म्हापसा : म्हापसा बाजारपेठेत मनमानी वृत्तीने वागणाऱ्या कंत्राटदाराकडून दुप्पट सोपो कर आकारला जात आहे. त्याविरोधात तक्रार एका संघटनेतर्फे म्हापसा नगरपालिकेकडे करण्यात आली आहे. सध्या या शहरात सुसज्ज अशी बाजारपेठ तसेच व्यापारी संकुल उपलब्ध असूनही पालिकेचे दुर्लक्ष व उदासीनतेमुळे भाजीविक्रेते नाईलाजाने रस्त्यावरच व्यवसाय करत आहेत. (Double SOPO tax charged by the contractor in Mhapsa Market)
म्हापशातील मासळी मार्केट (Fish Market) तसेच भाजी मार्केट या ठिकाणी विक्रेत्यांकडून शिस्त पाळली जात नाही. मागच्या कार्यकाळातील पालिका मंडळांतर्फे बेकायदेशीररीत्या खास मर्जीतील व्यक्तींना जागावाटप झाले होते. त्यामुळे मोठ्या आकाराच्या जागा व्यापल्या गेल्याने स्थानिक विक्रेत्यांना बाजारपेठेत सामावून घेतले जाऊ शकत नाही. म्हणूनच तर त्यांना भर रस्त्यावर बसून भाजी विकण्यास भाग पाडले जात आहे.
अतिरिक्त जागा व्यापणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेचे बाजारपेठ निरीक्षक कारवाई करत नसल्यानेच अन्य विक्रेत्यांना रस्त्यांवर विक्री करावी लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. अशाने एखादा अपघात घडल्यास त्यास कारणीभूत कुणास धरावे, असा सवाल म्हापसा पीपल्स युनियनचे कार्यकर्ता सुदेश तिवरेकर यांनी केला आहे. पालिकेच्या करारानुसार सोपो कर केवळ बाजारपेठेतच आकारता येतो; परंतु बाजारपेठेबाहेर रस्त्यांवर असलेल्या विक्रेत्यांकडूनही कंत्राटदार सोपो कर वसूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
म्हापसा बाजारपेठेत (Mhapsa Market) दिवसभरात विशेषत: सकाळच्या सत्रात विक्रेत्यांकडून होत असलेल्या अंदाधुंद कारभाराबाबत ‘म्हापसा पीपल्स युनियन’चे नेते जवाहरलाल शेट्ये, सुदेश तिवरेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी मार्केट निरीक्षक नरसिंह राठवड यांना धारेवर धरले. त्यामुळे अखेरीस बाजापेठेतील पादचाऱ्यांच्या अर्थात ग्राहकांच्या मार्गावर होणाऱ्या विक्रेत्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. सध्या ते मार्ग खुले आहेत.
कोविड महामारी नियंत्रणात आली असली तरी बाजारपेठेत येणारे ग्राहक तसेच विक्रेते व खास करून मासळी मार्केटमधील मासे कापणाऱ्या कामगारांकडून मास्क (Mask) परिधान न करणे तसेच सिगारेट फुंकणे अशा कृती होत असल्याची बाब सामाजिक कार्यकर्त्यांनी बाजारपेठ निरीक्षक नरसिंह राठवड यांच्या नजरेत आणून दिली होती. त्यानंतरच त्यांनी संबंधितांवर कारवाईही केली.
जवळजवळ दुप्पट रक्कम आकारून बाजारपेठेतील सोपो कंत्राटदार विक्रेत्यांना सतावत असल्याबद्दल पालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना लेखी तक्रार दाखल करण्यात आल्याचे संघटनेचे नेते जवाहरलाल शेट्ये यांनी सांगितले. तसेच त्या कंत्राटदारास कित्येकदा कंत्राट मिळाले असले तरी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात येऊन विक्रेत्यांना लुबाडणाऱ्या त्या सोपो कंत्राटदारास लिलाव प्रक्रियेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
विक्रेत्यांची सुरू आहे पिळवणूक
बाजारपेठेतील सोपो कंत्राटदारांकडून विक्रेत्यांची पिळवणूक होत आहे. नियमांनुसार बाजारपेठेत (Market) खुल्या जागेत बसलेल्या विक्रेत्यांकडून एक चौरस मीटर जागेस दहा रुपये व शेडमध्ये बसलेल्यांकडून वीस रुपये दराने सोपो कर (Tax) आकारावा असा नियम आहे. मात्र कंत्राटदार दुप्पट रक्कम व त्याहूनही जास्त रक्कम आकारत आहे. ही बाब आम्ही पुराव्यांसह बाजारपेठ निरीक्षकांच्या निदर्शनास आणून दिली आहे, असे जवाहरलाल शेट्ये म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.