Goa Forest Fire: सत्तरी तालुक्यात गेल्या महिन्यात म्हादई अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यात साट्रे, देरोडे, झाडानी, पाली, चरावणे, वाघेरी डोंगर भाग, चोर्ला, सुर्ला अशा म्हादई अभयारण्य क्षेत्रात वणवा पेटला होता.
त्यात मोठ्या प्रमाणात जंगल संपत्ती जळाल्याने नैसर्गिक अधिवास नष्ट झाला. परिणामी अभयारण्यात राहणारे वन्यप्राणी लोकवस्तीत येऊ लागले आहेत.
सत्तरी तालुक्यात विविध गावातील बागायती पिकात, रस्त्यालगत गवे फिरताना दिसत आहेत. रानडुकरांचाही उपद्रव वाढल्याने काहींनी दहशतीमुळे शेती करणे सोडून दिले आहे.
आगीमुळे नष्ट झालेले वन्यप्राण्यांचे अन्न ते पुन्हा निर्माण होण्यासाठी आता जंगली भागात फणस, आवळा, जांभूळ, चिंचा, बोर अशा विविध फळांची लागवड गरजेची बनली आहे,असे अनेक पर्यावरणप्रेमींनी सांगितले.
आगीमुळे वन्यप्राण्यांचा अधिवासच नष्ट झाला आहे. अस्तित्वासाठी वन्यजीवांना आता लोकवस्तीचा आधार वाटत आहे. जंगलातील समृद्ध झाडे नष्ट झाल्यावर त्याचे भयानक परिणाम मानवी जीवनावर होणार आहेत. त्यात पुराचा धोकाही वाढला आहे.
कारण जंगलात झाडे असताना पावसाचे पाणी तिथे स्थिरावते. ती नसल्याने पावसाचे पाणी पायथ्याकडे वेगात वाहून येईल व जमिनीची धूपही होऊ शकते.
-सूर्यकांत गावकर (भुईपाल, पर्यावरणप्रेमी)
जंगलांचे संवर्धन, संरक्षण व्हायलाच हवे. सत्तरीत झालेली मानवी कृती अशोभनीय आहे. त्याचे लोकवस्तीवर परिणाम दिसून येत आहेत. निसर्गावर आक्रमण करण्याचा प्रयत्न मानवाने करू नये. सत्तरी तालुक्यात म्हादई अभयारण्यांना लागलेल्या आगी या लोकांनीच लावल्या हे सिद्ध झाले आहे. भविष्यात त्याचा दूरगामी परिणाम निश्चितच होणार आहे.
- गौरीश गावस, मासोर्डे-वाळपई
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.