

पणजी: गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्या देशी-विदेशी पर्यकांसाठी 'दृष्टी मरीन'चे जीवरक्षक देवदूत ठरले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, २०२५ या वर्षभरात या जीवरक्षकांनी आपल्या प्राणांची बाजी लावून तब्बल ५४८ जणांचे प्राण पाण्यात बुडताना वाचवले आहेत. यामध्ये भारतीय पर्यटकांसह मोठ्या संख्येने परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
२०२५ हे वर्ष गोवा किनारपट्टीवरील सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक राहिले. 'दृष्टी मरीन'ने दिलेल्या माहितीनुसार, वाचवण्यात आलेल्या ५४८ पर्यटकांपैकी ४५० भारतीय नागरिक होते, तर ९८ विदेशी पर्यटकांचा समावेश होता. केवळ पाण्यातून बाहेर काढणेच नव्हे, तर प्रथमोपचार, हरवलेल्या व्यक्तींचा शोध आणि इतर आपत्कालीन मदतीद्वारे एकूण ८२९ पीडितांना या पथकाने साहाय्य केले आहे.
बचावकार्यांच्या संख्येचा विचार करता उत्तर गोव्यातील प्रसिद्ध कळंगुट किनाऱ्यावर सर्वाधिक १०३ बचाव मोहिमा राबवण्यात आल्या. त्यापाठोपाठ बागा (६८ बचाव) आणि सिन्क्वेरिम (६१ बचाव) या किनाऱ्यांचा क्रमांक लागतो. दक्षिण गोव्यात कोलवा (५५) आणि पाळोले (५०) हे किनारे बचावाच्या बाबतीत आघाडीवर होते. विदेशी पर्यटकांमध्ये रशियन नागरिकांची संख्या सर्वाधिक (५६) होती, तर ब्रिटनच्या १३ पर्यटकांचे प्राण वाचवण्यात आले.
समुद्राच्या लहरी आणि पर्यटकांची गर्दी यांचा थेट संबंध अपघातांच्या संख्येशी दिसून आला आहे. २०२५ मध्ये ऑक्टोबर महिन्यात ६७ बचाव मोहिमा पार पडल्या, तर डिसेंबर महिन्यात वर्षातील सर्वाधिक दुर्घटनांची नोंद झाली. पर्यटन हंगामाचा उच्चांक आणि समुद्रातील पाण्याचा वेग यामुळे या महिन्यांत जीवरक्षकांना अधिक सतर्क राहावे लागले. 'दृष्टी मरीन'च्या या अहोरात्र सेवेमुळे गोव्याच्या पर्यटनाची सुरक्षित प्रतिमा जागतिक स्तरावर पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.