
वास्को: मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी ‘फॉर्म्युला-४ रेस’ स्थानिकांना नको असेल तर मी जनतेसोबत आहे, असे वक्तव्य केल्याच्या काही तासांतच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना वास्कोत येऊन ही स्पर्धा बोगदा येथे होणार नसल्याचे जाहीर करावे लागले.
स्थानिकांचा विरोध असतानाही या स्पर्धेच्या आयोजनासाठी लाखो रुपयांची कामे हाती घेतली होती आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी त्या कामांचा आढावा घेण्यासाठी वास्कोला भेटही दिली होती.
मुरगावचे माजी आमदार मिलिंद नाईक आणि अनेक नगरसेवकांनी या रेसला विरोध दर्शविला होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्री शनिवारी सायंकाळी वास्कोत दाखल झाले. त्यांनी आमदार, नगरसेवक आणि सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की बोगदा येथील रहिवाशांना या रेसमुळे अडथळा निर्माण होत असेल, तर आम्ही ती गोव्यातच इतर ठिकाणी घेऊ. यावेळी आमदार संकल्प आमोणकर, दाजी (कृष्णा) साळकर, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत, मुख्याधिकारी सिद्धी विनायक नाईक,
उपजिल्हाधिकारी भगवंत करमली, मामलेदार प्रवीणजय पंडित, पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख, रेसचे आयोजक, सरकारी अधिकारी, मुरगावचे पोलिस निरीक्षक शेरिफ जॅकिस, वास्कोचे पोलिस निरीक्षक वैभव नाईक, रेल्वे पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमरनाथ पाशी आणि पोलिस उपस्थित होते.
ही स्पर्धा आयोजिण्यासाठी आमदार आमोणकर यांनी परिश्रम घेतले होते. चार दिवसांपूर्वीच साबांखा मंत्री कामत यांनी मुरगावात येऊन, ‘ही स्पर्धा होणारच’ असे सांगितले होते; परंतु लोकांच्या विरोधामुळे आमोणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाचारण केले.
त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी रेस होणार, त्या ठिकाणाची पाहणी केली. तसेच रहिवाशांच्या समस्या ऐकून त्यांचे निवेदन स्वीकारले. नंतर बायणा रवींद्र भवनमध्ये मुरगाव नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले.
१. ‘फॉर्म्युला-४’ ही कार रेसिंगची नवोदित किंवा तरुण रेसिंग ड्रायव्हर्सना व्यावसायिक मोटरस्पोर्टच्या जगात प्रवेश देण्यासाठी तयार केलेली श्रेणी आहे.
२. ती फॉर्म्युला १, २ आणि ३ या उच्चस्तरीय रेसिंग मालिकांची पहिली पायरी मानली जाते.
३. या शर्यतींमधील गाड्या एक आसनी, एरोडायनॅमिक डिझाईनच्या असतात.
४. त्या १६०० ते २००० सीसी इंजिन क्षमतेच्या असतात आणि सुमारे २०० किमी प्रतितास वेगाने धावतात.
५. ‘एफआयए’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या नियमानुसार ही मालिका चालवली जाते.
६. ही रेस सामान्यतः बंद रेस ट्रॅकवर आयोजित केली जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.