DGP Jaspal Singh: राज्यातील ड्रग्ज व्यवसायात स्थानिक, परप्रांतीय तसेच विदेशी नागरिकांचा सहभाग आहे. हा व्यापार गुप्तपणे चालतो. स्थानिकांच्या मदतीशिवाय हा व्यापार राज्यात होऊच शकत नाही. ड्रग्ज माफिया गोव्यात नाहीत, तर येथील विक्रेत्यांच्या मदतीने हा व्यापार केला जात आहे.
पोलिसांच्या कारवाईमुळे गेल्या काही वर्षात वाढती ड्रग्जची प्रकरणे उघडकीस आली आहेत व अधिकाधिक जणांना गजाआड करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
गोवा हे ड्रग्ज मिळणारे केंद्र आहे व त्याला गोव्यात मागणी आहे. या ड्रग्जची तस्करी रेल्वे, बस, विमानाने होत असते. या मार्गाने गोव्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवासाची तपासणी करणे अशक्य आहे. काही विशिष्ट माहिती असल्याशिवाय ही तपासणी करणे आवाक्याबाहेर आहे. राज्यातील काही स्थानिकच या ड्रग्ज व्यवसायात गुंतलेले आहेत. या ड्रग्जसंदर्भात लोकांना माहिती देण्याचे आवाहन करूनही कोणीही माहिती देण्यास पुढे येत नाहीत, ही खंत आहे, असे सिंग म्हणाले.
दबाव नव्हता !
हल्लीच गाजलेल्या बाणस्तारी अपघात प्रकरणात पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नव्हता. हे प्रकरण मिटवण्यासाठी कोणाचेही मला व्यक्तिशः फोन आले नाहीत. सुरुवातीला तपास योग्य दिशेने सुरू होता. मात्र, काहीजणांनी या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. हा अपवाद वगळता पोलिस तपासात कोठेही बाधा आलेली नाही.
गंभीर गुन्ह्यांत ३६ % घट राज्यात गंभीर गुन्ह्यांत वाढ झालेली नाही, तर गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ३६ टक्के घट झाली आहे. काही काळातच राज्यात यावर्षी सहा खुनाच्या घटना घडल्या. त्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली. राज्यात औद्योगिकीकरणामुळे परप्रांतीय गोव्यात येत आहेत. त्यांचा स्वभाव वेगळ्या तऱ्हेचा असू शकतो. त्यामुळे स्वाभाविक नोंद होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये अधिक संशयित व तक्रारदार हे परप्रांतीय आहेत. काही परप्रांतीय रोजगार न मिळाल्याने ड्रग्ज व्यापाराकडे वळत आहेत. गोवा पर्यटन स्थळ असल्याने मौजमजेसाठी येणाऱ्यांकडून ड्रग्जची मागणी आहे.
...तरच तपासणी
रस्त्यावर चालकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन याविरुद्ध त्यांना शिस्त लावण्यासाठी पोलिस प्रयत्न करतात. दंडात्मक कारवाई ही महसुलासाठी नव्हे तर त्यामुळे वाहन चालकांना वचक व पोलिसांचा धाक बसेल,यासाठी आहे. पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन केल्यासच त्यांना अडवून तपासणी करा, अन्यथा त्यांना अडवू नये, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असे सिंग म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.