फोंडा: वीज खात्याचे कर्मचारी ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचीच मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे ग्राहकांपर्यंत सुरळीत आणि सुरक्षित वीज पोचवण्याची. त्यासाठी समर्पित भावनेने काम करा, जे चांगले आहे, ते देण्याचा प्रयत्न वीज खाते करीत असून वीज खात्याला सर्वोत्कृष्ट खाते करण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करूया आणि चांगली सेवा देण्यासाठी कटिबद्ध होऊया, अशा शब्दात वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी वीज खात्याच्या गोवा आयटक कर्मचारी संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी शुभेच्छा दिल्या.
फोंड्यातील भोलानाथ सभागृहात आज (रविवारी) आयोजित या कार्यक्रमाला व्यासपीठावर मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासमवेत आयटक कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, गोवा राज्य आयटकचे कामगार नेते प्रसन्ना उटगी, सरचिटणीस ॲड. राजू मंगेशकर, अध्यक्ष कार्लोस फालेरो, वीज खात्याचे कार्यकारी अभियंते सुदन कुंकळ्येकर, सामाजिक कार्यकर्ते तथा रायझिंग फोंडा प्रमुख डॉ. केतन भाटीकर, कामगार नेते ॲड. सुहास नाईक व आबेल डिसिल्वा आदी उपस्थित होते. समई प्रज्वलनाने या कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
ढवळीकर म्हणाले, कोणत्याही कामगार संघटनेने विचारपूर्वक निर्णय घेण्याची आवश्यकता असते. वीज खात्याने कधी कुणाचा घात केला असे कधी ऐकिवात आले नाही, कारण या खात्याच्या कर्मचाऱ्यांची समर्पक वृत्तीने काम करण्याची पद्धत आणि ग्राहकांप्रती असलेली आस्था यामुळेच खात्याचा नावलौकिक होत आहे.
एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी समन्वयाची गरज असते, आणि ते समन्वय वीज खात्याच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गात आहे म्हणूनच तर वीज खात्याच्या कामाची विधानसभेतही प्रशंसा झाली असून याचे श्रेय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जाते.
कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका व प्रसन्ना उटगी तसेच अधिकारी सुदन कुंकळ्येकर यांनी आपले विचार व्यक्त करताना वीज खात्याकडून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे अभिवचन दिले. स्मरणिकेचे प्रकाशन वीजमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक राजू मंगेशकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण पालेकर यांनी तर आबेल डिसिल्वा यांनी आभार मानले.
वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची असून एखादवेळेस वीज गेल्यास वीज खांबांवर तसेच इतरत्र काम करणाऱ्या वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक उपकरण प्रदान करण्याचा खात्याचा मानस आहे. त्यासाठी घड्याळ किंवा हेल्मेटद्वारे विजेचा प्रवाह सुरू असल्यास एका विशिष्ट आवाजाद्वारे या कर्मचाऱ्यांना सावध करण्यात येणार असून अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून त्यासंबंधी उपकरण निर्मितीवर भर देण्यात येत असल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले.
ग्राहकांना वीज व्यवस्थित देण्यासाठी सध्या ३५०० कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत. भूमिगत केबल घालण्याबरोबरच अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करणे, वीज कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी आवश्यक साधने देणे, गेली अनेक वर्षे कंत्राटी तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्यांना कायम सेवा देणे असे विविध निर्णय वीज खात्याने घेतले असून त्याची पूर्तता करण्यात येत आहे. सेवा चांगली द्या, लोकांना आश्वस्त करा, असेही सुदिन ढवळीकर म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.