पणजी, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला खरंच समजले का? त्यांच्याच आधिपत्याखाली जगातील सर्वांत मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आकारास आले.
त्यामुळेच राष्ट्रीय सार्वभौमत्व प्राप्त झाले. संविधानात नमूद केलेल्या नागरी मूल्यांचे पालन तसेच आदर आपल्या वर्तनातून प्रतिबिंबित व्हायला हवा. लोकशाही वाचवण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने डोळसपणे मतदानाचा हक्क बजावावा’’, असे प्रतिपादन ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी केले.
‘समाजोन्नती’ संघटनेच्या वतीने रविवारी पणजी येथील ‘इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा’च्या सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी विशेष अतिथी या नात्याने नायक यांनी उपस्थितांना संबोधित केले.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून लोकायुक्त अंबादास जोशी, निवृत्त सनदी अधिकारी दौलत हवालदार, ‘समाजोन्नती संघटने’चे अध्यक्ष शंभू भाऊ बांदेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक पातळीवर उल्लेखनीय योगदान देणारे रमेश कोलवाळकर,
आनंद कवळेकर आणि रोहन माळगावकर या तिघांचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. तसेच राजू नायक व मान्यवरांच्या हस्ते ‘वाटचाल’ स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले. ही स्मरणिका ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त असामी दिवंगत रवींद्र केळेकर यांना समर्पित करण्यात आली.
राजू नायक यांनी भाषणात वर्तमान स्थितीवर भाष्य करून रोखठोक मते मांडली. ‘‘नागरी कर्तव्याप्रति प्रत्येकाने जागले पाहिजे’’, असे त्यांनी आवाहन केले.
लोकायुक्त जोशी म्हणाले, ‘‘जिज्ञासू वृत्ती, अफाट वाचन व चिंतनाद्वारेच आपण बाबासाहेबांच्या स्वप्नांना गवसणी घालू शकतो. बदलत्या काळात वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हायला हवी. तसेच तरुण पिढीत विचारवंत, लेखक घडावेत’’.
उद्घाटनपर भाषणात शंभू भाऊ बांदेकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. ‘‘त्यांच्या विचारांचे अनुनयन व्हावे’’, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी दिवंगत रवींद्र केळेकर यांचे पुत्र गिरीश, रमेश कोलवाळकर यांनीही अनुभव कथन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.