Goa Politics: खरी कुजबुज; शेतकऱ्यांचा फंड संपला!

Khari Kujbuj Political Satire: बेतकी-खांडोळा अपक्ष जिल्हा पंचायत उमेदवार सुनील जल्मी यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्यामुळे आता प्रियोळ मतदारसंघात राजकीय वातावरण बदलाचे वारे वाहू लागले आहे.
Goa Latest Political News
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

शेतकऱ्यांचा फंड संपला!

ज्या शेतकऱ्यांचे मान्सूनोत्तर पावसामुळे नुकसान झाले, त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सुमारे अडीच कोटीहून अधिक रक्कम मंजूर केली आहे. परंतु राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम भरलेली नाही. अर्ज मंजूर झालेत, परंतु फंड नाही, तो मिळाल्यावर खात्यात भरपाईची रक्कम होईल, असे डिचोली क्षेत्रीय कार्यालयात सांगण्यात आले. ज्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिराऊन घेण्यात आला. डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होईल, फक्त आश्‍वासन दिले, पण त्या आश्‍वासनाचे काय झाले? याबाबत चर्चा शेतकऱ्यांत रंगत आहे. ∙∙∙

प्रियोळ मतदारसंघात दीपकची चलती!

बेतकी-खांडोळा अपक्ष जिल्हा पंचायत उमेदवार सुनील जल्मी यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्यामुळे आता प्रियोळ मतदारसंघात राजकीय वातावरण बदलाचे वारे वाहू लागले आहे. सुनील जल्मी हे प्रियोळचे माजी आमदार तथा मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांचे खंदे समर्थक असल्याने प्रियोळ मतदारसंघात सध्या दीपकची चलती आहे. मागच्या दोन विधानसभा निवडणुकीत मगोला प्रियोळात हार पत्करावी लागली असली, तरी यावेळेला मात्र जिंकणारच असा दावा मगो समर्थकांकडून करण्यात येत आहे. ∙∙∙

पक्ष महत्त्‍वाचा की जनता?

नुकत्‍याच झालेल्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत विरोधकांपैकी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड एकत्र आले. परंतु, आप, आरजीपी या पक्षांनी मात्र युतीकडे पाठ फिरवत स्‍वतंत्र चुला मांडल्‍या. त्‍यातच आता राज्‍य विधानसभेचे पाच दिवसीय हिवाळी अधिवेशन येत्‍या १२ जानेवारीपासून सुरू होत आहे. अधिवेशनांमध्‍ये विरोधी पक्षांच्‍या सर्वच आमदारांनी संघटित होऊन सत्ताधाऱ्यांना जाब विचारावा आणि आपले प्रश्‍‍न सोडवावे, अशी जनतेची माफक अपेक्षा असते. परंतु, विरोधकांना जनतेपेक्षा पक्ष महत्त्‍वाचा वाटत असल्‍याने आणि जिल्‍हा पंचायत निवडणुकीत त्‍यांनी ते दाखवूनही दिल्‍याने विधानसभा सभागृहात ते आपापल्‍या पक्षांची भूमिका घेऊन उतरणार की जनतेसाठी लढणार? याकडे गोमंतकीय जनतेचे लक्ष लागून आहे. ∙∙∙

‘बर्च’नंतरही डोळे उघडत नाहीत!

‘बर्च’ नाईट क्लबमध्ये आग लागली, २५ जणांचे प्राण गेले. सरकारने काही अधिकाऱ्यांना निलंबित केले, कारण परवाने बेकायदेशीरच होते. लोक म्हणाले, चला, आता तरी धडा मिळाला असेल. पण, धडा वाचायचाच नसेल, तर पुस्तक उघडायचे कशाला? आजही बेकायदेशीर परवाने, नियमांना केराची टोपली आणि रोज सकाळी बातम्यांत ‘हेही बेकायदेशीर, तेही बेकायदेशीर’ अशी माळ सुरूच आहे. अधिकारी अजूनही डोळे मिटून कर्तव्य बजावत आहेत. वरून आदेश, खालून आशीर्वाद आणि मधे नियमांची शोकांतिका! लोक आता टोमणे मारू लागलेत, ‘बर्च’मध्ये आग लागली, पण काहींच्या डोक्यात अजूनही अंधारच आहे. अधिकाऱ्यांना धडा द्यायचा असेल, तर जनताच देईल, असा संदेश राज्यात फिरत आहे. त्यामुळे परीक्षा कधी, निकाल कधी आणि पास-नापास कोण? हे मात्र वेळच ठरवेल! ∙∙∙

एक मत कुठून आले?

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवाराला १५ ऐवजी १६ मते पडली. हे एक मत कुठून आले, त्यावरून चर्चेला उधाण आले आहे. मात्र भाजपवाल्यांना एक मत जास्त मिळणार, हे पूर्वीच माहीत होते का? त्यांनी तशी फिल्डिंग लावली होती का? याबद्दलच्या शंका कुशंका व्यक्त होऊ लागल्या आहेत. अर्ज सादर करण्याच्या दिवशी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने कुणाला तरी सांगितले होते, की आम्ही जरी १५ असलो, तरी विरोधी पक्षातून मतांचा अहेर आम्हाला मिळू शकतो आणि आज तसेच घडले. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून आल्यावर आपण सांगितलेले भाकीत सत्यात उतरले, म्हणून तो भाजपवाला जास्तच खुशीत दिसत होता. काही भाजपवाले, तर पक्ष सोडून काँग्रेसमध्ये जाऊन निवडून आलेल्या उमेदवारावर शंका घेताना दिसत होते. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: ..काँग्रेसमध्ये भाजपला मदत करणारा ‘रोग’! एल्‍विस गोम्‍स यांचे टीकास्त्र; नेत्‍यांना ‘डिटॉक्‍स’ करण्‍याची गरज असल्याचा दावा

रितेशचे ‘वजन’ वाढले!

कुर्टी-खांडेपारच्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत प्रितेश गावकर भाजपच्या तिकिटावर निवडून आल्याने रितेश नाईक यांचे राजकीय वजन वाढले आहे. प्रितेश गावकर यांना निवडून आणण्यासाठी रितेश यांच्यासोबत भाजपच्या इतर नेत्यांनी मोठे कष्ट घेतले. विशेष म्हणजे रवी नाईक यांच्या निधनानंतर फोंड्याला प्रतिनिधित्व नसल्याने भाजपचा उमेदवार निवडून येणे गरजेचे होते. रितेश यांनी इतरांसमवेत कुर्टी आणि खांडेपार तसेच वेरे वाघुर्मे भागात डोंगराळ भाग सर्वांशी संपर्क साधला होता. आमदार गोविंद गावडे यांच्यामुळे वेरे-वाघुर्मेत भाजपला मतांची आघाडी मिळाल्याने हा विजय सोपा ठरला होता, मात्र रितेश नाईक आणि सहकाऱ्यांच्या प्रयत्नांची दखल भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी घेतल्याने सध्या तरी रितेशचे वजन वाढले हे नक्की. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: 'क्रॉस' व्होटिंगवरुन राजकारण तापले; दक्षिण गोव्यात भाजपला 15 ऐवजी 16 मतं

रुद्रेश्वराची निवडणूक?

हरवळे येथील श्री रुद्रेश्वर देवस्थानची निवडणूक कधी असा प्रश्न आता चर्चेत आला आहे. देवस्थानच्या रथयात्रेच्या वर्धापन दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर आता हा प्रश्न चर्चेला आला आहे. २०१७ नंतर या देवस्थानवर राज्य सरकारने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. देवस्थानचे महाजन कोण यावरूनही वाद आहेत. त्यामुळे समाजातील वाद नंतर मिटवा आधी निदान देवस्थानची निवडणूक घ्या, अशी चर्चा भंडारी समाज वर्तुळात ऐकू येत आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com