घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशी खंत काही नगरसेवकांनी यावेळी बोलूनही दाखविली.
नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी तर नगराध्यक्षांना अशाप्रकारे डॉमिनेट करू नका असे ठणकावून सांगितले. तुम्ही विकासकामांविषयी इतर नगरसेवकांची मते जाणून घेत त्यांची अनुमती मिळविण्यासाठी हा प्रस्ताव बैठकीत आणला आहे. मग आमच्या प्रश्नांची उत्तरेही तुम्हाला द्यावीच लागतील, असेही ते म्हणाले.
मात्र, ही बैठक जेमतेम दहा मिनिटांच्या आत नगराध्यक्षांनी आटोपती घेत हा ठराव मंजूर करून घेतला. आता मॅडम प्रश्न घेण्यास का टाळाटाळ करीत होत्या? हे त्यांनाच व सत्ताधाऱ्यांनाच माहिती!
पेडणेचे पाणी मुरते कुठे?
पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर स्वतःच्या घरात राहतात की भाड्याच्या घरात? याविषयी सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे. त्याचे झाले असे, की त्या बंगल्यासाठी पाणी विभागातर्फे पाणीपुरवठा केला जातो.
त्या ठिकाणी पाण्याचा मीटर नाही. याचा पुरावा काँग्रेसचे प्रवक्ते संजय बर्डे यांनी सादर करून आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या विरोधात पेडणे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून आमदारांची झोप उडवून दिली आहे.
त्यांनी म्हणे पाणी चोरलेले आहे, नळासाठी मीटर बसवलेला नाही असा दावा संजय बर्डेचा आहे. यावरून आता पेडणेचे पाणी मुरते कुठे? हाच चर्चेचा विषय ठरला आहे.
असेही चॅलेंज...
मध्यंतरी कोविड महामारी काळात म्हापसा शहरातील कुचेली मैदानावर भूखंड पाडून हे मैदान विकण्याचा डाव आहे, असा आरोप करीत काही सामाजिक कार्यकर्ते व लोकांनी एकत्र येत आवाज उठवला होता.
याप्रकरणी 144 कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदविले होते. सध्या पोलिसांकडून आरोपपत्र दाखल झाले असून खटला सुरू आहे. त्यामुळे सरकारने हे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत अशी या कार्यकर्त्यांची मागणी.
दुसरीकडे कुचेली मैदान कुठल्याही स्थिती लोकांच्या व खेळाडूंच्या हातातून जाऊ देणार नाही असा एल्गार त्यांनी केलाय. तसेच भविष्यात या मैदानाच्या संरक्षणासाठी हा लढा चालूच ठेवण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे आणि पोलिसांनी हवे असल्यास आणखी गुन्हे आमच्यावर नोंदवावे, असे खुले आव्हान या कार्यकर्त्यांनी सरकारला दिले आहे.
अशावेळी सरकार हे पूर्वीचे गुन्हे मागे घेते की या कार्यकर्त्यांचे हे चॅलेंज स्वीकारते? हे येणाऱ्या काळात समजेल.
राजचा नवा ब्रँड
राज भंडारे हा पेशाने जरी आर्किटेक्ट असला, तरी निर्वाणा टी-शर्टस् मध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. आता फेणी ही स्थानिक पातळीवरून जागतिक पातळीवर मिळण्याचेही काम त्यांनी हाती घेतले आहे.
‘सिंगल माल्ट’ व ‘लिक्विअर’ या श्रेणीमध्ये बसणारी ही फेणी त्यांनी आता ‘गोवाहा फेणी’ नावाने तयार केली असून ती जगभर घेऊन जाण्याचा राजचा संकल्प आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवारी गोवा हेरिटेज फेस्टिव्हलमध्ये त्यांनी ही फेणी शशी थरूर यांना चाखायला दिली.
इतर लोकांनीही वेगवेगळी देशी पेये त्यांना दिली असता थरूर यांनी जाताना मात्र ‘गोवाहा फेणी’ची बॉटल आग्रहाने आपल्यासोबत नेली आहे. राज भंडारी तेच म्हणतो, टकिलासारखे द्रव्य जगभर प्रसिद्ध होऊ शकते...
किर्लपाल दाभाळमधील सरपंचपुत्र
किर्लपाल दाभाळ पंचायतीमधील सरपंचपुत्र सध्या भलतेच फॉर्मात आहेत. ते एकेकाळी सरपंच होते, पण आता सरपंच त्यांच्या आई आहेत. परंतु तेच सध्या सरपंच असल्यासारखे वागतात. सरपंचाच्या सर्व अधिकृत फोनला ते उत्तर देतात.
सरपंचासाठी बोलावलेल्या बैठकांना ते हजेरी लावतात व तावातावाने आपले मत मांडतात. स्थानिक आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे सहकारी पंच गप्प आहेत. किर्लपाल दाभाळमधील हे बिन घटनात्मक सरपंचपुत्र सध्या पंचायत चालवतात.
फातोर्डासाठी नगरपालिका
फातोर्डा व मडगाव हे जरी वेगवेगळे विधानसभा मतदारसंघ असले, तरी हा संपूर्ण भाग मडगाव नगरपालिका कक्षेत मोडतो. मात्र, विकासकामांचा मुद्दा उपस्थित करून आता तेथे भेदाभेद करण्याचा प्रयत्न होऊ लागल्याने मडगावकरांमध्ये अस्वस्थता पसरत चालली आहे.
आजवर मडगावचे उपनगर म्हणूनच फातोर्ड्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे जागेच्या मर्यादेमुळे मडगावात होऊ न शकणारे प्रकल्प तेथे साकारले. पर्रीकरांच्या काळात वेगळे पोलिस स्टेशन देखील झाले.
वेगळ्या फातोर्डा नगरपालिकेचाही प्रस्ताव आखला गेला होता, पण त्याचे घोडे अडले ते पुढे सरकलेच नाही. मात्र, फातोर्डासाठी नवी नगरपालिका तयार झाल्यास मडगाव पालिकेचा दिमाख कुठल्या कुठे नाही होणार हे नक्की.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.