
Concerns among farmers, cashew and mango crops
डिचोली: काजू आणि आंबा पिकासाठी यंदा सध्या अनुकूल हवामान निर्माण झाले असतानाच अलीकडे दाट धुके पडू लागल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. धुक्यामुळे मोहोरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बागायदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आज (शनिवारी) तर डिचोलीत सर्वत्र धुक्याचा प्रचंड प्रमाणात प्रादुर्भाव जाणवला. सलग धुके पडत राहिले, तर त्याचा मोहोरावर खराब होण्याची शक्यता आहे.
निसर्ग नियमाप्रमाणे आता काजूपिकाचा हंगाम जवळ येऊ लागला असून काजूच्या झाडांना मोहोर बहरू लागला आहे. डिचोली तालुक्यातील सर्वणसह काही भागात काजूच्या झाडांना फळ धरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. हवामान संतुलित राहिल्यास फेब्रुवारी महिन्यापर्यंत काजू व्यवसायाची लगबग सुरू होण्याची शक्यता आहे. तसा अंदाजही कृषी तज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
डिचोली तालुका हा काजू पिकाबाबतीत आघाडीवर आहे. तालुक्यातील सर्वण, मये, नार्वे, लाडफे, कारापूर, पिळगाव, धुमासे, कुडचिरे आदी बहुतेक भागातील काजू हा एक प्रमुख व्यवसाय आहे. बहुतेक भागातील डोंगरमाथे काजूच्या झाडांनी वेढलेले आहेत. यंदा उशिरापर्यंत पडलेल्या अवकाळी पावसामुळे काजू बागायतदार काहीसे चिंतेत असले, तरी ''थंडी''मुळे अजूनतरी काजू पिकासाठी हवामान पोषक आहे. दुसऱ्या बाजूने अधूनमधून पडणाऱ्या धुक्यामुळे बागायतदार मात्र चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.
काजू पिकाचे वेध लागल्याने आता काजू बागायतदार काजू बागायत साफसफाई करण्याकडे वळले आहेत. मात्र वाढती मजुरी आणि सफाई मजूर मिळणे दुरापास्त झाल्याने बागायतदारांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बाहेरील राज्यातील मजूर अद्याप गोव्यात आले नाहीत. त्यामुळे कामे खाळंबली आहेत.
काही ठिकाणी मजूर मिळत नसल्याने काजू बागायतदार स्वतः मेहनत घेत आहेत. बहुतेक बागायतदार ‘ग्रास कटर’च्या साहाय्याने साफसफाई करीत आहे, असे सखाराम गावस या बागायतदाराने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.