Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Goa Muder Case:पोलिसांनी सिमेंटचा ब्लॉक तसेच इतर वस्तूंचा पंचनामा करून ते ताब्यात घेतले.
दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा
Goa Muder CaseDainik Gomantak

दारूच्या अर्ध्या बाटलीसाठी मित्राच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खून केल्याची धक्कादायक घटना कुठ्ठाळी येथे घडली. मृताचे नाव लिओनेल ऊर्फ पिंकू लोबो (वय ३२ वर्षे) असून वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी त्याचा मित्र आलेक्स कुतिन्हो (वय ३४ वर्षे) याला अटक केली आहे.

ही घटना पाजेंतर-कुठ्ठाळी येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत घडली. दारूच्या नशेत पिंकूचा खून केल्याची कबुली आलेक्स याने दिली आहे.

पिंकूचे नातेवाईक विदेशात असल्याने ते गोव्यात परतरल्यावर त्यांच्याकडे पार्थिव सोपविले जाईल. खुनाची माहिती मिळताच कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांनीही रात्री घटनास्थळी भेट दिली.

पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवड्यापूर्वी आलेक्स याने दारूची बाटली आणली होती. इमारतीत बसून मद्यपान केल्यावर उरलेली अर्धी बाटली दारू पिंकू घरी घेऊन जाऊ लागला. त्यावेळी आलेक्स याने विरोध केला.

तरीही पिंकू बाटली घेऊन गेला. स्वत: पैसे खर्च करून आणलेली दारूची बाटली पिंकू घेऊन गेल्याने आलेक्स संतापला होता. या गोष्टीला आठवडा झाला, तरी त्याचा राग मनात होता. हा राग मनात ठेवून मंगळवारी (ता. २) सायंकाळी पिंकूच्या डोक्यावर सिमेंटचा ब्लॉक घालून आलेक्सने त्याचा खून केला.

तेथील काही मजुरांनी ही माहिती तेथील गॅरेजवाल्याला सांगितल्यावर त्याने त्या इमारतीच्या मालकाला कळविले. माहिती मिळताच आगशी येथे राहणारे इमारतीचे मालक महेंद्र बरड तेथे आले. त्यांनी रात्री अकराच्या सुमारास वेर्णा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली.

वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो, वास्कोचे उपविभागीय पोलिस अधिकारी सलीम शेख, दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत तेथे पोहचल्या. तेथे फॉरेन्सिक पथक, श्वान पथकाला पाचारण केले.

पोलिसांनी सिमेंटचा ब्लॉक तसेच इतर वस्तूंचा पंचनामा करून ते ताब्यात घेतले. आलेक्सच्या विरोधात नव्या फौजदारी कायद्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या १०३ कलमाखाली गुन्हा नोंद केला असून त्याला रिमांडसाठी गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वेर्णा पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी दिली.

दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा
Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

जाता जाता केली लोकांची दिशाभूल

मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास आलेक्स त्या इमारतीकडे आला. तेथे त्याला मद्यपान करून झोपलेला पिंकू दिसला. पिंकूला पाहताच त्याने तेथील सिमेंटचा एक ब्लॉक उचलून पिंकूच्या डोक्यावर टाकला. त्यामुळे रक्तस्त्राव होऊन पिंकू जागीच मरण पावला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पिंकूला पाहून घाबरलेला आलेक्स इमारतीबाहेर आला. कपड्यांवरील रक्ताचे डाग पाहून लोक आपल्याला पकडतील, अशी त्याला भीती वाटली. पण त्याने युक्ती लढवून ‘आतमध्ये पिंकूचा कोणीतरी खून करून पळून गेला’, असे सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com