मडगाव: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील अत्यंत असंवेदनशील आणि शेतकरी विरोधी भाजप सरकारने शेळ-मेळावली येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाचवण्यासाठी केलेल्या आंदोलनातून धडा घेतला नसल्याचे दिसून येत आहे.
आपली सुपीक जमीन वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सांगेतील शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका, असा इशारा मी मुख्यमंत्र्यांना देतो. कष्टकरी शेतकरी पेटुन उठल्यास शेळ-मेळावलीची पुनरावृत्ती अटळ आहे, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिला. (Don't repeat SHEL-MELAULI in Sangem by threatening farmers – Amit Patkar )
समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगे येथे आंदोलन थांबवण्याच्या शेतकर्यांना दिलेल्या इशार्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, सांगेतील शेतकर्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पक्ष राज्यभरातील लोकांना घेऊन जाईल व शेतकऱ्यांचे हित राखेल.
आमच्या पक्षाने सरकारला केरी-सावयवेरे येथे प्रस्तावित आयआयटीसाठी उपलब्ध असलेली जमीन वापरण्याची सूचना केली होती. जी यापूर्वी नायलॉन-66 प्रकल्पाला देण्यात आली होती. एसईझेड प्रवर्तकांकडून परत घेतलेली जमीन आयआयटी स्थापन करण्यासाठी वापरावी, अशी विनंतीही आम्ही सरकारला केली होती.
स्थानिक सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अजेंडा पुढे ढकलण्यासाठी शेतीयोग्य जमिनी काँक्रीटच्या जंगलात रुपांतरित करण्यासाठी तयार असल्याचे दिसून येते, असे अमित पाटकर म्हणाले.
समाजकल्याण मंत्र्यांनी त्यांच्याच मतदारसंघ असलेल्या सांगे येथील शेतकर्यांना धमकावणारा इशारा वाचून मला आश्चर्य वाटले. विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना ही धमकी दिली जाणे हे अधिक चिंताजनक आहे. मंत्र्याने दिलेल्या धमकीची डीजीपींनी गांभीर्याने दखल घ्यावी आणि धमकी देणारी वक्तव्ये दिल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते म्हणून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.