कला अकादमी आयोजित ‘अ’ गट मराठी राज्य नाट्यस्पर्धेला आजपासून साखळी रवींद्र भवनमध्ये सुरुवात होत आहे. स्पर्धेचे यंदाचे हे 54 वे वर्ष आहे. ‘अ’ गट राज्य नाट्यस्पर्धेचे वैशिष्ट्य हे आहे की या गटात भाग घेणाऱ्या संस्थांनी या गटाचा आणि पर्यायाने स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांचा दर्जा नेहमीच उच्च राखण्याचा प्रयत्न केला आहे. स्पर्धेत बक्षिसे जरी तीन नाटकांना मिळाली तरी या स्पर्धेत सादर होणाऱ्या 50 ते 60 टक्के नाटकांचा दर्जा हा नेहमीच चांगला राहिला आहे आणि ही स्पर्धा नेहमीच अटीतटीची झाली आहे. या गटात भाग घेऊन बक्षीस मिळवण्यासाठी स्पर्धक संस्था चुरशीने प्रयत्न करतात.
यंदा या गटात आठ संस्था एकमेकांशी स्पर्धा (competition) करत आहेत. यंदाच्या स्पर्धक संस्थांची संख्या एरवीपेक्षा कमी असली तरी ही स्पर्धा चुरशीची होईल असेच या स्पर्धेत भाग घेतलेल्या संस्थांच्या नावावरून वाटते. ‘रुद्रेश्वर –पणजी’, ‘अथश्री’- फोंडा, ‘राजहंस क्लब’ –पणजी, ‘विजयकुमार ट्रॅव्हलिंग बॉक्स’ – फोंडा, ‘श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज’ – फोंडा, ‘मंगलमूर्ती कला बहार’ – सत्तरी, ‘दूर्वा थिएटर्स’ –करमळी, ‘श्री हनुमान सेवा समिती’ -वाळपई या सार्या नाट्यसंस्था अनुभवी आहेतच, या साऱ्या संस्थांचे दिग्दर्शकही (Director) नाटकाच्या क्षेत्रात नाव कमावलेले आहेत.
या स्पर्धेत आज दिनांक आठ रोजी सादर होणारे पहिले नाटक (Drama) आहे, ‘आसन.... येनकेन’. सादरकर्ती संस्था आहे, ‘रुद्रेश्वर –पणजी’. आसन, मग ते कुणाचेही आणि कुठलेही असले तरी ते धारण करणाऱ्यांची मानसिकता अशी असते की ते काहीही करून टिकवायचे. हीच मानसिकता भूतकाळात होती व ती भविष्यातदेखील असणार आहे. ‘आसना’चे असं हेच स्वरूप या जगात आहे आणि तेच अन्य जगात देखील असेल. राज्य देवांचे असो वा दानवांचे किंवा अर्वाचीन काळातल्या एखाद्या मुख्य कार्यकारी अधिकार्याचे, सामान्य लोक त्या आसनावर विराजमान असलेल्या व्यक्तीलाच जास्त महत्त्व देतात. सामान्य लोकांनी ही मानसिकता बदलली पाहिजे हा विचार मांडणारे हे नाटक आहे.
रुद्रेश्वर संस्थेचेच एक सदस्य प्रसाद कळंगुटकर यांनी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे, दिपक आमोणकर यांनी. ‘रुद्रेश्वर –पणजी’ ही संस्था महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेची माजी विजेती संस्था आहे. नाट्यस्पर्धांमध्ये या संस्थेने भरीव यश मिळवलेले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या आरंभालाच एक चांगली नाट्यकृती प्रेक्षकांना बघायला मिळेल अशी आशा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.