म्हापसा: पुजारींची संख्या कमी असल्याने गोव्यात (Goa) गणेश चतुर्थीनिमित्त (Ganesh Chaturthi) दरवर्षी महाराष्ट्र (Maharashtra) व कर्नाटकातील (Karnataka) किमान दोन हजार पुजाऱ्यांना आणावे लागते. पुजाऱ्यांची टंचाई भासत असल्याने ही उपाययोजना करण्यात आली असली तरी ही समस्या अद्याप सुटलेली नाही. गोव्यात अशा सर्वच पुजाऱ्यांना ‘भटजी’ (priests) हे आदरार्थी संबोधन वापरले जाते.
म्हापसा शहरात सुमारे दीडशे पूजारींना दरवर्षी आणले जाते. त्याचप्रमाणे बार्देश तालुक्यातील इतरही काही पुरोहित अशा पुजारींना गोव्यात आणत असतात. हे पूजारी प्रामुख्याने महाराष्ट्रातील पंढरपूर, परभणी, कोल्हापूर, सांगली, अंबाजोगाई तसेच कर्नाटकातील गोकर्ण प्रांतातून आणले जातात. त्यांना निमंत्रित करणारी पुरोहित मंडळी त्यांच्या निवासाची तसेच सकाळचा नाश्ता, दुपारचे व रात्रीचे भोजन इत्यादी व्यवस्था करीत असतात.
महाराष्ट्रातील अधिक
गोव्यातील बहुतांश हिंदुधर्मीय व्यक्तींना मराठी समजत असल्याने महाराष्ट्रातून आलेला पुजारी आणि गोव्यातील यजमान कुटुंब यांच्यातील भाषिक व्यवहाराबाबत समस्या उद्भवत नाही. कर्नाटकातून आलेल्या बहुतांश पुजाऱ्यांना कोकणी, मराठी आणि हिंदीदेखील माहीत नसते. असे असले तरी पुजाऱ्यांच्या टंचाईमुळे त्यांना नाईलाजाने बोलवावेच लागते.
म्हापसा शहराचे ग्रामपुरोहित अचल आपटे, घाटेश्वरनगर देवस्थानचे पुरोहित अनिल मराठे, राजू केळकर, जातवेद आपटे, खोर्ली-म्हापशातील पुरोहित राजू काकतकर व अविनाश काकतकर, महारुद्र हनुमान संस्थानचे पुरोहित भालचंद्र जोशी, दत्तवाडी संस्थानचे व्यंकटेश गोकर्णकर, बस्तोड्यातील सत्पुरुष देवस्थानचे वरद आपटे, शेळ-बस्तोडा येथील पुरोहित विशाल बापट, काणका येथील प्रकाश आपटे, वेर्ला-काणका येथील सोहत आपटे, कुचेली येथील गजानन सोमण असे म्हापसा शहर व परिसरातील प्रमुख पुरोहित दरवर्षी गोव्याबाहेरील पूजारींना निमंत्रित करीत असतात. त्याशिवाय, बार्देशातील कळंगुट, शिवोली, पर्वरी, हळदोणे, अस्नोडा इत्यादी भागांतील पुरोहितमंडळीही काही जणांना निमंत्रित करीत असतात.
घरगुती गणेशमूर्तींची संख्याही वाढली
म्हापसा शहरात हल्लीच्या काळात परप्रांतीय लोकांची मोठ्या संख्येने भर पडल्याने तसेच विभक्त कुटुंबपद्धतीमुळे गणेशमूर्ती पूजनाच्या संख्येत वाढ होत असल्याने सध्या या शहरातील घरगुती गणेशमूर्तींची संख्या सुमारे पाच हजार झालेली आहे. त्यामुळे एवढ्या प्रमाणात शास्त्रोक्त पद्धतीने पूजाविधी करण्यासाठी किमान शंभरेक पुजारींची आवश्यकता भासते. तथापि, सर्वच यजमानांच्या घरांतून निमंत्रण असल्याने पुजारी अखेर नाईलाजाने ‘शॉर्टकट’ पद्धतीने हे विधी करीत असतात व त्याबाबत यजमानमंडळीची त्याबाबत मूकसंमती असते.
अक्षतांचे वाटप…
पुरेशा संख्येने पुजारी उपलब्ध होत नसल्याने तसेच कोविडमुळेही काही पुजारींनी यजमान कुटुंबीयांना गणेशस्थापना व गणेशविसर्जन अशा दोन्ही विधींसाठी वेगवेगळ्या रंगांच्या अक्षता देण्याचा सुलभ मार्ग गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही पत्करला आहे. म्हापसा येथील पुरोहित राजू केळकर यंदा घरोघरी पुजारींना पाठवणार नसल्याने त्यांनी पूजेसंदर्भातील लिखित स्वरूपातील प्रत यजमानांना वितरित करून त्यांना अक्षता देण्यास प्रारंभही केलेला आहे.
"चतुर्थीवेळी पूजेसाठी शहरातील प्रत्येक प्रभागात किमान एक-दोन भटजी आवश्यक असल्याने तसेच तालुक्याच्या गावोगावीही प्रत्येक वाड्यावर अशीच आवश्यकता भासत असल्यानेच गोव्यात सध्या पुजारींची वानवा आहे. त्यामुळेच नाईलाजाने अन्य प्रांतांतून पुजाऱ्यांना आणावेच लागते. "
- अचल हरी आपटे, ग्रामपुरोहित, म्हापसा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.