मुदतपूर्व निवडणुकीची सज्जता, भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत रणनीतीवर खल; 40 जागा लढवून 30 जिंकण्याचा निर्धार

Goa BJP: गेली १५ वर्षे राज्याच्या सत्तेवर असलेला भाजप पुन्हा एकदा सत्ता कायम राखण्याच्या निर्धाराने कामाला लागल्याचे स्पष्ट झाले.
Early election preparedness bjp
Early election preparedness bjpDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेली १५ वर्षे राज्याच्या सत्तेवर असलेला भाजप पुन्हा एकदा सत्ता कायम राखण्याच्या निर्धाराने कामाला लागल्याचे स्पष्ट झाले. वर्षभराच्या खंडानंतर आज भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात झालेल्या चर्चेवरून मुदतपूर्व निवडणूक होणार असल्याचा अंदाज बांधता येत आहे.

अलीकडेच पश्चिम बंगालमधील निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा आत्मविश्वास उंचावला असून, त्याच पार्श्वभूमीवर गोव्यातही मुदतपूर्व विधानसभा निवडणुका घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

या दिवसांत भाजप कार्यालयात संघटनात्मक हालचालींना आलेला वेग आणि कार्यकर्त्यांच्या बैठकींची वाढलेली संख्या यांमुळे या चर्चांना अधिक बळ मिळत आहे. विश्वासार्ह सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाकडून राज्यातील नेत्यांना निवडणुका अपेक्षेपेक्षा लवकर होऊ शकतात, या दृष्टीने सज्ज राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

त्यानंतर राज्य भाजपने संघटनात्मक पातळीवर विविध नियुक्त्या करण्यास सुरुवात केली असून, मतदारसंघ व मंडळ स्तरावरील रचना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. पक्षाच्या विविध आघाड्या, मोर्चे आणि विभागांशी संबंधित बैठका सातत्याने घेतल्या जात आहेत.

Early election preparedness bjp
Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

पक्ष संघटना निवडणुकीसाठी तयार : प्रदेशाध्यक्ष

प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी २०९ पैकी १९७ सदस्य उपस्थित असल्याचे सांगत संघटना पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या तयारीला लागल्याचा दावा केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कार्यकर्त्यांना थेट जनतेमध्ये जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करण्याचे आवाहन केले, तर केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांनी गोव्यात सरकारविरोधी वातावरण नसल्याचा दावा करत विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांचा प्रचार अधिक प्रभावीपणे करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

भाजपचा दावा, विरोधकांसाठी इशारा!

गोव्यात सध्या कोणतीही ‘अँटी इन्कमबन्सी’ नसल्याचा दावा करत भाजपने विरोधकांसमोर थेट आव्हान उभे केले आहे. गुजरातप्रमाणे गोव्यातही भाजप सलग बहुमतासह सत्तेत परतेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांनी व्यक्त केला. एकीकडे विरोधक अजूनही आघाड्या आणि नेतृत्वाच्या गणितात अडकलेले असताना भाजपने मात्र ‘बूथ ते प्रदेश’ अशी संपूर्ण संघटनात्मक यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज केली आहे. त्यामुळे २०२७ ची निवडणूक दूर असली तरी तिची राजकीय धामधूम सुरू झाल्याचे या बैठकीने स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवडाभरात भाजपच्या राज्य मुख्यालयात अनेक महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, बूथस्तरीय संघटनांची पुनर्बांधणी, मतदार संपर्क अभियानाची आखणी आणि आगामी राजकीय रणनीती यांवर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. विविध मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करून निवडणुकीसाठी आवश्यक वातावरण तयार करण्याचा प्रयत्नही सुरू आहे.

Early election preparedness bjp
Goa Traffic Diversion: मेरशी येथील अटल सेतूवर जाणारा रस्ता दुरुस्तीसाठी 25 जूनपर्यंत बंद, पर्यायी मार्ग कोणता?

४० जागा लढविणार, अन् ३० जिंकणार

भाजप यंदा सर्व ४० जागा लढविणार आहे. त्यातील ३० जागा जिंकणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी बैठकीनंतर सांगितले. भाजपचे पक्षश्रेष्ठी युतीबाबत योग्यवेळी निर्णय घेतील, असे सांगत राजकारणात काहीही होऊ शकते, याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

विरोधकांच्या उणिवांवर भाजपचा डोळा : राजकीय निरीक्षकांच्या मते, भाजप सध्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात, असे गृहीत धरूनच तयारी करत असल्याचे दिसते. केंद्रातील आणि राज्यातील सत्तेचा लाभ, विकासकामांचा मुद्दा, तसेच संघटनात्मक ताकद यांच्या जोरावर चौथ्यांदा सत्ता मिळवण्याचे लक्ष्य पक्षाने ठेवले आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष अजूनही एकत्रित रणनीती आखण्यात व्यस्त असल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेण्याची भाजपची भूमिका असल्याचे मानले जात आहे.

राजकीय वातावरण निवडणूकमय

मुदतपूर्व निवडणुका घेण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही भाजपकडून सुरू असलेल्या हालचाली, वाढलेला संघटनात्मक वेग आणि कार्यकर्त्यांना दिले जात असलेले संदेश पाहता राज्यातील राजकीय वातावरण हळूहळू निवडणूकमय होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आगामी काही महिन्यांत केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयांवर आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

सरकारी योजनांचे राजकीय भांडवल

गोवा विधानसभा निवडणुकीला अजून काही महिने बाकी असले तरी भाजपने २०२७ च्या राजकीय रणांगणासाठी आतापासूनच कंबर कसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत तब्बल ३० जागा जिंकण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य जाहीर करत पक्षाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले. ‘चला, उठा, सज्ज व्हा’ हा मंत्र देत प्रत्येक कार्यकर्त्याला बूथस्तरावर सक्रिय होण्याचे आदेश देण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवून त्याचे राजकीय भांडवल करण्याची रणनीतीही बैठकीत स्पष्टपणे मांडण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com