Goa Express: गोवा एक्सप्रेसमध्ये आठ जणांना लुटण्यात आल्याच्या गुन्ह्याचे आता वास्कोतील रेल्वे पोलिस तपास करणार आहेत. गोव्याहून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या आठ कुली कामगारांना लुटारूंनी गोव्यातच गुंगीचे औषध दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे गोव्यातून इतरत्र जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेत आला आहे.
लुटारूंनी सर्वांकडील मोबाईल संच आणि रोख रक्कम असा एकूण 92 हजारांचा ऐवज लुटला आहे. या प्रकरणी बेळगाव रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अधिक तपासासाठी हे प्रकरण वास्को रेल्वे पोलिसांकडे वर्ग केले आहे.
वास्कोच्या रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी मुख्यद्वार असले तरी फलाटावर जाण्यासाठी अनेक अनधिकृत मार्ग आहेत. ते मार्ग अडवण्यासाठी मीटरभर उंचीचे पत्रे लावण्यात आले आहेत. ते सहजपणे ओलांडता येतात.
यामुळे अशा कारवाया करण्यासाठी कुणीही सहजपणे फलाटावर जाऊन रेल्वेत चढू शकतो. तिकीट तपासनीसही मडगाव पुढेच या गाडीत येत असल्याने वास्को ते मडगाव दरम्यान लुटारुंना रान मोकळे मिळते. गोवा एक्सप्रेसमधील हा प्रकार एकाचवेळी आठ जणांच्या बाबतीत घडल्याने चर्चेत आला आहे. मात्र असे प्रकार अनेकदा घडले असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगण्यात येते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.