पणजी: राज्यात सध्या चर्चेत असलेल्या हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी ‘कर्लिस’ बीच रिसॉर्टचे मालक आणि केअर टेकर एडवीन नुनीस आणि ड्रग्स पेडलर दत्तप्रसाद गावकर या दोघांना पोलिसांनी अटक करून चौकशी सुरू केली आहे. दुसरीकडे सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग या संशयितांना म्हापसा सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी 10 दिवसांची पोलिस कोठडी बजावली. याप्रकरणी पोलिसांच्या रडारवर अनेकजण असून येत्या काही दिवसांत त्यांनाही ताब्यात घेतले जाणार आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
(Drug peddler arrested along with owner of 'Kurlis')
सोनाली फोगट प्रकरणातील धागेदोरे आता हाती लागत असून प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. ही घटना ज्या बारमध्ये घडली, त्या विवादास्पद कर्लिस बीच रिसॉर्टचा मालक एडवीन नुनीस याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या बाथरूममध्ये पोलिसांनी 2.2 ग्रॅम मेठापेथामाईन ड्रग्स जप्त केले आहे. त्यांच्या विरोधात एनडीपीएस कलम 22 ब, 25 आणि 29 अन्वये गुन्हा नोंद केला असून पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी, अधीक्षक शेखर प्रभुदेसाई आणि निरीक्षक प्रशाल देसाई यांनी ही कारवाई केली. या संशयितांची कसून चौकशी सुरू असून गावकर याला ड्रग्स पुरवणाऱ्याचाही शोध सुरू आहे.
दहा दिवसांची कोठडी
काल पोलिसांनी अटक केलेला मुख्य संशयित सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि मित्र सुखविंदर सिंग या दोघांना म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी 10 दिवसांची पोलिस कोठडी बजावली. पोलिसांना अनेक वस्तू साक्ष, पुराव्यासाठी गोळा करावयाच्या आहेत. त्यासाठी संशयितांना पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती.
फुटेज ताब्यात
सोनाली या सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्यासोबत ग्रॅण्ड लिओनी रिसॉर्टवरून ‘कर्लिस’मध्ये आल्या होत्या. तेथे पार्टीमध्ये संशयितांनी त्यांना जबरदस्तीने ड्रग्स पाजले. नंतर सोनाली यांना अस्वस्थ वाटू लागले. याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
सतत वादग्रस्त राहिलेल्या ‘कर्लिस’ क्लबचा मालक एडवीन नुनीस याच्याकडे बंदी असलेले एमडीएमए ड्रग्स सापडले आहे. त्याच्या विरोधात अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये कारवाई सुरू केली असून चौकशी केली जात आहे. बारमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची बारकाईने पाहणी केली जात आहे. यातून धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
दत्तप्रसाद गावकरकडे ड्रग्स आले कुठून?
संशयित सुखविंदर सिंग याने दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांना एमडीएमए हे ड्रग्स आणून देणारा पेडलर दत्तप्रसाद गावकर, (रा. वाळपई) हा फोगट राहात होत्या, त्या ग्रॅण्ड लिओनी रिसॉर्टमध्ये रूमबॉय म्हणून कामाला आहे. त्याच्याही मुसक्या पोलिसांनी आज आवळल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.