पणजी: आम आदमी पक्षाचे (AAP) मागील निवडणुकीतील (Election) मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तथा राज्य निमंत्रक एल्विस गोम्स (Elvis Gomes) यांनी काल कॉंग्रेस (Congress) पक्षामध्ये रितसर प्रवेश केला. येथील कॉंग्रेस कार्यालयातील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar kamat) आणि प्रदेश समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी गोम्स यांचे स्वागत केले. यावेळी कुंकळ्ळीचे कॉंग्रेस नेते युरी आलेमाव (Yuri Alemao) तसेच प्रदेश समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. (Elvis Gomes rejoined Goa Congress party)
यावेळी गोम्स म्हणाले, ‘गोवा फर्स्ट’ हे माझे घोषवाक्य असेल. ‘आप’ सोडून नऊ महिने झाल्यानंतर गोव्याच्या हितासाठी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसचे 10 आमदार फुटले. त्यांनी गोवेकरांच्या पाठीत खंजीर खुपसला. भाजपचे सरकार गोव्याचे अस्तित्व नष्ट करत आहे. तर ‘आप’ लोकांना खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करून मते मिळवू पाहात आहे, असा आरोप यावेळी गोम्स यांनी केला.
गोम्स हे गोवा राज्याचे उच्च श्रेणीचे प्रशासकीय अधिकारी होते. त्यांच्या अनुभवाचा लाभ कॉंग्रेसला मिळणार आहे. त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे, असे यावेळी कामत म्हणाले. मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षाच्या निर्णयानुसार काम करत राहीन. भाजपला सत्तेवरून हटवायचे आहे, असे युरी आलेमाव यावेळी म्हणाले.
‘आप’ची कुलंगडी बाहेर काढणार
‘आप’ ही भाजपची बी टीम आहे. गोम्स काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यांना ‘आप’चा खरा चेहरा माहीत आहे. गोवाभर ‘आप’ची कुलंगडी बाहेर काढण्यासाठी गोम्सचा वापर काँग्रेस करणार आहे, अशी टीका चोडणकर यांनी यावेळी केली. येत्या काळात आप व इतर पक्षाचे अनेक नेते कॉंग्रेसमध्ये येणार आहेत. मात्र, काँग्रेसच्या कुंकळ्ळीतील उमेदवारीबाबत हायकमांड निर्णय घेणार असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.
तो आवाज ट्रोजनचा नव्हेच!
काँग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांच्या आवाजातील एक ऑडियो क्लीप सध्या व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी गिरीश चोडणकर यांच्यावर बरेच गंभीर आरोप केले आहेत. याबाबत चोडणकर यांना विचारले असता. त्या ऑडियोतील आवाज ट्रोजनचा नव्हे, तो डब केलेला आहे. भाजपचे हे कारस्थान आहे, असा दावा चोडणकर यांनी केला. याबाबत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.